समाधानाचा एक क्षण; नव्हे वर्षावच
२ ऑगस्ट १९९७ची संध्याकाळ. स्थळ-पुण्यातील भरत नाट्य मंदिर. एखाद्या लोकप्रिय नाट्यप्रयोगाला असावी अशी प्रेक्षकांची गर्दी होती, निमित्त होते राज्य पातळीवरील खुल्या ‘महापौर करंडक’ एकांकिका स्पर्धेचे. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पुण्याच्या तत्कालीन महापौर अॅड. वंदना चव्हाण यांनी राज्यस्तरीय खुल्या ‘महापौर करंडक’ स्पर्धा आयोजित केल्या होत्या. रात्री ८ वाजता प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला. भाषणांचा औपचारिक कार्यक्रम संपला आणि स्पर्धेतील पहिल्या एकांकिकेची तिसरी घंटा झाली.
मी पडद्यामागून निवेदन सुरू केले…
“सुस्वागतम्, सुस्वागतम्… रंगदेवता आणि प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, पुणे अंधशाळा मुलींची, कोथरूड आणि पुणे अंधशाळा मुलांची, कोरेगाव पार्क सहर्ष सादर करीत आहे… ‘स्वातंत्र्याची यशोगाथा’. संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन स्वागत थोरात.
रसिक प्रेक्षकहो, आज आपण जागतिक रंगभूमीच्या इतिहासातील एका ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे साक्षीदार ठरणार आहात. जगाच्या इतिहासात प्रथमच ८८ अंध कलाकार नाटकात काम करीत आहेत.”
‘८८ कलाकार…? आणि सर्व अंध?’ प्रेक्षागृहात हलकीशी कुजबूज सुरू असतानाच पडदा उघडला गेला.
प्रयोगाला सुरुवात झाली. विंगेच्या आतून स्वातंत्र्याचा पोवाडा गायला जाऊ लागला. पोवाडा संपेपर्यंत रंगमंचावर संपूर्ण काळोख होता. पोवाडा संपताच शाळेची घंटा झाली.
रंगमंचावर हळूहळू उजेड येऊ लागला. चार-पाच शाळकरी मुली रंगमंचावर येऊन बसल्या. त्यांचे आपापसात बोलणे सुरू असतानाच बाई वर्गात आल्या. ‘स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव कसा साजरा करावा?’ या विषयावर चर्चा सुरू झाली. स्वातंत्र्याचा लढा सांगणारे नाटक सादर करायचे असे एकमताने ठरले आणि सर्वजणी लगबगीने उठून नाटकाच्या तयारीसाठी निघून गेल्या.
कार्यक्रमाचा दिवस उजाडला. नाटकातील नाटक सुरू झाले. रंगमंचावर उजव्या कोपऱ्यात एक वयोवृध्द गृहस्थ व्हायोलीन वाजवत बसलेले. त्यांचे व्हायोलीनवादन रंगात आलेले असतानाचा डाव्या विंगेतून सहा–सात वर्षांची एक चिमुरडी पुस्तक हातात घेऊन धावत धावत संपूर्ण रंगमंच पार करून त्या गृहस्थाशेजारी बसली तेही अगदी अचूकपणे. तिच्या पाठोपाठ दुसरी मुलगी येऊन बसली तीही अचूकपणे. हे पाहून प्रेक्षागृहातून टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या चिमुरडीने या कडकडाटाने अजिबात विचलित न होता आपले काम सुरू ठेवले. तिने आजोबांना हातातील पुस्तक देऊन ते पुस्तक वाचून दाखविण्याचा आग्रह केला.
आजोबांनी बोटांच्या स्पर्शाने ते ब्रेल लिपीतील ‘स्वातंत्र्याची यशोगाथा’ पुस्तक वाचण्यास सुरुवात केली आणि त्या पुस्तकातील घटना हे अंध कलाकार प्रत्यक्ष रंगमंचावर जिवंतपणे साकार करू लागले.
