तरूण नेतृत्त्वाने पालटवले गावाचे रूप
एखाद्या गावाला जिद्दी,संयमी, नवनवीन कल्पना कृतीत उतरवणारे,सर्वधर्म समभाव बाळगत सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व मिळाले की त्या गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहत नाही.असंच एक विचारपूर्वकरित्या विकसित केलेले येणीकोणी नावाचे गाव नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात आहे.
पूर्वी या गावांत भौतिक सुविधांचा अभाव होता.मध्यप्रदेशाच्या सीमेलगत असलेल्या या गावाच्या चारही दिशेने दारूचे अड्डे, सट्टा आणि जुगाराचेही गुत्ते चालत होते. गावात जिकडे तिकडे वाहते सांडपाणी वाहायचे, तसेच सर्वत्र गलिच्छपणा दिसत होता. गावात जातीय राजकारण आणि भांडणं होती. जातीयवादाची बीजं खोलवर रूजली होती. त्यामुळे एखाद्याच्या घरी जेवण करणं- पाणी पिणे तर दूरच राहीले ,त्यांच्यासोबत बोलणेही टाळले जात होते. दारूमुळे या गावातील स्त्रियांकरीता असुरक्षित वातावरण असताना अचानक २०१४ मध्ये गावाचे चित्र पालटू लागले.. ते गावातीलच एका तरूणामुळे..!
मनीष फुके असे या युवकाचे नाव असून ते या गावातील माजी सरपंच आहे. सध्या त्यांच्या पत्नीला बिनविरोधपणे सरपंच पदी नेमले गेले आहे. पण मनीष फुकेंनी एवढं केलं तरी काय? त्यासाठी जरा भूतकाळात जावं लागेल.
मनीष फुकेंनी २०१४ पूर्वी युवक- युवती,महिला – पुरूष यांना एकत्रित करून सर्वांगीण विकास मंचाची स्थापना केली. त्या माध्यमातून सर्वात आधी गावातील जुगार व दारूचे अड्डे हद्दपार करण्यास महिलांच्या मदतीने पुढाकार घेतला.त्याच दरम्यान त्यांनी आपल्या भविष्यातील कामासाठी जाहीरनामा बनवून घरोघरी वाटला. त्यांच्या कामाचे स्वरूप बघता गावकर्यांनी मनीष फुके यांना सरपंचपदी निवडून दिले. २०१४ ते २०१९ या कालावधीत जाहिरनाम्यात दिलेली सगळी कामे उरकवून त्यांनी गावकर्यांच्या मनात ठसा उमटवला. गावातील जातीभेदाला मुठमाती देत एकोप्याचे वातावरण निर्माण केले. आज गावातील जातीभेदाचे समूळ उच्चाटन झाले असल्याचे चित्र बघायला मिळते ते गावातील भागवत पारायणाच्या निमीत्ताने..!
या परिवर्तनामुळे साहजिकच गावकर्यांचा पाठिंबा त्यांना मिळत होता. या काळात विरोधकांनी खोट्या तक्रारी दाखल करून फुकेंवर गुन्हेही दाखल केलेत. मात्र तरीही विचलित न होता त्यांनी कामाचा सपाटा सुरूच ठेवला. ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी होते, लोकवर्गणी, खासदार आमदार निधी तसेच जिल्हा विकास निधीच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे गावात सुरू केली.
गटारे बंदिस्त करून सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याणा पुनर्वापर पर्यायाचा अवलंब केला. परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात शोभिवंत झाडे लावली. त्यांना जगवण्यासाठी या सांडपाण्याचा वापर केला.रस्त्यांचे रूंदीकरण करून नाल्यांनाही वेगळे रूप दिले. गावातील नदी नाल्यांचे खोलीकरण केले. त्यावर गरजेनूसार साखळीने सिमेंट बंधारे व कोल्हापुरी बंधार्यांची निर्मिती केली. साठवण तलाव तयार करून जुन्या बंधार्यांची दुरूस्ती केली. पाणलोट व्यवस्थापनातंर्गत शेतीच्या बंधार्यावर काम करून पाणी व्यवस्थापन केले. भुमिगत गटारं आणि शोषखड्डयांना गावातून वाहणार्या मुख्य नाल्याशी जोडले. वाचलेल्या पाण्यासह पावसाचे पाणी जमिनीत मुरविले. यामुळे भुजल पातळीत आपोआप वाढ झाली. विहिरी व बोअरवेलमधील पाणीसाठाही वाढला. बुजलेल्या विहीरींना पुनरूज्जीवित केले. त्यामुळे एकेकाळी कोरड्या पडलेल्या कूपनलिका आणि विहिरींना आता १५ फूट अंतरावरच बाराही महिने पाणी बघायला मिळते.
पिंपळगाव तलाव निर्मितीकरीता ग्रामस्थांनी स्वच्छेने आपल्या जमिनी दान केल्या. घरोघरी शौचालय असतानाही गावात होणार्या कार्यक्रमांत गैरसोय होऊ नये म्हणून गावातही दोन सार्वजनिक शौचालयं उभारली.त्यामुळे गांव हागणदारीमुक्त झाले आहे. या गावात शौचालय स्वच्छतेसाठी, माणसांना न‌ वापरता यंत्रांचा उपयोग केला जातो.
