तिच्या आयुष्याची डबल बेल (भाग एक)

एसटीसोबतचा प्रवास सुखाचाः प्रियंका काळे

प्रवास ही प्रत्येकाच्या आयुष्यातली न टाळता येणारी गोष्ट. प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या कारणास्तव प्रवास करावाच लागतो. एसटी बसमधून प्रवासाच्या कहाण्या प्रत्येकाने ऐकल्या, अनुभवल्या असतीलच. या एसटीच्या सेवेत गेल्या २०-२५ वर्षांपासून महिलांनाही काम करण्याची संधी मिळाली आहे. सुरवातीला हे प्रमाण खूप कमी होतं पण आता लांब आणि जवळच्या पल्ल्याच्या बससेवेत महिलांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे. सासर माहेरचे सहकार्य, प्रवाशांची वागणूक, ड्युटी देणारे डेपोतले अधिकारी, कर्मचारी, सहकारी या साऱ्यांसह  वाहक म्हणून काम करताना महिलांना कडू गोड अनुभव मिळत आहेत तर कधी कामामुळे समाधान मिळते आहे. तर कधी एखादा अनुभव रडकुंडीला आणतो आहे. पण सगळ्यावर मात करत डबल बेल देत त्या एसटीसह त्यांच्या आयुष्याचा प्रवास जोमाने करत आहेत. तर वाचूया, एसटीच्या वाहक असलेल्या काहींचे अनुभव.

सासर माहेर नाशिकच असणाऱ्या प्रियांकाला २०११ साली एसटी महामंडळात वाहक म्हणून प्रशिक्षणासाठी निवडीच पत्र आलं. प्रियंकाने प्रशिक्षण पूर्ण केलं आणि कामाला लागली. आज तिच्या या प्रवासाला बारा वर्षं होत आली आहेत. महिला वाहक म्हणून आजवरची कारकीर्द कशी होती असे विचारलं तर ती सांगते, “सुरवातीचे दिवस फार भयंकर होते. परिस्थिती नसतानाही आमच्या लेकरांनी शिक्षण पूर्ण केले, आमच्या पोरी सुना रग्गड शिकल्या आहेत; पण त्यांच्या हाताला काम नाही आणि तू कोण आलीस बाहेरून? आमच्या भागात येऊन कशी काय नोकरी करते?” असे प्रश्न, टोमणे मला नोकरीच्या सुरवातीच्या दिवसात सतत एकायला मिळायचे. सुट्टे पैसे कधीही न देणे, उरलेले पैसे मात्र सारखी सारखी आठवण करून देऊन मागून घेणे, तिकिटाचे दर वाढले तरी ते वाढीव दर मान्य न करणे, कमी अंतरावर जायचे असले तरी शंभर-पाचशेची नोट पुढे करणे असे अगणित अनुभव घेत माझा वाहक (कंडक्टर) म्हणून काम करण्याचा श्रीगणेशा झाला. आता बारा वर्ष म्हणजे एक तप होत आलं आहे. त्यामुळे महिला वाहक ही संकल्पनाच सहन न होण्याच्या परिस्थिती पासून ते प्रवाशांच्या सवयी, वागणं अंगवळणी पडू लागेपर्यंत या क्षेत्रात मी आता रुळले आहे. आपण निवडलेले क्षेत्र आव्हानात्मक असलं तरी कामाचे समाधान देणारेही आहे या निष्कर्षापर्यंत मी पोहोचले आहे.’

