राधाच्या लग्नाचा दिवस. १६ मार्च २०२०. संतोष वानखडे या तरुणाशी तिची लग्नगाठ बांधली गेली. बुलढाणा जिल्हयातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव इथलं हे वानखेडे कुटुंब. आणि राधाचं उमाळे कुटुंब संग्रामपूर तालुक्यातील धामणगांव इथलं. लग्न होऊन जेमतेम चार महिने झाले होते. आणि ३१ ऑगस्ट २०२० रोजी संतोषने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. उणीपुरी २३ वर्षांची राधा, कानकोंडी झाली. पण एकटी पडली नाही. पोटचा पोर गेल्यावर सुनेला दूषणं दिली जातात. आणि सहसा तिला माहेरी पाठवलं जातं. मात्र संतोषचे आईबाप शालिग्राम आणि वत्सला वानखडे यांनी
राधाचा सांभाळ आपल्या मुलीसारखा करायचं ठरवलं. राधा तिथंच राहू लागली. तिच्या मनाचा, तिला सहन कराव्या लागणार्या सामाजिक संकटांचा विचार शालिग्राम करीत होते. शालिग्राम वानखडे म्हणाले, “लग्नानंतर लगेच वैधव्य यावे यात राधाचा कोणताही दोष नव्हता. या घटनेने तिचं सुखी संसाराचं स्वप्न पार धुळीस मिळालं होतं. तिचं भयंकर जीवन पाहवत नव्हतं. तिच्या जागी माझी मुलगी असती तरीही मी तिच्या दुस-या लग्नाचा विचार केला असता आणि तिला सुखी झालेलं पाहिलं असतं.” दरम्यान जळगांव जामोद तालुक्यातील खेरडा गावांतील प्रशांत शत्रुघ्न राजनकार याला हे समजलं. त्याने राधासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. सर्व रुढी-परंपरांना फाटा देत श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनी, ५ मार्च २०२१ रोजी राधा-प्रशांतचा विवाह सुनगांव ग्रामपंचायत इथे नोंदणी पद्धतीने उत्साहात पार पडला. विवाहानंतर वैदिक पद्धतीने सासू-सासरे शालिग्राम आणि वत्सलाबाई यांनी आई-वडील या नात्याने तिचं कन्यादानही केलं.
– दिनेश मुडे, जळगाव जामोद, बुलढाणा