तिच्या आयुष्याची डबल बेल (भाग दोन ) कोकणी रस्त्यांवर प्रवाशांना सुखरूप घेऊन जाणारी संपदा
रत्नागिरीतल्या सावर्डा गावची संपदा पंडित ही मुख्याध्यापकाची मुलगी. कोकणातच लहानाची मोठी झाली. घरी आई, वडील, भाऊ आणि ही. पदवी पूर्ण झाल्यावर काहीतरी वेगळ करायचं म्हणून वाहक पदासाठी अर्ज केला. २००५ मध्ये  रायगड आगारातून तिला प्रशिक्षणासाठी बोलावणं आलं. मुख्याध्यापकाची मुलगी कंडकटर कशी होते ? हाच सगळ्यांना प्रश्न पडायचा. पण काहीतरी वेगळं  करायचं यावर ही ठाम. 
 
रायगडमधल्या रामवाडी इथं २००५ मध्ये  १५ दिवसाचं प्रशिक्षण झालं. त्यात ८ दिवस मॅन्युअल तर ८ दिवस प्रत्यक्ष ट्रेनिंग. त्याकाळी तिकीट द्यायला मशीन नव्हतं. मॅन्युअल  ट्रेतून  कागदी तिकीट द्यावं लागायचं. प्रशिक्षण झाल्यावर पहिलीच ड्युटी महाडला लागली. ती देखील लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाण्याची. नवरानवरीसह सगळं वऱ्हाड लग्नस्थळी  घेऊन जाणं आणि घेऊन येणं ही संपदाची पहिली ड्युटी. वऱ्हाडी मंडळींची तिकीट आधीच काढलेली होती पण येताना जे जास्तीचे प्रवासी येणार होते त्यांचे तिकीट काढावे लागणार होते. वऱ्हाड गावी पोहोचताच नवरानवरीपेक्षा बसमध्ये कंडक्टर महिला आहे हे कळताच सगळं गाव बसभोवती जमा झालं. हिला कंडक्टर वेशात पाहून आश्चर्य व्यक्त करून झालं. चांगलं काम कर, अशा शुभेच्छा सर्वांनी दिल्या. मगच मंडळी लग्नाकडे वळली. कोकणी पद्धतीचं  छान लग्न पार पडलं. वऱ्हाडींना घेऊन संपदा सुखरूप परतली. त्यानंतर रोजची ड्युटी सुरु झाली. हिचा स्वभाव शांत. कुणाशी विनाकारण बोलायला हिला आवडायचं नाही. पण  या भागात शांत बसून कंडक्टर  म्हणून काम करत येणार नाही याची वरिष्ठांनी  तिला कल्पना दिली. दिवसभर तर्हेतर्हेचे प्रवासी. स्थानिक, पर्यटक असे सगळेच. 
 
सायंकाळी बसमध्ये निम्मे प्रवासी मद्यसेवन करूनच असायचे. अशा प्रवाशांना तिकिट देणं, पैसे घेणं, त्यांनी शांततेत प्रवास करणे या गोष्टी आव्हानात्मक होत्या. संपदा सांगते, ‘एवढ्या शांत राहू नका, बोलायला लागा’ हा संदेश येताजाता माझे वरिष्ठ मला द्यायचे. त्यामुळे मी माझ्यात बदल करत गेले. बुजरेपणा सोडून आत्मविश्वासाने वावरू लागले. आज त्याचा फायदा जाणवतो. संपदाला आता एसटी महामंडळात काम करण्यास १८ वर्ष झाली. महाड ते मुंबई, पुणे, ठाणे, बोरीवली, श्रीवर्धन अशा  लांबपल्ल्याच्या ड्युट्या अनेक वर्ष केल्या. अजूनही करते. आता ती चिपळूण आगारात कार्यरत आहे. 
 
सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवासी यांचे वाद ही नित्याची बाब. पण संपदा पहिल्यापासून स्वत:जवळ सुट्टे पैसे ठेवते. त्यामुळे तिला या गोष्टीचा कधी त्रास झाला नाही. पण सकाळी कॉलेजला जाणाऱ्यांची गर्दी आणि इतर प्रवाशांची गर्दी एकदम झाल्यावर सुवर्णमध्य साधण्याचं कसबही तिनं अनेकदा दाखवलं आहे. तीच गत तिकीटदर वाढल्यावर प्रवाशांकडून मिळणाऱ्या असहकार्याची. संपदा सांगते, ”तुम्हाला पगार, पगारवाढ, भत्ते पाहिजे म्हणून तुम्ही आमच्याकडून जास्त पैसे घेतात असे म्हणत अनेकदा प्रवासी वाद घालायचे. मग त्यांना वरतूनच दरवाढीचा आदेश आल्याचं समजावून सांगावं लागायचं. तेंव्हा कुठे त्यांना ते पटायचं. परिस्थितीनं  गांजलेले प्रवासी त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी असे काहीबाही बहाणे शोधात असायचे पण आमचाही नाईलाज असायचा,” संपदा नम्रतेनं नमूद करते. 
 
ड्युटी संपण्यास रात्री उशीर होणं या गोष्टीला अनेकदा सामोरं जावं लागतं. त्यात भर रस्त्यात बस बंद पडली तर बोलायलाच नको! संपदालाही असा अनुभव आला. ती कोकणात लहानाची मोठी झाल्यानं तिला शहरी भागाची सवय नव्हती. एकदा मुंबईहून महाडला परत येत असताना मध्यरात्री पनवेलजवळ बस बंद पडली. संपदा काहीशी घाबरली होती. पण सहकारी चालकांनी तिला धीर दिला. ‘रात्री कितीही उशीर झाला तरी तुला सुखरूप तुझ्या घरी पोहोचवूनच मी घरी जाईन, घाबरु  नको’ असं सांगितल्यावर तिला हायसं वाटलं. ती महाडला पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. तिथल्या घरमालकांना त्यानंतर उशीर होऊ शकतो कधीतरी याची कल्पना देण्यात आली. 
 
कोकणातून प्रवास करणं हे कायमच आव्हानात्मक आहे. उन्हाळा, पावसाळा अनेक प्रश्न घेऊन येतात. पाणी साचल्यानं  रस्ता बंद होणं आणि भर रस्त्यात बस उभी ठेवावी लागणं, अशी वेळ अनेकदा आल्याचं संपदा सांगते.  दरड कोसळल्यानं अचानक बसचे मार्ग बदलले जातात, अशा वेळी संयमानं काम करावं लागतं, असे अनुभवाचे बोल संपदा आता अभिमानानं सांगते.बसमधून वर्षानुवर्षे प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी आता तिची चांगली गट्टी जमली आहे. डॉक्टर-इंजिनिअर होऊन पुण्या-मुंबईत स्थिरावलेली  अनेक मुलंमुली  कोकणात येताना संपदाला ओळख देतात. ‘तुमच्या सोबत आम्ही रोज प्रवास करायचो, आम्ही चुकलो तर तुम्ही हक्काने ओरडत होतात, म्हणूनच आज यशस्वी होऊ शकलो’ असं सांगतात तेंव्हा संपदा भरून पावते.
— भाग्यश्री मुळे

Leave a Reply