समाधानही लयीच भारी असतंया
इ.स. १९९३ साली अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीवर आधारित ‘काळोखातील चांदणे’ या माहितीपटाचे लेखन करण्याची संधी बालचित्रवाणीतील निर्माते ज्योतिराम कदम यांनी मला दिली आणि अंधांच्या भावविश्वाशी मी जोडलो गेलो. तेव्हा अंधांच्या प्रश्नांचा, त्यांना येणार्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी मी स्वतः घरात असतांना डोळ्यांना पट्टी बांधून वावरणं सुरू केलं. घरातील रोजचे सगळे व्यवहार… दात घासणे, आंघोळ करणे, कपडे बदलणे, जेवण करणे वगैरे सगळं काही डोळे बंद करूनच. यातूनच मी आपल्या इतर ज्ञानेंद्रियांचा पूर्ण क्षमतेने वापर करून येणार्या अडचणींवर कशी मात करता येईल हे शिकत गेलो. आजही मी माझे अनेक व्यवहार डोळे मिटून करत असतो. याचा उपयोग मला अंधांची नाटके दिग्दर्शित करताना तर झालाच पण अंध व्यक्तींना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करून आपले आयुष्य सुलभ आणि सुकरतेने कसे जगता येईल यासाठी मी घेत असलेल्या स्वयंसिद्धता कार्यशाळेच्या (Mobility Workshop) वेळेसही खूप होत असतो.
या कार्यशाळेत पांढऱ्या काठीची माहिती व उपयोग सांगून ती शास्त्रशुद्ध पद्धतीने वापरण्याचे प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष वापर करण्याचा सराव करवला जातो. इतर ज्ञानेंद्रियांचा वापर सक्षमतेने कसा करावा याबद्दलची माहिती देऊन स्पर्शज्ञानाने रोजच्या वापरातील विविध पदार्थ कसे ओळखावेत याचंही प्रशिक्षण दिलं जातं.
आजवर मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, लातूर, अकोला, अमरावती, जळगाव, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी एक तर पुण्यात चार स्वयंसिद्धता कार्यशाळा घेतल्या असून हजारांपेक्षा जास्त अंध व्यक्तींना मोबिलिटीचं प्रशिक्षण दिलं आहे. गेल्या वर्षभरात कार्यशाळा घेणं शक्य झालं नाही तरीही ज्यांना अचानक अंधत्व आलं अशा काही ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून, कोणाच्याही मदतीशिवाय दैनंदिन व्यवहार कसे करावेत याचं प्रशिक्षण दिलं. तेव्हा त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या चेहर्यावरील आनंद मनाला खूप समाधान देऊन गेला.
कार्यशाळेतील प्रशिक्षणामुळे या अंध व्यक्तींमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. या प्रशिक्षणाचा उपयोग त्यांच्या दैनंदिन जीवनात कसा होतो ते मला येणार्या फोन्स, मेसेजेसवरून स्पष्ट कळते!
एकेदिवशी दुपारी तेजस्विनीचा फोन आला. ही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतांना अचानक अंधत्व आलेली एक अतिशय हुशार तरूणी. तिला मी मुंबईहून पुण्याला येऊन मोबिलीटीचे व दैनंदिन गरजेच्या गोष्टींचं खास प्रशिक्षण दिलं होतं.
खूप उत्साहात बोलत होती ती, “स्वागत सर, आज मी खूप खूष आहे.”
“का गं, काय झालं?” मी विचारले.
“अहो, आज आई आणि पप्पांना काही महत्त्वाच्या कामासाठी पहाटे लवकरच बाहेरगावी जायचं होते. पण आई मला एकटीला सोडून जायला तयार नव्हती. अंधत्व आल्यापासून त्यांनी कधीच मला एकटीला राहू दिलं नव्हतं घरी. पण मी तिला ठामपणे माझी काळजी न करता जायला सांगितलं. कुरबूर करत कशीतरी ती तयार झाली आणि गेली. आज सकाळपासून कितीतरी दिवसांनी मी घरी एकटीच आहे.”
“अगं, मग काय केलंस तू?”
“तुम्ही शिकवलात तसा चहा करून प्यायले. तुम्ही सांगितलं होतं तसा वरण-भाताचा कुकर लावला. आता कुकर तयार झालाय. म्हणून सर्वात आधी तुम्हाला फोन केला सर. तुम्ही शिकवलेलं सगळं आज उपयोगी पडतंय. आता थोडा वरण-भात आईसाठी काढून ठेवणार आहे आणि तिला सांगणार आहे की, लेकीच्या हातचा वरण-भात खाऊन बघ आज.”
