रसदार स्ट्रॉबेरी… महाबळेश्वरची नव्हे, तर मैत्रीमधून बहरलेल्या नांदेडची!
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, लोहा या परिसरात प्रामुख्यानं हळद, केळी, ऊस, गहू ही पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पण मुदखेड तालुक्यातल्याच बारड गावातल्या बालाजी मारोतीअप्पा उपवार यांना वेगळं काहीतरी करायचं होतं. त्याचवेळी ज्ञानोबा कोंडिबा सोनोवळे स्ट्रॉबेरीचा प्रयोग करत असल्याचं कानावर आलं. त्याची माहिती घेण्यासाठी ते ज्ञानोबांकडे आले. ज्ञानोबा आणि सदाशिव हनुमंतराव सोनोवळे दोघे भाऊ. लोहा तालुक्यातल्या देऊळगाव इथले शेतकरी . तिघांची मैत्री झाली. आपापल्या शेतात १० गुंठ्यांवर स्ट्रॉबेरीचा प्रयोग करायचं ठरलं.
त्यांनी महाबळेश्वरमधल्या रोपवाटिकेतून 12 रुपये प्रमाणे एम. ए. जातीची सहा हजार स्ट्रॉबेरीचे रोपं आणली. ऑक्टोंबर 2021 मध्ये लागवड केली. अत्याधुनिक पद्धतीचा वापर करत पाच फुटाचा बेड केला. त्यात गांडूळ खत आणि सेंद्रिय खताचा वापर केला. यात जीवामृत दशपर्णी अर्क, डी कंपोजर आणि परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून सूक्ष्म जीवाणू आणून पिकांना दिले. बेडवरती मलचिंग पेपरचा वापर केला. स्ट्रॉबेरी या पिकाला थंड वातावरण लागतं. पीक घेतलेल्या परिसरात थंड वातावरण कायम ठेवण्यासाठी स्प्रिंकलरचा सातत्यानं उपयोग केला. सोबतच ड्रीपच्या साह्यानं दररोज वीस मिनिटं पाणी दिलं. पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी गोमूत्र, ताक, गावरान अंडी या घटकांचं मिश्रण करून पिकावर फवारणी केली आहे. पाणी देण्याच्या वेळादेखील नियमित काटेकोरपणे पाळल्या.
आता स्ट्रॉबेरी विक्रेते बांधावर येऊन 300 किलो प्रमाणे स्ट्रॉबेरी विकत घेत असल्याचं बालाजी सांगतात. ज्ञानोबा म्हणाले, ”स्ट्रॉबेरी म्हटलं की, महाबळेश्वर डोळयासमोर येेतं. थंड हवेच्या ठिकाणीच स्ट्रॉबेरी हे पीक , येतं असा समज आहे. पण नांदेडमध्येही ती घेणं शक्य आहे. स्ट्रॉबेरी हे कमी जागेत, कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारं फळपीक आहे. लागवडीसाठी 50 हजार रुपये खर्च आला. खर्च वजा होऊन एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून याची विक्री करतोय. ”
शेतीला जोडधंदा म्हणून स्ट्रॉबेरी शेती करावी,असा सल्ला सोनोवळे यांनी दिला आहे.
– शरद काटकर, नांदेड

Leave a Reply