स्तन स्वास्थ्य

आपल्याकडं स्तनांचा संबंध हा थेट लैंगिकतेशी जोडला जात असल्यानं, त्याच्याविषयी बोलणं टाळलं जातं. स्तनांमध्ये दुखत असेल किंवा काही बदल जाणवल्यास महिला बऱ्याचदा कुटुंबातल्या महिलांशी किंवा मैत्रिणींशीही याबाबत बोलायचं टाळतात. आपण स्वतः घरातच आपल्या स्तनांचं निरीक्षण करू शकलो आणि तेही वैद्यकीय मार्गदर्शनाखाली तर महिलांच्या खूपच फायद्याचं होईल. महिलांची हीच गरज ओळखून मुंबईतल्या के.ई.एम. रुग्णालयातील डॉ रचना पावसकर यांच्या टीमनं एक ॲप तयार केलं आहे. या ॲपचं नाव आहे, स्तन स्वास्थ्य.

स्तनांची चाचणी नेमकी कोणत्या दिवशी व कशी करावी, गाठ कशी ओळखावी याबाबत या ॲपमध्ये चित्र, एनिमेशन आणि निवेदनाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. स्तनांचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर याबद्दलच्या शंका आणि त्यांचं समाधानही यात लिहिलं आहे. वापरण्यास अतिशय सहज सोप असणारं हे ॲप आपण गुगल प्ले स्टोअरमधून मोफत डाऊनलोड करू शकतो. पाळीच्या पाचव्या दिवसापासून ते विसाव्या दिवसादरम्यान कोणत्याही दिवशी, तिशी ओलांडलेल्या प्रत्येक महिलेनं आपल्या स्तनांची चाचणी दर महिन्याला करायलाच हवी. काही बदल जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. हे बदल किंवा स्तनांमधील विकृती कोणत्या? याचीही माहिती या एपमध्ये आपल्याला मिळते. महत्त्वाचं म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये हे ॲप उपलब्ध आहे.

कम्युनिटी मेडिसीनमध्ये एम.डी.चं शिक्षण सुरू असताना डॉ रचना यांना हे ॲप तयार करण्याची कल्पना सुचली. शिक्षणादरम्यान बृहन्मुंबई महापालिकेच्या मालवणी इथल्या दवाखान्यात त्यांचं 7 महिने पोस्टिंग होतं. प्रॅक्टिस करताना तिथल्या वस्त्यांमधल्या महिलांशी त्यांचा जवळून संबंध यायचा. महिलांशी संवाद साधताना स्तनांमध्ये गाठ, दुखणं, स्त्राव याबद्दल बोलायला महिला लाजतात ही बाबही डॉ रचना यांच्या लक्षात आली. त्रास अंगावर काढून मग तो सहन न होण्याइतपत वाढल्यावर त्या डॉक्टरांकडे येतात. त्रासाचं स्वरूप जास्त होण्याआधीच कळलं तर उपचार करणं सोपं आणि महिलांनाही लवकर आराम मिळेल यासाठी काय करता येईल, याचा विचार डॉ रचना करू लागल्या.  महिला स्व-स्तन तपासणी घरच्या घरीही करू शकतात. याकरता कोणत्याही तांत्रिक साधनांचीही गरज नसते. डॉ रचना मालवणीतल्या क्लिनिकमध्ये असेपर्यंत महिलांना मार्गदर्शन करत होत्या. पण त्या पुन्हा के.ई.एम. रुग्णालयात रुजू झाल्यावर या सर्वात खंड पडला. यातल्या काही महिला फोनवर त्यांच्याशी कधीतरी संपर्कात असायच्या. महिलांना मार्गदर्शन नियमित मिळायला हवं, असं डॉ रचना यांना खूप वाटत होतं.  पण ‘स्तन स्वास्थ्य’ विषयाची पुस्तिका दिली तर आपल्या समाजातल्या टॅबूमुळं महिलांना घरात ती कुठं ठेवावी? हा प्रश्न असेल. यातील चित्रांमुळं काहीतरी अश्लील ठेवलंय असाही घरातल्या इतरांचा समज होऊ शकतो. वस्तीतल्या घरांमध्ये किंवा इतर घरांमध्येही पुस्तिका कोणाच्या नजरेस पडणार नाही, इतका खाजगीपणा किती जणींना मिळत असेल? बरं, पुस्तिकेचा वापर करताना चित्र असली तरी ते वाचून त्यानुसार तपासणी करणंही सगळ्यांना शक्य होईलच असं नाही. डॉ रचना यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, यातल्या बहुतांश महिला स्मार्ट फोन वापरतात. हाच धागा पकडून त्यांनी स्तन तपासणीकरता मार्गदर्शन करणारं ॲप बनवता येईल का, हा विचार सुरू केला. डॉ रचना यांनी त्यांच्या के.ई.एम.मधील सिनियर डॉ रुपाली साबळे (सहाय्यक प्राध्यापक, के.ई.एम.) आणि डॉ गजानन वेल्हाळ (विभागप्रमुख, कम्युनिटी मेडिसीन) यांच्याशी याबद्दल चर्चा केली. या वरिष्ठांनी डॉ रचना यांची कल्पना उचलून धरली आणि त्यांना प्रोत्साहन दिलं. डॉ रचना यांचे मित्र ओंकार यादव यांनी ॲप बनवून देण्याची तयार दाखवली. ॲप तयार झाल्यावर हे ॲप शेअर करण्यात आलं. त्यावेळी हे ॲप वापरणाऱ्या 2 महिलांच्या स्तनात गाठ असल्याचं लक्षात आलं आणि ही गाठ ब्रेस्ट कॅन्सरची असल्याचं पुढील तपासणीत निष्पन्न झालं. एका पुरुषाच्याही स्तनातली गाठ कॅन्सरची होती. हे वाचून तुम्हांला आश्चर्य वाटू शकतं. पण पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो. या ॲपच्या वापरामुळं ह्या रुग्णांना त्यांची शारीरिक स्थिती लक्षात आली आणि त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू झाले.

कॅन्सर म्हटलं की, पायाखालची जमीन घसरते. पण आपल्या शरीरातील बदलांचा अलार्म वेळीच ओळखला तर पुढच्या सर्व मानसिक आणि शारीरिक त्रासाचं प्रमाण निश्चितच कमी होऊ शकतं. ऑक्टोबर महिना हा स्तनाचा कर्करोग जागृती अभियानाकरता जगभरात पाळला जातो. आपणही हे ॲप डाऊनलोड करूयात. स्वतःकरता महिन्यातली 20 मिनिटं राखून ठेवूयात आणि आपल्या स्तनांचं स्वास्थ्य जपूयात.

पुढील लिंक वापरून तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून हे एप मोफत डाऊनलोड करू शकता.

https://bit.ly/3sarYhp

-साधना तिप्पनाकजे

Leave a Reply