२०११ साली प्रियंकाने तीन दिवस एसटी महामंडळाच्या ठाणे येथील कार्यालयात मुलभूत ट्रेनिंग मिळालं होतं. त्यात तिकीट बुकिंग कसं करायचं, मशीनचा वापर कसा करायचा, तिकीट देताना कोणत्या थांब्याचा दर किती, हिशोब कसा ठेवायचा, प्रवाशांशी कसं वागायचं, बस अचानक बंद पडली तर परिस्थिती कशी हाताळायची या साऱ्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर ती प्रत्यक्ष शहापूर डेपोत काम करू लागली. दररोज सकाळी ११ वाजता नाशिकहून शहापूरला जायचं. दुपारी १.३० ते ९.३० अशी ड्युटी करायची. ती संपवून मिळेल त्या गाडीने नाशिकला घरी परतायचं असा दिनक्रम होता. कधी रात्रीचे ११ वाजायचे तर कधी अजून उशीर व्हायचा. शहापूर पासून मुरबाड, किनवली, खेड, चिंचोली या रुटवर तिला ड्युटी करावी लागायची. डेपो मॅनेजर, डेपो स्टाफ, चालक सहकारी यांचं तिला चांगलं सहकार्य मिळालं. प्रियंका आलेले अनुभव, अडचणी त्यांना सांगायची. ते अनुभवाने त्यावर मार्गदर्शन करायचे. त्यातून तिचा आत्मविश्वास वाढत गेला. ज्या शहापूर डेपोत प्रियंकासह ९ जणींची निवड झाली, त्या शहापूर डेपोला म्हणजे त्या भागातील गावांना सुरवातीला महिला वाहक ही संकल्पनाच पचनी पडत नव्हती. त्यांच्या आजवरच्या इतिहासात महिला वाहक त्यांनी कधी पहिलीच नव्हती. बायका कधी वाहक असतात का? असा प्रश्न महिला प्रवाशांकडूनही विचारला जायचा. पुरुष प्रवासीही अजिबात सहकार्य करायचे नाहीत. उलट सुट्टे पैसे असले तरी देणार नाही, गाडी डेपोत उभी असली तर तिच्यात बसणार नाही आणि बस निघाली की लटकत गाडीत चढणार, बसमध्ये तुडुंब गर्दी असली तरी एखाद्या थांब्यावर बस थांबवली नाही तर गाडीला आडवे येणार, मारायला धावणार, अरेरावी करणार, धमक्या देणार, तिकीट चेकिंगच्या वेळी निरीक्षकाने कारवाई केली तर स्वत:चा गुन्हाच कबूल करणार नाही असे तऱ्हेतऱ्हेचे अनुभव तिला सुरवातीला आले. पण सारेच लोक वाईट असतात असे नाही. किंबहुना वाईट कुणीच नसतं, त्यांना आलेल्या अनुभवानुसार ते सामोरच्याशी वागत असतात हे आता प्रियंकाला उमगलं आहे.

२०१६ पर्यंत तिने शहापूर डेपोत काम केलं. त्यानंतर तिची नाशिकला शहर बस सेवेत बदली झाली. पण दोन महिन्यानंतर नाशिक महापालिकेने स्वत:च बससेवा चालवायला घेतल्यामुळे प्रियंका पुन्हा लांब पल्ल्याच्या विभागात काम करू लागली. ती आता चोपडा, औरंगाबाद, नंदुरबार, पुणे, बोरीवली, पाचोरा, जळगाव, मोहटादेवी अशा लांबच्या फेऱ्या करू लागली आहे. या काळात सकाळी ८ ते रात्री अडीच अशी ड्युटीही तिने केली आहे. आई, वडील, पती यांचे सहकार्य नसतं तर हे केवळ अशक्य आहे असे प्रियंका आवर्जून सांगते. आजही पहाटेची ड्युटी असेल तर पती पंकज तिला डेपोत सोडवायला येतो. ड्युटी संपून नाशिकला यायला मध्यरात्र झाली तरी देखील तितक्याच सहजतेने तिला घ्यायला येतो. तिच्या अनुपस्थितीत मुलांची काळजी घेण्याचं काम हे तिचे हे आधारस्तंभ मायेने करतात. या बारा वर्षाच्या कालावधीत अनेक बरेवाईट अनुभव आले. त्यातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. अर्ध्या रस्त्यात बस बंद पडणे, बसचे अपघात या गोष्टी तिच्याही वाटेला आल्या. बस बंद पडल्यावर लवकर दुरुस्त होणार असेल तर ठीक आहे नाहीतर चालक दुसऱ्या बसमध्ये बसवून देतात, वरिष्ठांना सांगितल्यावर तेव्हढे सहकार्य मिळते. एकदा नाशिकहून खचाखच भरलेल्या बसमध्ये बुकिंग सुरु असताना पहाटे कसारा घाटात बस कोसळलीच असती पण चालकाने बस नियंत्रित केली. लोकांना किरकोळ खरचटले पण बस शिताफीने वळविल्याने मोठा अनर्थ टळला. असाच अनुभव धुळे प्रवासात आला. बस दुभाजक ओलांडून पुढे गेली होती. पण थोडक्यात बचाव झाला. अर्थात अपघात तर कुठेही होऊ शकतात. दैव आणि सतर्कता कामी येते असे ती नमूद करते. घरच्यांची साथ, हितचिंतकांच्या शुभेच्छा आणि मुख्य म्हणजे प्रवाशांचे, वरिष्ठांचे सहकार्य या साऱ्यांच्या साथीने एसटी सोबतचा प्रवास सुखाचा सुरु असल्याच्या भावना प्रियंका व्यक्त करते.

  • भाग्यश्री मुळे, नाशिक.

Leave a Reply