समाधानाचा वर्षाव
‘स्वातंत्र्याची यशोगाथा’ या ८८ अंध कलाकारांच्या विश्वविक्रमी नाटकाचे आम्ही महाराष्ट्रात २५ प्रयोग केले. या काळात या कलाकारांनी ‘आम्हाला ब्रेलमध्ये फारसं काही वाचायला मिळत नाही, सर. तुम्ही आमच्यासाठी ब्रेलमध्ये काही तरी सुरू करा’, अशी आग्रहाची मागणी केली. एकीकडे देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करतो आहे. दुसरीकडे मात्र समाजातील एक मोठा घटक केवळ ब्रेल लिपीतील शालेय अभ्यासक्रमाशिवाय इतर पुस्तके फारशी नसल्याने साहित्याचा आनंद लुटण्यापासून वंचित होता हे धक्कादायक होते. मग सर्वच दृष्टिहीनांची वाचनाची भूक भागवण्यासाठी मी ‘स्पर्शगंध’ हा ब्रेल लिपीतील दिवाळी अंक सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तो दिवस उजाडला… दि. १५ ऑक्टोबर १९९८… वेळ सकाळी ११ वाजताची… पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील अंधशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर उभ्या असलेल्या उज्ज्वला नाईकनवरेची बोटे आपल्या दृष्टीला कोर्या वाटणार्या पांढर्या शुभ्र कागदांवरील उठावदार ठिपक्यांवरून झरझर फिरत होती. ‘‘उठा मुलांनो, उठा… उद्याचा सूर्य तुमच्यासाठी… हसा मुलांनो, हसा’’ ही ज्येष्ठ कवयित्री संजीवनी मराठेंची कविता तिने वाचली आणि ‘स्पर्शगंध’ या ब्रेल लिपीतील पहिल्या दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं आणि अंधांना दिवाळी अंकांतील साहित्याचा आनंद लुटण्याचं समाधान मिळण्यास सुरुवात झाली.
तीन वर्षांनंतर ‘स्पर्शगंध’चा ‘पु. ल. देशपांडे विशेषांक’ काढला. या अंकात केवळ पुलंचे साहित्य प्रकाशित करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्या साहित्याची निवड करण्यासाठी स्वतः सुनीताबाईंनी मला मदत केली होती. (पु. ल. देशपांडे यांचं साहित्य ब्रेल लिपीत वाचावयास मिळावे अशी मागणी मी दिग्दर्शित केलेल्या ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकातील ४४ अंध कलाकारांनी व्यक्त केली होती. आणि ती कल्पना सुनीताबाईंना खूप आवडली होती. मुळात ४४ अंध कलाकार भाईंच नाटक करताहेत ही गोष्टच सुनीताबाईंना अतिशय भावली होती. त्यामुळे त्या आमच्यावर बेहद्द खूष होत्या.) ‘स्पर्शगंध’ दिवाळी अंक महाराष्ट्रातील सर्व अंधशाळा व संस्थांना भेट म्हणून पाठवण्यात आले. त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
माझ्या अंध वाचकांचं वर्षातून केवळ एक दिवाळी अंक वाचून समाधान होत नव्हतं. मी ब्रेल लिपीत दरमहा नियमित नियतकालिक सुरू करावं अशी त्यांची मागणी होती. म्हणून ब्रेल लिपीतील पाक्षिक वृत्तपत्र सुरू करण्याचा धाडसी निर्णय मी घेतला. नावही सुचलं… ‘स्पर्शज्ञान’… स्पर्शाद्वारे मिळणारे ज्ञान. दर पंधरा दिवसांनी नियमितपणे पाक्षिक प्रकाशित करायचं तर माझ्याकडे स्वतःची ब्रेल छपाई यंत्रणा असणं गरजेचं होतं आणि त्यासाठी पैसाही खूप लागणार होता. त्यामुळे मी ‘स्पर्शगंध’ दिवाळी अंकाचे प्रकाशन थांबवले आणि पैसे जमवण्यास (बचत करण्यास) सुरुवात केली. डिसेंबर २००७ मध्ये साडेचार लाख रुपये खर्चून मुंबईत अत्याधुनिक ब्रेल छपाई यंत्रणा उभी केली. यात प्रगत संगणकीय तंत्रज्ञान वापरून कागदाच्या दोन्ही बाजूला ब्रेल लिपीतील उठावांची छपाई करता येते. एकीकडे ही जमवाजमव चालू असतानाच दिल्लीच्या ‘रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया’ यांच्याकडून ‘स्पर्शज्ञान’ या नावाने पाक्षिक वृत्तपत्र सुरू करण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र मिळवलं.
