बीड शहरातील ज्या वृद्धांना सांभाळणारं कुणीही नाही अशा 52 निराधारांना दोन्ही वेळचा डबा देणाऱ्या दत्तप्रसाद भोजनालयाची ही गोष्ट. नवी उमेदवर प्रसिद्ध झाल्यानंतर या स्टोरीवर कौतुकाच्या कमेंटसचा अक्षरशः पाऊस पडला. ही पोस्ट आजही वाचली जाते आहे. गेल्या तीन वर्षात दत्तप्रसाद भोजनालयाने काय केलं, त्यांचं काम वाढलं की त्यात काही बदल झाले याची उत्सुकता आमच्या टीमलाही होती. म्हणून नवी उमेदच्या प्रतिनिधीने तिथं भेट दिली.
वाचूया-
नवी उमेदच्या प्रतिनिधीने त्यांच्या या कामाची सकारात्मक स्टोरी फेजबुक पेजला केल्यानंतर सुरूवातीलाच बेंगलोर येथील उद्योजक संजय पाटील यांनी ही स्टोरी वाचून दोन वर्षापूर्वी ५२ निराधारांसाठी घरी अंथरण्यासाठी सतरंजा पाठवल्या होत्या. आता प्रत्येक वर्षी पाटील हे सतरंज्या देत आहेत. तर बीड येथील व्यापारी राजेंद्र मुनोत हे दरवर्षी ब्लँकेट देत आहेत. बीड येथील डॉ.पी.के कुलकर्णी, डॉ.अनिल बारकुल व डॉ.बि.जी. झंवर हे या निराधारांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करत आहेत. २०१८ च्या तुलनेत या प्रसादालयाला मदत करणारे दानशूर सध्या चार पटीने वाढले आहेत. सध्या मराठवाड्यासह मुंबई, नागपूर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, नगर, सांगली, कोल्हापूर इथून मदत मिळत आहे. याच मदतीतून निराधारांना दोन घास मिळत आहेत. अमेरिकेतून अभियंता अव्दैत प्रकाश कुलकर्णी यांनी सुध्दा आर्थिक मदत केली.
दत्त प्रसादालयाचे अध्यक्ष शिवशंकर कोरे यांच्या पुढाकारातून आता ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. दत्त प्रसादालयाच्या परिसरात दत्ताचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारच्या पाच हजार स्केअर फूट जागेत मिळालेल्या आर्थिक मदतीतून, लोकसहभागातून आणि ट्रस्टच्या पुढाकारातून तीन लाख रूपये खर्च करून गार्डन तयार झाली आहे. या बागेत सध्या सेवानिवृत्तांना चालण्यासाठी वॉकींग पॉईंट, बसण्यासाठी बाकडे, शौचालय, प्रसाधनगृह तयार करण्यात आलं आहे. या बागेत सप्तपर्णी, नारळ, गुलाब, चाफा, अशोक अशी विविध प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत.
मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये बीडमध्ये या नेहमीच्या 52 जणांसोबत दत्तप्रसाद भोजनालयाने जवळपास दोनशे लोकांना दररोज जेवनाचा डबा देऊन मदत केली आहे.
– दिनेश लिंबेकर, बीड