खरं तर नाटकं, ब्रेल पाक्षिकं आणि मोबिलीटी यासंबंधातले आनंददायी प्रसंग अनेक आहेत पण आज मी तुम्हाला माझ्या एका वेगळ्याच आनंददायी छंदाबद्दल सांगणार आहे. माझा हा छंद फार थोड्या लोकांनाच माहीत आहे, तो म्हणजे वन्यजीव छायाचित्रण. याबद्दल आणि त्याच्याशी निगडीत एका प्रकल्पाबद्दल सांगायचं म्हणजे इयत्ता सातवीत असताना माझ्या वडिलांनी त्यांचा ‘बुल्स आय’ नावाचा जर्मन बनावटीचा कॅमेरा माझ्या हातात दिला आणि मला छायाचित्रणाचा छंदच जडला. बालपण चंद्रपूरच्या आदिवासी भागात गेल्याने माझ्या मनात जंगलांविषयी, निसर्गाविषयी ओढ निर्माण झाली होती. पुढे प्राण्यांचे व पक्ष्यांचे वर्तनशास्त्र आणि वनस्पतींचे जीवनचक्र हे माझे आवडीचे विषय झाले. त्यासाठी मी वेळ मिळेल तेव्हा तेव्हा भारतातील ५२ राष्ट्रीय उद्याने आणि ३२० अभयारण्यांना भेटी देत अत्याधुनिक कॅमेर्यांनी छायाचित्रण व व्हिडिओ चित्रण सुरू केलं. आजतागायत भारतीय वन्यजीवनाची लाखापेक्षा जास्त छायाचित्रं आणि ४०० तासांपेक्षा जास्त व्हिडिओ चित्रण मी केलं आहे. याचं मी काय करतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना ही छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती दाखवून त्यांना पर्यावरण जतनाचे महत्त्व समजावून सांगून त्यांच्यामध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण करण्याचे प्रयत्न मी सुरू केले आहेत. त्यातील एक अनुभव सांगतो…
कोकणातलं आडबाजूचं एक छोटसं गाव. तीन बाजूंनी टेकड्यांनी वेढलेलं. टेकड्यांवर हिरवीगार घनदाट वृक्षराजी. गावातही मोठ्या प्रमाणावर झाडे. गावाभोवती भाताची आणि नाचणीची शेती. विविध पक्ष्यांची सुस्वर किलबील. गावात जिल्हा परिषदेची छोटीशी सातवीपर्यंतची शाळा होती. शाळेची एकूण पटसंख्या सव्वाशेच्या आसपास. चार वर्षांपासून सलग दोन वर्ष मी या शाळेत सातत्याने जात होतो. त्या विद्यार्थ्यांना पक्ष्यांचे, प्राण्यांचे, वनस्पतींचे फोटो—व्हिडिओ दाखवून निसर्ग व पर्यावरणाविषयी गोडी निर्माण करत होतो. हे करता करता या पुढील काळात पर्यावरण रक्षणासाठी मुलांची भूमिका किती महत्त्वाची ठरणार आहे हे समजावून सांगत होतो. मुलांना व शिक्षकांना हे पटल्यानंतर आता पुढचा टप्पा होता तो पर्यावरण रक्षणात मुलांचा प्रत्यक्ष सहभाग. त्यासाठी सोपी सुरुवात म्हणून मुलांना गावातील मोठ्या झाडांची माहिती गोळा करण्यास सांगितलं. त्यांनी दिसणार्या प्रत्येक झाडाचे नाव आई, वडील, काका, मामा, मावशी, आजी—आजोबांना विचारायला सुरुवात केली. ती व्यवस्थित लिहून ठेवायला सुरुवात केली. मोठी झाडे झाल्यानंतर झुडुपं, वेली, लहान रोपटी, गवत यांचीही माहिती गोळा होऊ लागली. ही सर्व नावं बोली भाषेतील असत. त्या नावांवरुन त्यांची शास्त्रोक्त नावे शोधण्याची जबाबदारी माझ्यावर. या माहितीत त्या झाडाला फुलं कोणत्या महिन्यात येतात, फळं कधी लागतात, त्यांचा काय उपयोग आहे अशी माहिती वाढत जात होती. प्रत्यक्ष गावातील माहितीनंतर परिसरातील वृक्षराजीकडे आम्ही आमचा मोहरा वळवला. मी दर तीन महिन्यांनी तिथं जायचं आणि त्या मुलांबरोबर रानात फिरायचं असं आम्ही सुरू केलं. त्यांना वनस्पतींबरोबरच पक्ष्यांची आणि किटकांचीही ओळख करून देण्यास सुरुवात केली. फोटोत आणि व्हिडिओत पाहिलेले पक्षी प्रत्यक्षात पाहून खूष व्हायची मुलं. सुरुवातीला या छोट्याशा गावातील नऊ मुले आनंदाने माझ्यासोबत सामील झाली. त्यांना मी माझी नवरत्ने म्हणतो.

दर दोन-तीन महिन्यांनी कोकणात भटकंतीला गेलो की माझ्याबरोबर रानावनांत येऊन वनस्पती, पक्षी आणि किटकांचाही अभ्यास करण्याची गोडी निर्माण झालेले हे माझे गावाकडील जंगलमित्र… त्यांना माहिती झालेल्या गोष्टी ते घरच्यांना, इतर मुलांना सांगू लागली. त्यामुळे इतर मुलांच्यातही निसर्गाविषयी गोडी निर्माण झाली. एकाच वर्षात माझ्यासोबत भटकंतीला येणार्या मुलांची संख्या नऊवरून १६ वर पोहोचली. येता–जाता त्यांच्या नजरा निरीक्षणासाठी झाडांकडे वळू लागल्या. असेच एकदा त्यांना रानातील वनस्पती आणि पक्ष्यांबरोबरच कोळ्यांच्या (spiders) विविध प्रजातींची, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्यांचीही माहिती करून दिली होती. जाम खूष झालेली बच्चेमंडळी. त्यांचा तो आनंद पाहून मीही खूष. त्यांना फुलपाखरांबद्दल माहिती द्यायची अजून राहिली आहे.
पण अचानक कोरानाची लाट आली. लॉकडाऊनमुळे दीड वर्षात जाताच आलं नाही तिकडे. सगळं ठप्प झालं होतं. मुलं त्यांच्या परिसरात फिरत होती. पाहिलेल्या पक्ष्यांबद्दल, फुला-फळांबद्दल कळवत होती. आता लॉकडाऊनपासून शिथिलता मिळायला सुरुवात झाल्याबरोबर मुलांचे फोन सुरू झाले… ‘स्वागत सर, कधी येताय? लवकर या… आम्हालाही पक्ष्यांच्या आवाजांवरून पक्षी ओळखायला शिकवा आता.’ (बहुदा त्यांनाही कळलंय की मी अंध विद्यार्थ्यांना पक्ष्यांच्या आवाजांवरून पक्षी ओळखायला शिकवतो ते.)
या सगळ्या मुलांमध्ये निसर्गाविषयी निर्माण झालेली आवड आणि निसर्गाविषयी अधिक जाणून घेण्याची त्यांची ओढ पाहून मी पूर्ण समाधानी आहे.
तुम्हीही लहान मुलांना निसर्गाविषयी… प्राणी-पक्षी-फुलपाखरांविषयी… झाडे-फुले-फळांविषयी सोप्या भाषेत माहिती देऊन त्यांच्या मनात पर्यावरणाची आवड निर्माण करून पहा. खात्रीने सांगतो, त्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहून समाधानाच्या वर्षावात न्हाऊन निघाल तुम्ही.
– स्वागत थोरात
Related