कचरा व्यवस्थापणासाठीही नाफेड टाक्याची बांधणी केली आहे. सर्व घरात कचराकुंड्या असूनही खत खड्डा व नाफेड टाके निर्मितीतून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते.याचा वापर शेतीसाठी, ओल्या कचर्याचे कंपोस्ट तयार करून फळबागांत वापरले जाते. प्लास्टिक कचर्याचा उपयोग रस्तेनिर्मितीसाठी करण्यात येतोय. प्राण्यांना प्यायचे पाणी मिळावे म्हणून हौदांची निर्मिती केली. शिवाय गुरांचा दवाखाना सुद्धा काढला.
फुकेंच्या नेतृत्वात शंभर टक्के लसीकरण करून गाव कुपोषणमुक्त केले. शाळा आणि अंगणवाड्यांना आपल़्या अखत्यारित घेऊन डिजीटल केल्या. या गावात शाळा व्यवस्थापनात राजकीय हस्तक्षेपाला थारा नाही. गावात सर्वत्र सौरपथदिवे लागले आहेत. गावात दोन स्मशानभूमी आहेत, दोन्हीचे सौंदर्यीकरण करण्यात आले असून पांदणरस्ते, क्रीडांगण, व्यायामशाळा, आधुनिक जिम,ग्रिन जिम,आरोग्य उपकेंद्रे तसेच चौकांचे सौंदर्यीकरण केले आहे.
महिला सक्षमीकरणावर गावात विशेष भर देण्यात येतोय. या छोट्याशा गावात सॅनिटरी पॅड व्हेंडिंग आणि डिस्पोजल मशीनही लावण्यात आलंय.
गावात सर्वधर्मसमभावाचे प्रतिक म्हणून भागवत सप्ताह सुरू केला आहे. गावातील बौद्ध विहाराला पर्यटन स्थळाचा ‘क’ दर्जा प्राप्त करून दिला तसेच वर्षावास कार्यक्रमास राजगिरी बौद्ध विहारात हजारोच्या संख्येने भाविक जमतात म्हणून मोठे सभागृह बांधून दिले.या ठिकाणी गौतम बुद्धांची मोठी मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. या गावात अधून – मधून व्यसनमुक्ती कार्यक्रमही घेतले जातात.
गावातून वाहणार्या मोतीनाल्याचे तीन किलोमीटर खोलीकरण करून काठावर भरपूर झाडे लावण्यात आली आहे. कडूलिंब,शिवण,सिसम, आपटा, करंजी, गुलमोहर, बांबू, इत्यादी झाडांसह सिताफळ, पेरू, आंबा, जांभूळ,अशी फळझाडेही लावली आहेत. याकरिता फुकेंनी आपल्या जवळचे लाखो रूपये खर्ची घातले. गावात एकूण सात हजारांवर झाडे लावलीत. सात एकर जमिनीवर ग्रामपंचायतकडून वनौषधी उद्यान तयार करण्यात आले आहे. गप्पी मासे पैदास केंद्राची उभारणी सुरू केली आहे. डासांच्या नायनाट करण्यासाठी फॉगिंग मशीनचा वेळोवेळी वापर करण्यात येतो. ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याकरीता सुसज्ज अशी अभ्यासिका तयार करण्यात आली आहे. गावात ग्राम रक्षक व वनसमिती स्थापन करण्यात आली आहे. गावातील बेसिक गरजांची पूर्तता करण्यात आली असून काही मोठी हातात घेतलेली व मंजूर झालेली कामे विद्यमान सरकारने स्थगित केली आहेत. त्यामुळे गावातील मोठे प्रोजेक्ट खोळंबले आहेत.
या गावाच्या विकासाची दखल घेत या गावावर स्थानिक,तालुका,जिल्हा पातळीवरील पुरस्कारांची बरसात सुरू झाली आहे.या ग्रामपंचायतीला आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सरपंच ऑफ द इयर, स्मार्ट ग्राम पुरस्कार, आदर्श ग्राम, तंटामुक्त पुरस्कार, तसेच सकाळ वृत्तपत्रातर्फे राज्यस्तरीय पुरस्कार तसेच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातंर्गत जिल्हा आणि विभागीय पुरस्कार मिळाले आहेत.
गावकर्यांनी माजी सरपंच मनीष फुके यांच्या संपूर्ण टिमलाच बिनविरोध निवडून दिले. या टिममध्ये फुके यांनी गावात एकेकाळी व्यसनी समजल्या जाणाऱ्या लोकांना घेऊन ही कामांची जबाबदारी दिली.ही जबाबदारी नीट पार पाडा, असे त्यांना सांगून व्यसन आपोआप सोडवले. या लोकांनाही गावात आदर मिळायला लागला. पक्का निश्चय, चांगली नियत आणि मेहनतीची तयारी असेल तर यश मिळतेच हे मनीष फुके आणि सहकार्यांनी सिद्ध करून दाखविले.
लेखन- नीता सोनवणे, नागपूर

Leave a Reply