****
तीन वर्षांपूर्वीची गोष्ट… विलास संसारे, हे तेव्हा महानगर पालिकेत नोकरी करत होते. दोन महिन्यांनी ते निवृत्त होणार होते. मधुमेहामुळे काही काळापूर्वी त्यांची दृष्टी गेली होती. साहजिकच त्या काही दिवसांत त्यांचा आत्मविश्वास आणि एकंदरीतच संपूर्ण आयुष्य ढवळून निघालं होतं. त्यांना पुण्यातील मोबिलीटी वर्कशॉपबद्दल कळलं आणि ते कल्याणहून कार्यशाळेसाठी आले होते.
कार्यशाळेनंतर एके दिवशी विलास संसारे साहेबांचा मेसेज आला.
‘अंधत्व आल्यानंतर काल प्रथमच मी कल्याणमधील माझ्या घरातून कोणालाही बरोबर न घेता एकटाच पांढरी काठी घेऊन कल्याण रेल्वे स्टेशनवर गेलो. तिथून रेल्वेने मनमाडला जाऊन मनमाड रेल्वे स्टेशनवरून पुन्हा एकटाच मनमाडमधील माझ्या घरी सुखरुप पोहोचलो. हा आत्मविश्वास मला केवळ स्वागत सरांच्या मोबिलीटी ट्रेनिंगमुळेच आला. खूप धन्यवाद.’
****
मुंबईत नेहा साने यांच्या ‘येस् आय कॅन फाउंडेशन’ने उशिरा अंधत्व आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या मोबिलीटी वर्कशॉपमधे विठ्ठल अरस यांना मी मोबिलीटीचं प्रशिक्षण दिलं होतं. सत्तरी पार केलेले अरस साहेब दृष्टी गेल्यानंतर गेल्या दहा वर्षांत कधीच एकटे घराबाहेर पडले नव्हते. त्यांचा एक वॉट्सअॅप मेसेज आला…
‘स्वागत सर, तुम्ही दिलेल्या प्रशिक्षणाबद्दल धन्यवाद. मागच्या आठवड्यात पत्नी आजारी असल्याने मी एकटाच पांढरी काठी घेऊन बाहेर पडलो. घरच्यांसाठी नाश्ता घेऊन आलो. बॅंकेत गेलो आणि औषधेही घेऊन आलो.’
****
अशीच एक आठवण आहे…
अंध गजानन लातुरला स्वयंसिद्धता कार्यशाळेसाठी आले होते. कायम एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवून किंवा कोणाचा तरी हात धरून चालणारे… खरं तर त्यांना चालताना एका पावलानंतर दुसरे पाऊल त्याच्यापुढे पडले पाहिजे हेच माहित नव्हते. ते उजवा पाय सरपटवत पुढे टाकला की मग डावा पाय उजव्या पायाशेजारीच आणत आणि लगेच परत उजवा पायच पुढे सरकवत की परत डावा पाय त्या उजव्या पायाशेजारीच टेकवत… त्यामुळे त्यांना दहा पावलांच्या अंतरासाठी वीस पावले टाकावी लागत आणि वेळही दुप्पट लागे… खरे तर त्यांच्या पायात कोणताही दोष नव्हता पण ते असेच अडखळत चालत असत. त्यांनी कोणालाही चालताना पाहिले नव्हते आणि कोणीही त्यांना चालायचे कसे हेही सांगितले नव्हते. मग पांढरी काठी कशी वापरायची ते शिकवणे तर दूरच… त्यांचं ते अर्धवट चालणं पाहून त्यांच्या हातात काठी देण्यापूर्वी मी अक्षरश: खाली बसून हाताने त्यांचे पाय उचलून त्यांना एकापुढे एक पाऊल टाकत चालायला शिकवले… त्यांचा चालण्याचा चांगला सराव झाल्यानंतर मगच त्यांच्या हातात पांढरी काठी दिली तर ते म्हणाले,
“लयी भारी वाटतया सर आज.”
आपल्या कार्याबद्दल अशा प्रतिक्रिया मिळतात तेव्हा मिळणारं समाधानही लयीच भारी असतंया.
स्वागत थोरात

Leave a Reply