भाड्याची सायकल, कुशावर्त कुंडात पोहोणं, पडद्यावरचा सिनेमा…

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, समुद्र सपाटीपासून १८०० फूट उंच, निसर्गरम्य परिसराने नटलेलं, ऐतिहासिक, पौराणिक, अध्यात्मिक अधिष्ठानाने संपन्न, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव म्हणजे श्री क्षेत्र त्रंबकेश्वर. वेदविद्या व वेदांगे यांच्या अभ्यासाची उत्कृष्ट परंपरा हे या नगरीचं वैशिष्टय. पवित्र नदी गोदावरीचे उगमस्थान असणाऱ्या त्रंबक नगरीची वैशिष्ट्ये म्हणजे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे समाधीस्थान, भारतातील कुंभमेळ्याच्या चार ठिकाणांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण, चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे जन्मस्थान अशी कितीतरी बिरुदं या सन्मानांनी मिरवणार हे गाव आज काळाबरोबर चालायला लागलं आहे. आपलं जुनं रूप बदलून काळाच्या वेगाबरोबर धावत आहे. आमच्या गावाने आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे.

जुन्या वाड्यांच्या जागी सिमेंटच्या इमारती उभ्या राहत आहेत. पंचतारांकित हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंग, पंजाबी, चायनीज आदी भौतिक सोयीसुविधा गावाने केव्हाच आपल्याश्या केल्या आहेत. येणारा प्रत्येक कुंभमेळा गावाच्या विकासात योगदान देणारा ठरतो आहे. पूर्वीचं पाच पन्नास वाड्यांचं कौलारू घरं असलेलं गाव आज कोट्यावधींची उलाढाल करणारं महत्त्वाचं पर्यटन क्षेत्र बनलं आहे. दररोज हजारो भाविक, पर्यटक त्रंबकेश्वर येथे येऊन धार्मिक विधी करतात, गावाला भेट देतात. या शहरी पर्यटकांना त्यांच्या शहरी सोयी सुविधा पुरवण्यासाठी कारागीर देशाच्या कानाकोपऱ्यातून त्र्यंबकला येऊन स्थायिक झाले आहेत. थोडे वाडे आणि मोजकी कौलारू घरं या सगळ्यात   आजूबाजूला असणारं मोकळं मैदान यामुळे पावसाळ्यात तर जंगलच वाटायचं. चहू बाजूंनी दाट झाडी. वाघ, लांडगे जंगलात गुण्यागोविंदाने नांदत. आज ती झाडेही नाहीत आणि प्राणीही नाहीत.

गावाकडे येणाऱ्या भाविकांची संख्या अतिशय कमी असायची कारण प्रवासाची साधने मर्यादित होती. गरिबी होती. मोठे वाडे असले तरी त्यात बऱ्याचदा एकवेळची चूल पेटण्याचीही शाश्वती नसायची. दर बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याने गावाचं रूप पालटू लागलं. गावाला श्रीमंती, ज्ञान, प्रतिष्ठा, प्रसिद्धी दिली आहे. काळाबरोबर धावण्याचा वेग दिला आहे. पूर्वी येथील लोकांचा आर्थिक विवंचनेत जाणारा सर्व वेळ आज मनोरंजन, राजकारण, समाजकारण, तंत्रज्ञान, विद्यार्जन या गोष्टी करण्यात सत्कारणी लागतो आहे. ब्राह्मण समाजाकडे होणाऱ्या धार्मिक विधींमुळे ब्राह्मण समाजाबरोबरच इतर समाजाच्या सर्वांगीण विकासात योगदान दिलं जात आहे. पर्यायी उद्योग, व्यवसाय करण्यास चालना दिली जात आहे. स्थानिक जनतेलाच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या बेरोजगारांना आपल्यात सामावून आणि पर्यायाने स्थैर्य देण्याचं काम गावाने केलं आहे. छोट्या गावाचं रुपांतर शहरात झाल आहे. आज जिल्हा व राष्ट्रीय बँका, पतसंस्था, पंचतारांकित  हॉटेल, समाज मंदिर, आखाडे, व्यायाम शाळा आदी संस्था दिमाखदारपणे गावात उभ्या राहिल्या आहेत. आज गावात टीव्ही, वृत्तपत्रे, पुस्तके, मासिके, रेडिओ, इंटरनेट, वायफाय, अत्याधुनिक जिम अशा  सर्व गोष्टी आहेत. म्हणजेच गाव आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे.

आजचं निमशहरी गाव पूर्वीच्या काही गोष्टींचा आनंद देण्यात मात्र कमी पडत असल्याचं मला  जाणवतं. गावात पूर्वी सिनेमा थिएटर होते, आज त्यातील एकही नाही. पूर्वी दिवाळी आणि मे  महीन्याची सुट्टी लागली की पन्नास पैसे, एक रुपया प्रती तास भाड्याने सायकल मिळायची. सायकलवरून गावभर मनसोक्त हुंदडता यायचं. कितीतरी पिढ्या कुशावर्ताच्या पाण्यात सूर मारून, डबे बांधून पोहायला शिकल्या. आज तेच कुशावर्त कुंड भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त झालं आहे. पोहोण्याची मजा गेली ती गेलीच. पूर्वी नवरात्रात गायत्री देवी मंदिराच्या पटांगणात पडद्यावर सिनेमा दाखवला जायचा. तेव्हा पाहिलेले धार्मिक सिनेमे आजही कित्येकांच्या स्मृतीत आहेत. जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने पावसाळ्यात, उन्हाळ्यात मिळणारा रायवळ आंबा, करवंद, जांभूळ, फणस, रानभाज्या आदी रानमेवा मिळण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. जंगलतोडीमुळे जंगलातले बिबटे, माकड आदी प्राणी अन्नाच्या शोधात गावात शिरू लागले आहेत. इथल्या डोंगरांवर आढळणाऱ्या दुर्मिळ वनस्पती काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. शांत, क्वचित गर्दी असणारं गाव आज २४ तास गर्दीने फुलून गेलेलं पाहायला मिळतं.

गाव बदललं हे खरं असलं तरी गावाला काही समस्या आजही भेडसावत आहेत. गावाला रेल्वे हवी आहे, पुरेसं पाणी हवं आहे, अत्याधुनिक हॉस्पिटल्सची गरज आहे, विसावा घेण्यासाठी बाग हवी आहे, उच्च शिक्षणाच्या सोयी हव्या आहेत, उच्चशिक्षित बेरोजगारांना कामाची संधी हवी आहे, अभ्यासिका, वाचनालय हवे आहे, क्रीडांगण हवे आहे. लहानसहान गोष्टींसाठी ऊठसूट नाशिककडे पळायला लागू नये अशी त्रंबककरांची इच्छा आहे.

  • भाग्यश्री मुळे

Leave a Reply