पुराच्या पाण्यात उतरली, मदतीला धावली! कथा 70 वर्षांच्या सुमतीताईंची.
22 जुलै 2021 ची रात्र. चिपळूण भागात जोरदार पाऊस सुरू होता. शहराच्या मध्यवर्ती भागातला नारायण तलाव पहाटेपर्यंत भरून वाहायला लागला. या तलावाच्या काठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमती जांभेकर यांचं घर. वय वर्ष 70. सुमतीताईंच्या अंगणात पाणी पोचलं. तेव्हा हाकेच्या अंतरावर असणारे प्रांत, तहसीलदार यांच्या घरात पाणी घुसलं होतं, मदत करणारे प्रशासकीय अधिकारी पुराचं पाणी घरात घुसल्याने रस्त्यावर आले होते. शेजारी जे शक्य आहे त्या वस्तू घेऊन पहिला मजला गाठत होते. पाणी प्रचंड वेगाने वाढते आहे याचा अंदाज येताच सुमतीताईंनी कार वाचावी या हेतूने त्यांच्या घरापासून काही अंतर उंचावर असलेल्या ठिकाणी जाऊन कार पार्क केली.
सुमतीताई कार सुरक्षितस्थळी लावून परत घराकडे जाईपर्यंत पुराचं पाणी पहिल्या पातळीपेक्षा तिपटीने वाढलं होतं. पाण्याला प्रचंड वेग होता. ‘मी सुखरुप आहे पण घरी असणाऱ्या माझ्या मानस कुटुंबातील योगिताचं काय?’ ही चिंता त्यांना अस्वस्थ करत होती. घराच्या पहिल्या मजल्यावर सुमतीताई आणि प्रा. शमाताई दलवाई चालवत असलेल्या मानव नवनिर्माण चॅरीटेबल ट्रस्टच्या (मानस) कार्यालयात योगिता नावाची 22 वर्षांची युवती एकटीच होती. चिपळूण आणि आसपासच्या ग्रामीण विभागात कोकण वुमेन युथ स्टुडंटस् अँड युथ डेव्हलेपमेंट या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम करतात. शिवाय महिलांची पतसंस्था, मतिमंद मुलांसाठी शाळा व उद्योग केंद्र, कॉलेज इ. संस्था चालवतात.
त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याने आता नदीचं स्वरुप प्राप्त केलं होतं. सुमतीताईंना डोळ्यासमोर फक्त योगिता दिसत होती. त्यांना रस्त्यावर बघणारे लोक ताई, घराकडे जाऊ नका म्हणून खिडकी, गॅलरीतून ओरडून सांगत होते. तरीही पाण्याचा प्रचंड वेग, वाढत जाणारी पातळी, शेजारचे तळे, तळ्यातील मगरी अशा परिस्थितीत सत्तरीच्या तरुणी सुमती ताईंनी पाण्यात सूर मारला आणि वेगात पोहत सुखरुप घर गाठलं.
घराच्या पहिल्या मजल्यावर योगिता सुखरुप असल्याचं त्यांनी बघितलं आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. काही भरीव समाजकार्य करायचं तर संसाराच्या पाशात गुरफटायचं नाही हा सुमतीताईंचा निर्णय जितका धडाडीचा तितकाच या वयात त्यांनी स्वतःच्या वयाचा, जिवाचा विचार न करता वेगवान पाण्यात मारलेला सूर सुद्धा साहसी म्हणावा लागेल. त्यांनतरही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. फोन पाण्यात भिजल्याने खराब झाला होता. तो दुरुस्त करण्यासाठी धडपडत करत राहिल्या. रात्रभर खटपट करुन त्यांनी फोन सुरु केला. पण मोबाईल नेटवर्क केव्हाच बंद पडलं होतं. पूर ओसरताच, त्यांनी आधी भाच्याकडून दुसरा फोन मागवला आणि स्वतःचं घर पाण्यात बुडलेलं असताना कोवॅस कुटुंबातील कर्मचारी व चिपळूणमधील नागरिकांची विचारपूस सुरु केली. स्वतःच्या घराची साफसफाई बाजूला ठेऊन सुमतीताई इतरांना काय, कशी मदत देता येईल याचा आराखडा तयार करत होत्या.
पुराच्या तडाख्यातून सुटून चिपळूण आता साफसफाईच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचलेलं आहे. चिपळूणच्या ग्रामीण भागातील सुमारे 550 कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यात सत्तरीच्या सुमतीताईंनी झोकून दिलं आहे. मानस संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्याचे कीट, कपडे, महिलांना अंर्तवस्त्रे, सॅनिटरी पॅडस् तसेच सुमतीताईंच्या संबंधित संस्थांनी अंथरुण-पांघरुण, भांडी, औषधे पोहोचवली आहेत. पिण्याचे पाणी, लहान मुलांसाठी खाऊ, कपडे आदीसांठी कोवॅस तसंच जांभेकर कुटुंबियांनी त्यांच्या विविध संस्थांच्या माध्यमातून सुमारे 2.50 लाख रुपये रोख उभा केले, आणि त्याचे योग्य ते वाटप सुरु आहे. स्वतःचा काडी काडी करुन जमवलेला प्रपंच पुराच्या पाण्यात वाहून गेला असताना इतरांचे प्रपंच उभे करण्यासाठी झटणाऱ्या सुमतीताई आगळ्या खऱ्याच!
– तुषार गायकवाड, चिपळूण

Leave a Reply