तुमच्या घराच्या दारावर कुणाच्या नावाची पाटी आहे?
24 ऑक्टोबर 2016 ची ही गोष्ट. नवी उमेदवर “लोककारणार्थ” या मालिकेत “तुमच्या घराच्या दारावर कुणाच्या नावाची पाटी आहे?” ही पोस्ट प्रकाशित झाली होती. (पोस्ट लिंक – https://www.facebook.com/naviumed.org/posts/1726604150996077) तेव्हा ही पोस्ट जवळपास 61 हजार लोकांपर्यंत पोहोचली. ही पोस्ट प्रकाशित झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांत काय घडलं याची आम्हालाही उत्सुकता होती. त्याविषयी वाचूया –
माझी लेक माझा सन्मान या उपक्रमअंतर्गत मुलीच्या नावाची पाटी घरावर लावून मुलीचा सन्मान करत तिला पाठबळ देणे, ती या कुटुंबाची अविभाज्य घटक आहे हा संदेश देण्याचं काम जालन्यातील दादाभाऊ जगदाळे सरांनी स्वतःच्या घरावर मुलीच्या नावाची पाटी लावत सुरू केलं. जालन्याच्या शिक्षण व प्रशिक्षण केंद्रात दादाभाऊ जगदाळे कंत्राटी पद्धतीने साधनव्यक्ती पदावर काम करत आहेत.
त्यांची ही संकल्पना खूप जणांना आवडली. कित्येकांनी ती अमलात आणली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कन्या दिशा, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी कन्या दर्शना आणि पत्नी सिमा, माजी पाणी पुरवठा मंत्री व आमदार बबनराव लोणीकर यांनी कन्या भक्ती ,तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्नी निर्मलाताई, अनिरुद्ध खोतकर यांनी श्रध्दा, सतीश टोपे यांनी प्राची व सई दोघींच्या नावाची पाटी घरावर लावून मुलींचा सन्मान वाढवला.
नंतर त्यांच्या या संकल्पनेला औरंगाबादेतील पत्रकार, सध्या Etv भारतचे औरंगाबादचे प्रतिनिधी अमित फुटाणे व त्यांच्या पत्नी वैशाली यांनी खूप विशाल रूप दिलं. त्यांच्या मेधावी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. मेधावी ही वैशाली व अमितज फुटाणे यांची कन्या. तिच्या नावाची पाटी अभिमानाने आपल्या घरावर लावत त्यांनी शेकडो घरात ही संकल्पना राबवली.
दादाभाऊ जगदाळे हे जिल्हापरिषदेत कंत्राटी जरी असले तरी मनापासून आपल्या स्वतःच असल्यासारख काम करणारी व्यक्ती मला भेटली असं अमित फुटाणे सांगतात. दादाभाऊ यांनी काही गावांमध्ये मुलींच्या आणि महिलांच्या नावांच्या पाट्या त्यांच्या घरावर लावल्या. घरातील स्त्रीचा सन्मान करण्यासाठी त्यांनी एक प्रयत्न केला. मात्र त्यांना मर्यादा होत्या. त्यावेळी बातमी करताना हा उपक्रम मनाला आनंददायी ठरल्याचं अमित सांगतात. घरी आल्यावर दोन तीन दिवस त्याच उपक्रमाचा विचार करत होतो. नंतर मनात विचार पक्का करत पत्नी वैशालीसह हा उपक्रम सुरू ठेवायचा निश्चय केला. सुरुवातीला 20 नेम प्लेट तयार केल्या, त्याही दादाभाऊंच्या हस्ताक्षराने तयार करून घेतल्या. मात्र दुसऱ्या वर्षी त्याला डिजिटल रूप देत, प्रिंटेड प्लेट तयार केल्या. दर वर्षी हा आकडा 150 च्या जवळ गेला आहे. एक वर्ष कोरोनामुळे खंड पडला असला तरी यावर्षी पुन्हा उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे आणि सध्या जवळपास 100 जणांची प्रतीक्षा यादी आहेच. मुलीच्या सन्मानासाठी सरसावलेल्या या जोडप्याला औरंगाबादेत खूप जोरदार प्रतिसाद मिळाला.
औरंगाबादेतील विनोदजी पाटील, दै.सकाळचे संपादक दयानंदजी माने, पुढारीचे संपादक संजयजी वरकड, डॉ राजू लोखंडे, साम टीव्हीचे माधव सावरगावे, झी 24तासचे विशाल करोळे, दूरदर्शनचे महेश डागा व त्यांची मित्र मंडळी, तसेच गणेश वाघ, अतुल व पूनम पाटील, शेख लाल शेख यांच्यासह शेकडोंनी भरभरून प्रतिसाद देत लेकीच्या नावाची पाटी घरावर लावली. जालना जिल्ह्यातून सुरू झालेला हा प्रवास औरंगाबादेत चांगला रुजला.
हा उपक्रम पाहून अनेक नागरिकांनी स्वतःहून संपर्क करत मुलीच्या नावाची पाटी देण्याची विनंती केली आहे.
– अनंत साळी, जालना

Leave a Reply