करिअर करायचं म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण पुण्यात येतात. पण पुण्यातील एका इंजिनिअर तरुणीने मात्र रुढार्थाने ‘सेट’ असलेलं करिअर सोडून बिहारची वाट धरली. शिक्षणानं सॅाफ्टवेअर इंजिनिअर असलेली ही तरुणी आता बिहारच्या अतीदुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी काम करते आहे. मानसिक आरोग्य हा तिच्या कामाचा भाग, पण तिथली परिस्थिती बघता अगदी बीपी तपासणं, सलाईन लावणं, डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलांना मदत करणं असं सगळं ती करते! त्यामुळे इंजिनिअर झालेली डॅाक्टर असा तिचा उल्लेख केला तर तो वावगा नाही. तिचं नाव स्नेहल जोशी!
स्नेहल मूळची सांगलीची. आई-वडिलांच्या नोकरी-व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झाली. कमिन्स सारख्या नावाजलेल्या कॅालेजमधून इंजिनिअर. आणि इंजिनिअर्सचं ड्रीम डेस्टिनेशन असलेल्या इन्फोसिस कंपनीत नोकरी! दहा वर्ष हे स्वप्न जगल्यानंतर स्नेहलला वेगळं काही तरी करायचे वेध लागले. त्याच दरम्यान तिची भेट डॅा. गौरव कुमार याच्याशी झाली. तो मूळचा बिहारी! डॅाक्टर झाल्यावर स्वत:चं हॅास्पिटल वगैरे काही नको, बिहारमध्ये जाऊन काम करायचं हे त्याचं स्वप्न. स्नेहलने डॅा. गौरवच्या कामात हातभार लावायचं ठरवलं आणि बिहारची वाट धरली. बिहारमधला रामनगर जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातलं नंदुरबार-गडचिरोलीच. अतीदुर्गम. गरिबी आणि अशिक्षितपणाचं प्रचंड सावट. बरं वाटत नसेल तर डॅाक्टरांकडे जाणं हा सगळ्यात शेवटचा उपाय. त्यामुळेच जन्मस्थान हे रुग्णालय अगदी साध्या रुपात उभं राहिलं. तिथल्या गरीब-गरजू पेशंट्सला आपल्याकडे यावंसं वाटावं, भिती वाटू नये हा उद्देश होता. फी द्या किंवा देऊ नका असा साधा व्यवहार. त्यामुळे लोकं अगदी बिनधास्त डॅाक्टरांकडे यायला लागले.
डॅाक्टर पुरुषाशी बोलण्यापेक्षा डॅाक्टर नसलेल्या बाईशी बोलणं लोकांना जास्त सोपं जातंय हे लक्षात आलं तसं स्नेहलचा ‘कम्युनिटी हेल्थ’ चा अभ्यासच सुरू झाला. औषध नको, अगदी साधे प्रेमाने बोललेले दोन शब्दही पेशंटला बरं करतात हे लक्षात आलं. त्यामुळे समुपदेशनातली प्राथमिक कौशल्य शिकता शिकता स्नेहल आणि गौरवने वेल्लोर इथल्या एका संस्थेत मानसिक आरोग्याचा एक अभ्यासक्रमच पूर्ण केला. त्यात सुवर्ण पदक मिळवलं. आता, त्याच संस्थेत व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून स्नेहल आणि गौरव शिकवतात. कोविडपूर्व काळात स्नेहलचं काम म्हणजे जन्मस्थान रुग्णालयात डॅा. गौरवला मदत करणं आणि गावातल्या, परिसरातल्या रुग्णांच्या मानसिक आरोग्यावर काम करणं. पण कोविडने या कामाला वेगळीच कलाटणी दिली.
