नाशिक जिल्ह्यातील एक आदिवासी तालुका ही पेठची ओळख. निसर्गसंपन्न भाग असला तरी पाडे – वाड्या, दुर्गम भाग यामुळे शहरी सोयी सुविधांपासून कोसो दूर. करोनाच्या पहिल्या लाटेत या भागात फारसा संसर्ग झाला नाही. पण दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनातून बऱ्या होणाऱ्यांपेक्षा मृतांची संख्या अधिक असल्याचं समोर येऊ लागलं. तालुक्यात या वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची धावपळ होत होती. तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपापल्या इच्छेनुसार आर्थिक मदत दिली. त्यातून ऑक्सिजन सिलेंडर, स्वछता साहित्य आदी आवश्यक गोष्टी घेतल्या जात होत्या.

या सुविधांसाठी सगळीकडूनच प्रयत्न सुरू झाले. त्याचवेळी तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षक संघटनेचाही आपण काय करू शकतो, असा विचार सुरू झाला. केवळ निधी देण्यापेक्षा आपण काही तरी वेगळ्या स्वरुपात मदत करू असं त्यांनी ठरवलं. तालुक्याला सध्या सर्वाधिक उपयोग कशाचा होईल तर तो रुग्णवाहिकेचा हे सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यावर एकमत झालं. तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक यांना समाजमाध्यमातून कल्पना पोचवण्यात आली. यथाशक्ती वर्गणी देण्याचं आवाहन करण्यात आलं. थोड्याच काळात साडेपंधरा लाख रुपये जमा झाले. त्यातून तालुक्यातील कुंभाळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावाने टेम्पो ट्रावलरची खरेदी करण्यात आली. त्यात स्ट्रेचर, रुग्णाचा कॉट, ऑक्सिजन आदी सुविधा तयार करून घेण्यात आल्या. ही रुग्णवाहिका आता पेठ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात उभी करण्यात आली आहे. रुग्णांनाही तिचा मोठा उपयोग होत आहे. पेठ पंचायत समिती आवारात पेठचे आमदार नरहरी झिरवाळ, जि.प. सदस्य भास्कर गावीत यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक समन्वय समिती व गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांचा गौरव करण्यात आला.
– भाग्यश्री मुळे, ता.पेठ, जि.नाशिक
Related