ही सर्व तयारी तर झाली, पण आता ‘स्पर्शज्ञान’ पाक्षिकाचे नियमित अंक सुरू करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. त्यासाठी डोळस आणि सामाजिकतेचे भान बाळगणार्या लोकांनी एका अंकासाठी वर्षभर लागणार्या कागदाचा खर्च रु. ९६०/- वार्षिक वर्गणी (आता ही वर्गणी १४००/- रु. झाली आहे.) म्हणून भरून हे पाक्षिक अंध व्यक्तीस किंवा संस्थेस भेट स्वरूपात द्यावे अशी योजना सुरू केली. नागपूरचे गिरीश गांधी आणि मुंबईच्या पूनम महाजन तसंच प्रा. वीणा देव यांनी दोन अंध मुलींना अंक पाठवण्यासाठी वर्गणी भरली. आणि मुख्य निधी उभा राहिला तो महागाईची वाढती झळ सोसत असतानाही ज्यांची मनं आणि सामाजिक जाणिवा जिवंत आहेत अशा मध्यमवर्गीयांकडून.
१५ फेब्रुवारी २००८ रोजी ‘स्पर्शज्ञान’ हे ब्रेल लिपीतील पहिलं पाक्षिक वृत्तपत्र सुरू झालं आणि अंध बांधवांना वृत्तपत्रसृष्टीची दारं उघडी झाली आणि समाधानाच्या क्षणांची मालिकाच सुरू झाली.
‘स्पर्शज्ञान’चे दिवाळी अंकही त्यातील दर्जेदार साहित्यामुळे चांगलेच गाजत आहेत. या दिवाळी अंकांनाही राज्य पातळीवरील खुल्या स्पर्धेतील इतर नामवंत दिवाळी अंकांवर मात करून पुरस्कार मिळाले आहेत ही आमच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
स्पर्शज्ञानच्या वाचकांची ब्रेल लिपीतील पत्रे ही तर सुख-समाधानाचा ठेवाच आहेत. पहिल्या अंकानंतर पहिलं ब्रेल पत्र आलं ते एका अंध शिक्षकांचं. त्यांनी लिहिलंय ‘स्पर्शज्ञानचा पहिलाच अंक काल मिळाला. माझा माझ्या बोटांवर विश्वास बसेना की मी ब्रेल लिपीतील वृत्तपत्र वाचतोय. मी रात्रभर जागून तो वाचून काढला.’ यंदा स्पर्शज्ञानचं चौदावं वर्ष चालू आहे. आजतागायत आलेली वाचकांची शेकडो ब्रेल पत्रं समाधानाचा वर्षाव करत असतात.
‘स्पर्शज्ञान’साठी लागणार्या कागदाचा खर्च फक्त आम्ही लोकांकडून घेतो. पगार, कार्यालयाचं भाडं, वीजबिल वगैरे आम्ही स्वतः करत असतो. त्यासाठी उत्पन्नातील ७० टक्के रक्कम खर्च केली जाते.
असं म्हणतात की पैशाने समाधान विकत घेता येत नाही. पण मला वाटतं की आपला पैसा योग्य ठिकाणी आणि योग्य सामाजिक कार्यांसाठी खर्च केला तर त्यापासून मिळणारा आत्मिक आनंद आणि समाधान यांची तुलना कशाशीही करता येणार नाही.
– स्वागत थोरात

Leave a Reply