तिच्या आयुष्याची डबल बेल (भाग तीन )
”एसटीनं माझा संसार सावरला”-मीनाक्षी वायंडे

एसटी महामंडळाच्या नाशिक आगारात कार्यरत असलेले राजेंद्र वायंडे यांचं ड्युटीवर असताना अपघाती निधन झालं. चार वर्षांनी २००१ मध्ये त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर त्यांच्या पत्नी मीनाक्षी वायंडे यांना काम करण्याची संधी मिळाली. पदरी चार मुलं असल्यानं खरं तर त्यांना नोकरीची गरज होती मात्र वाहक म्हणून काम करण्याची खात्री वाटत नव्हती. आजवर अशी काही वेळ आली नव्हती आणि एकाचवेळी तिकीट काढणं, पैसे घेणं, हिशोब ठेवणं, प्रवाशांवर लक्ष देणं, वेळीअवेळी असणाऱ्या ड्यूटीज अशा अनेक् गोष्टी करणं जमेल का या विचारानंच त्या गांगरून गेल्या होत्या. पण म्हणतात न पाण्यात पडलं की पोहोता येतं. मीनाक्षीताईंच्या बाबतीत असंच झालं. अंगावर पडेल त्या जबाबदाऱ्या त्या पार पडत गेल्या. आज त्यांच्या नोकरीला २२ वर्ष होत आली असून आता सात-आठ वर्षात त्या सेवानिवृत्त होतील.

आपल्या या प्रवासाबद्दल मीनाक्षीताई सांगतात, ”एसटीनं माझा संसार सावरला. त्याबद्दल मी महामंडळाची कायम ऋणी राहील. माझं माहेर मालेगाव जवळील रोन्झाणे इथलं तर सासर पेठचं. दहावीपर्यंत शिक्षण झालं. खरंतर मला शिक्षक व्हायचं होतं पण नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. पती निधनानंतर इतर कशाचा विचार करायला वेळच मिळाला नाही. २००१ साली अनुकंपा तत्वावर आम्हा ६ जणींचं प्रशिक्षण सुरू झालं. तिकीट कसं काढायचं, पैसे कसे लावायचे, हिशोब कसा ठेवायचा अशा सगळ्या गोष्टी करताना सुरवातीला तर माझी धांदलच उडत होती. रडू यायचं, त्यात घरी ६ महिन्यांचा मुलगा सोडून आलेले असायचे. पण सहकाऱ्यांनी परिस्थितीची जाणीव करून दिली. ते म्हणाले की, ‘आता हिंमत दाखवून शिकली नाहीस तर नोकरी जाईल, पुढे काहीच करत येणार नाही.’ त्यामुळे मीही हिंमत गोळा करून कामाला लागले. प्रशिक्षण संपल्यावर पहिल्या दिवशी सीबीएस ते भगूर ड्युटी केली. त्यादिवशी महिला वाहक म्हणून काम सुरु केल्यानं  आणि हा प्रकार नवीन असल्यानं  माझा फोटो आणि बातमी छापून आली. त्यामुळे खूप छान वाटलं. काम करायला हुरूप आला. त्यानंतर नाशिक- त्रंबकेश्वर ड्युटी मिळाली. वरिष्ठ खूप सहकार्य करायचे. आईवडिलांनी मुलांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली. म्हणून मी काम करू शकले” ,ही गोष्ट मीनाक्षीताई  आवर्जून नमूद करतात.

 या मार्गावर  काम केल्यानंतर पुढची  ८ वर्ष त्यांना नाशिक-कसारा या मार्गावरची  ड्युटी मिळाली. त्यानंतर नाशिकच्या महामार्ग बस स्थानकावर त्यांनी ३ वर्ष रिझर्वेशन ड्युटी सांभाळली. त्यानंतर काही वर्ष जुन्या सीबीएसला नियंत्रक म्हणूनही काम केलं. आता सध्या त्यांना औरंगाबाद, धुळे, बोरीवली अशा ड्युटी लागतात. रोज कामावर यायचं, किती वाजता, कुठली ड्युटी लागेल याची काहीच कल्पना नसते. घरी परतायला किती वाजतील हे पण सांगता येत नाही. पण आता या गोष्टी अंगवळणी पडल्या असल्याचं मीनाक्षीताई सांगतात. या काळात त्यांना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. माणसं वाचता यायला लागली. ड्युटी करत असताना महिला प्रवासी चांगल्या प्रतिक्रिया देतात. भरभरून बोलतात. आजवरच्या प्रवासात त्यांना कधी अपघात वगैरेचे सामना करावा नाही लागला. पण लांबपल्ल्याचे प्रवास, ते संपवून नाशिकला यायला होणारा उशीर आणि तिथून दूर पंचवटीतलं  घर गाठण्याची कसरत मात्र अनेकदा करावी लागली. ती आजही करावी लागते. एकदा नंदुरबारहून नाशिकला येताना रस्त्यात बस बंद पडली. ती दुरुस्त होऊन नाशिकला यायला रात्रीचे बारा वाजले. आता यानंतर घरी कसे जायचे हा प्रश्न होता. शेवटी त्यांनी शालिमारला राहणाऱ्या नणंदेला  फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. तिने भाच्याला घ्यायला पाठवले. रात्रभर तिच्याकडे थांबून मग या सकाळी घरी गेल्या. हल्ली महिला वाहक म्हणून काम करणाऱ्या बहुतांश जणी स्वत:ची दुचाकी घेऊन येतात. ड्युटी संपल्यावर स्वत:च्या गाडीवर घरी जातात. पण मीनाक्षीताईंसारख्या काहींना या गोष्टी जमत नाही. यावर काहीतरी तोडगा निघावा अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात.

मीनाक्षीताईंना  दोन मुली, दोन मुले. आज त्यांचा मोठा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे. दुसरा मुलगा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतो आहे. दोन्ही मुली पदवीधर झाल्या आहेत. तिघांची लग्न झाली असून मुलाबाळासह त्यांचे संसार सुरू आहेत. आजवरच्या प्रवासाबदल त्या म्हणाल्या, ‘प्रवाशांशी तुम्ही कसे वागतात त्यावर त्यांची वागणूक अवलंबून असते. लोक चांगलेही असतात आणि वाईट वृत्तीचेही. आपण यातून सुवर्णमध्य साधत आपला मार्ग काढत राहावा.’ असे त्या सांगतात. महामंडळाच्या सेवेत काम करताना मिळालेली अनुभवाची शिदोरी लाखमोलाची असल्याचं त्या अभिमानानं नमूद करतात. 
– भाग्यश्री मुळे

Leave a Reply