स्नेहल सांगते, “मागच्या वर्षी साधारण याच दरम्यान आम्ही होळी साजरी केली. बिहारमध्ये होळी जोरदार साजरी केली जाते. आता आठवताना कळतंय त्या होळीनंतर काही साजरं करायची संधीच मिळाली नाही, कारण कोविडने हळूहळू आमच्या आजूबाजूलाही शिरकाव केला. गावोगावी जाणं, मास्क, सॅनिटायजर वाटणं, त्यांचा वापर कसा करायचा हे शिकवणं. त्याच वेळी जन्मस्थानमध्ये पायाभूत सोयी तयार ठेवणं असं सगळंच सुरू होतं. सकाळी सात वाजता दिवस सुरू व्हायचा. एक दिवस असंच एका गावात गेलो. मास्क वाटणं वगैरे चालू होतं. लहान मुलं उत्साहाने मास्क लावायला पुढे होती, तशातच मला कलावती भेटली. “पोटाला अन्न नाहीच आहे, बरं झालं तुम्ही मास्क देऊन तोंडही बंद केलंत!” ती म्हणाली आणि डोळे खाडकन उघडले. हॅास्पिटलमध्ये ३० बेड तयार करायची धडपड करत असताना आपण बिहारमध्ये आहोत, जिथे पॅंडेमिक असो नसो, दोन वेळा खायला मिळणं हीच लक्झरी आहे याची आठवण कलावतीने करून दिली. परतीच्या वाटेवर जंगल संपलं तसं मी फोनाफोनी करून डाळ-तांदुळ-तिखट-मीठ-तेल असे ५० पॅकेट्स तयार करायला सांगितले. ते घरोघरी पोहोचवणं हे बेड-औषधं-हॅास्पिटलपेक्षा महत्वाचं होतं… त्याच दरम्यान मानसिक आरोग्यावरच्या कामाकडे दुर्लक्ष होऊन चालणार नव्हतं, त्यामुळे तेही सुरू राहिलं.
स्किझोफ्रेनिया, नैराश्य, हे इथं शारीरिक आजारांइतकेच ‘कॅामन’ आजार. त्यात गरिबी, शिक्षणाचा अभाव – त्यामुळे करू नये ते सगळे उपाय इथले लोकं करतात. त्यावर ‘हे करताना औषधंही घ्या’ असं सांगितलं तर लोक नक्की सहकार्य करतात. ‘झाडफुंक’वाल्या बाबाकडे जातात पण इतक्या वर्षांच्या इथल्या कामानंतर आता आमच्या औषधांनाही नाही म्हणत नाहीत. एखादा नवीन पेशंट आल्यावर, त्याला औषधं देताना जुना पेशंट आवर्जून सांगतो – मला बरं वाटलं, तुलाही वाटेल! ही ‘माऊथ पब्लिसिटी’ खरंच उपयोगी पडते. महापुराचा प्रश्न इथं दरवर्षीचाच. अनेक भागात स्थानिक प्रशासन पोहोचूही शकत नाही. तिथं पोचणं, जेवण, औषधं पुरवणं असा प्रयत्न आम्ही करतो. मला कोविडने ग्रासलं, पण मी त्यातून बरी झाले. अर्थात हे मी पुण्यात असलेल्या माझ्या बाबांना, बहिणीला कळवलं नाही, कारण त्यांची काळजी वाढवण्याची इच्छा नव्हती. पण मी आजारी असतानाही माझी ‘टीम’ काम करत राहिली. स्किझोफ्रेनियाच्या पेशंट्सची औषधं, दुर्गम भागात धान्य पोहोचवणं, आलेल्या पेशंट्सवर उपचार हे सगळं सगळं सुरू राहिलं. संकट अजून विरलेलं नाहीच, ते इतक्यात विरणारही नाही कदाचित… पण खरंच अवघड असलेल्या एका काळात आपण काम करत राहू शकलो, त्याचा काही गरीब, गरजू आणि मागास लोकांना थोडासा उपयोग झाला, याचं प्रचंड समाधान वाटतं आहे!”
– के.भक्ती, पुणे