इ.स. १८५७ चे मंगल पांडेचे बंड… झाशीच्या राणीचे युध्द… लेझीमच्या तालावर लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा शुभारंभ… स्वातंत्र्यवीर सावरकरांची शपथ व ‘जयोस्तुते…’ गीताबरोबर भारतमातेचे दर्शन… ‘कदम कदम बढाए जा’ या स्फूर्तीगीताच्या तालावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे संचालन… अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची ‘छोडो भारत’ ही घोषणा आणि त्याला जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद… सर्वात शेवटी १५ ऑगस्ट १९४७ चा भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णक्षण!
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास ‘स्वातंत्र्याची यशोगाथा’ या प्रयोगातून रंगमंचावर दमदारपणे सादर झाला… नव्हे; तो पुन्हा एकदा प्रत्यक्ष साकार झाला.
प्रत्येक प्रसंगाला टाळ्यांच्या कडकडाटाने प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. प्रत्येक कलाकाराच्या कसदार अभिनयाला भरभरून दाद देण्याची आवर्तने नाटक संपेपर्यंत चालूच होती.
शेवटी ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’ या समूहगायनाने प्रेक्षक भारावले. टाळ्यांच्या गजरात पडदा पडला तेव्हा सर्वच उपस्थितांच्या डोळ्यात या अंध कलाकारांच्या कौतुकाचे आनंदाश्रू तरळत होते.
माझीही अवस्था वेगळी नव्हती. बघता बघता आम्हा सर्वांभोवती प्रेक्षकांचा गराडा पडला, कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. प्रेक्षकांच्या गर्दीत सर्वच कलाकार जणू हरवून गेले होते. प्रेक्षक नाटकाचे, कलाकारांच्या अभिनयाचे, संवादाचे, त्याच्या अचूक वेळेचे, रंगमंचावरील सहजतने वावरण्याचे भरभरून कौतुक करत होते. कौतुकाचा एवढा वर्षाव होत असतानाही कलाकार मात्र मला शोधण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्येकाला मला भेटण्याची तीव्र ओढ लागली होती. माझी शाबासकी त्यांना हवी होती.
या अनपेक्षित गर्दीने नाट्यमंदिरातील कर्मचारी अक्षरशः गोंधळून गेले होते. रंगमंचाकडे येणारा प्रेक्षकांचा हा लोंढा कसा थोपवावा आणि स्पर्धेतील पुढील प्रयोग वेळेत कसा सुरू करावा हे सुचत नव्हते. शेवटी मी प्रेक्षकांना हात जोडून विनंती केली आणि सर्व कलाकार तसंच शिक्षकांना घेऊन भरत नाट्य मंदिराबाहेर पडलो.
स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. ‘स्वातंत्र्याची यशोगाथा’ला सांघिक प्रथम क्रमांक आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक अर्थातच… मला मिळाले. अंध कलाकारांच्या संघाने डोळसांच्या खुल्या नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवण्याची ही रंगभूमीच्या इतिहासातील पहिलीच घटना. एक विश्वविक्रम निर्माण झाला होता. तो म्हणजे… जागतिक रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच ८८ अंध कलाकारांनी नाटकात एकत्र काम केले होते. या विक्रमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ आणि ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’ मध्ये झाली. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झालेले हे पहिलेच मराठी नाटक आहे.
या नाटकानंतर ४४ अंध कलाकारांचे ‘तीन पैशाचा तमाशा’, ११ अंध आणि आठ डोळस कलाकारांचे ‘संगीत समिती स्वयंवर’, १९ अंध कलाकारांचे ‘अपूर्व मेघदूत’ आणि पुन्हा एकदा २७ अंध कलाकारांचे ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकांनी आमच्यासाठी सुख-समाधानाची मालिकाच सुरू केली आहे.
प्रत्येक प्रयोगाच्या वेळचे हे समाधानाचे क्षण केवळ माझ्याच नाही तर या नाटकामध्ये काम करणार्या सर्व अंध कलाकारांच्या आणि ही नाटके पाहणार्या सर्व प्रेक्षकांच्याही आयुष्यात बरसत असतात. सुख-समाधानाच्या या वर्षावात न्हाऊन निघण्यासाठी आपण ही येत जा आमच्या नाटकांना.
– स्वागत थोरात

Leave a Reply