सोलापुरात पहिल्यांदाच मशिदीत मोफत लसीकरण शिबिर
कोविड लसीकरणासाठी आजही सगळीकडेच चांगला प्रतिसाद मिळतो आहे असं नाही. त्याविषयी गैरसमजही आहेतच. हेच घडत होतं सोलापूर शहरातील काही भागातील मुस्लिम समाजात. सोलापूर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मुस्लिम समाजातील नागरिकांनी जास्त प्रमाणात लस घेतली नसल्याचं समोर आलं. लसीकरणाला अगदी अत्यल्प प्रतिसाद इथून मिळाला होता.
त्यामुळे पहिल्यांदाच तेलंगी पाच्छा पेठ इथल्या जेलरोड परिसरात असलेल्या नूरे इस्लामी ट्रस्टी, मौलवी आणि त्या भागातील नगरसेवक यांनी तिथल्या मशिदीमध्ये लसीकरण शिबीर घ्यायचं ठरवलं. “कोरोनाच्या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे. दोन्ही डोस पूर्ण करावे. लसीकरण बाबत गैरसमज, अफवावर विश्वास न ठेवता दोन्ही डोस घेऊन तुम्ही कुटुंबास सुरक्षित ठेवा,” असं आवाहनही तिथल्या मौलवींनी लोकांना केलं. याला मुस्लिम समुदायाने पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद देत 400 हुन अधिक जणांनी लस घेतली.
मशिदीमध्ये मोफत लसीकरण ठेवल्यामुळे महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनीही शिबिराला भेट देऊन उपक्रमाचं कौतुक केलं. नूर ए इस्लामी मस्जिद ट्रस्टच्याने उपायुक्त पांडे यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक रियाज खरादी, तसंच मस्जिदचे इमाम, ट्रस्टी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
– जवेरीया रईस, सोलापूर

Leave a Reply