आठवड्यातून केवळ एक दिवस, एक तास भरणाऱ्या शाळेची गोष्ट वाचायची आहे? चला तर मग –
हिंगोलीच्या आण्णा जगताप या शिक्षकाने सुरू केलेली ही शाळा म्हणजे निसर्ग शाळा. झालं असं की मागच्या वर्षी जगताप सरांनी ‘एक मूल तीस झाडं’ हे अभियान सुरू केलं. ते यशस्वी झालं. नंतर लॉकडाऊन झालं आणि हे सगळं थांबलं. बाकी शाळा जशा ऑनलाईन चालतात तसा हा प्रयोगही ऑनलाईन करून पाहावा असं सरांच्या मनात आलं आणि आठवड्यातून एक दिवस सगळ्यांनी झूमवर भेटायचं ठरलं.
निसर्गाच्या शाळेची सुरुवात 1 मे 2021 रोजी झाली. लगेचच ही शाळा पालभर, मुंबई, नाशिक, रायगड, ठाणे, नवी मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रातील 31 जिल्ह्यात पोहचली. गोव्यातील तीन भागात तर आंध्रातील हैद्राबाद इथली काही मुलं तसंच सौदी अरेबियातून आर्यन आणि गौरवी हे दोघंही या शाळेत येतात. 14 वर्षाखालील 800 पेक्षा अधिक विद्यार्थी आता या शाळेत आहेत. निसर्गशाळेच्या सहाव्या आणि सातव्या तुकडीचं नुकतंच उद्घाटन झालं.
जगताप सरांची ही शाळा काय करते, तर मुलांच्या अंगी शेती, माती, झाड, पाणी, एकूणच निसर्गविषयक जाणिवा तयार करण्यासाठी प्रयत्न करते. मुलांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाणं गरजेचं आहे. त्यासाठी निसर्गाचं जतन कसं करायचं हे ही शाळा शिकवते.
या निसर्ग शाळेत सध्या 1200 मुलं आहेत. आठवड्यातून एक दिवस शाळा भरत असली तरी बाकीचे दिवस मुलांनी प्रत्यक्ष काहीतरी कृती करणं अपेक्षित असतं. त्यानुसार या शाळेतील पहिल्या पाठांतर्गत 300 विद्यार्थी घरच्याघरी फळझाडांची रोपवाटीका तयार करायला लागली आहेत. नियोजित अभ्यासक्रम, अनेक उपक्रम, प्रकल्प या शाळेत आहेत. तशाच परिक्षा, अभ्यासक्रम, प्रमाणपत्र, बक्षिसंही आहेत. दर आठवड्याला उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार दिला जातो.
महाराष्ट्रातील पन्नासहून अधिक तज्ञांचं मार्गदर्शन सध्या मुलांना मिळतं आहे. यामध्ये प्रा. ज्ञानोबा ढगे, रवी देशमुख, बाळासाहेब राऊत, प्रेमानंद शिंदे, बाळू बुधवंत, श्याम राऊत, गोविंद दळवी, विलास जाधव, अनिता गायकवाड, सदा वडजे, रतन आडे, संजय मुसळे, प्रा. रेवती गव्हाणे. ही ‘एक मूल तीस झाडे’ अभियानाचे सर्व शिक्षकमित्र शाळेला मदत करतात. शाळा मुलांचे भविष्य घडवत नाही तर मुलांना भविष्यासाठी घडवते, असं निसर्ग शाळेचे प्रमुख आण्णा जगताप म्हणतात.
– बाळासाहेब काळे, हिंगोली
Related