सगळ्या बंधनांना, मर्यादांना झुगारून, अडचणींवर मात करत, एकमेकांचा हात हातात घेऊन
ताठ उभं राहतं, ते खरं प्रेम- अशी प्रेमाची व्याख्या आपण कित्येकदा ऐकतो. पुणे जिल्ह्यातील पिंपरी- चिंचवड परिसरात गेल्या वर्षी 22 जुलै 2022 रोजी हे वाक्य सत्यात उतरवणारा एक विवाह झाला- रूपा टांकसाळ आणि प्रेम लोटलीकर यांचा. हा महाराष्ट्रातील पहिला ट्रान्सवुमन आणि ट्रान्समॅनचा विवाह आहे. म्हणजे काय? तर रूपाचा जन्म पुरूष म्हणून झालेला, नंतर वयात येताना आपण बाई आहोत हे जाणवल्यानं, त्या तृतीयपंथिय समाजात सहभागी झाल्या, यथावकाश त्यांची लिंगबदलाची शस्त्रक्रिया झाली. तसंच प्रेम लोटलीकर हे मुलगी म्हणून जन्माला आले होते, पण त्यांच्यात आपण बाई नाहीत तर पुरूषच आहोत ही भावना ठामपणे वाढत गेली आणि लिंगबदल शस्त्रक्रियेने ते पुरूष झाले.
या दोघांचा हा प्रवास सोप्पा होता का? रूपा यांचा तर नाहीच नाही. रूपा मूळच्या विदर्भाच्या बुलडाणा जिल्ह्यातील. वयात येताना त्यांना आपण पुरूष नाहीत हे जाणवायला लागलं, त्यात त्यांचे वडील अकाली गेले. घरात धाकटी बहीण, तिलाच विश्वासात घेऊन रूपाने आपल्या आयडेंटिटी बद्दल सांगितलं. बहिणीने भावाचं हे वेगळं रूप स्वीकारलं, “तुला तुझं आयुष्य मनासारखं जगायचा अधिकार आहे पण मला आणि आईला कधीच विसरू नकोस, कायम संपर्कात राहा” अशी विनवणी केली. अर्थातच आई- बहिणीची ही मागणी मान्य करत रूपा बाहेर पडल्या आणि नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या रेणुकादेवी संस्थानात येऊन राहिल्या. तिथं तृतीयपंथिय समाजाच्या परंपरेनुसार त्यांनी गुरू केला, भिक्षा मागून आयुष्य जगायला सुरूवात केली. तिथं लोकांच्या छान ओळखी झाल्या, काही सामाजिक कामही जमायला लागलं. भिक्षा मागून आणलेल्यातला एक हिस्सा या तृतीयपंथियांना आपल्या गुरूला द्यावा लागतो, तिथं रूपा यांनी बऱ्यापैकी पैसा जमवून आपलं एक घर विकत घेतलं. पण दुर्दैवाने त्यांच्या गुरूने ते घरच त्यांच्याकडून लुबाडून स्वत:च्या नावावर करून घेतलं.
या फसवणुकीचा धक्का फार जिव्हारी लागला. रूपा यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले होते, आणि माहूरच्या जनसंपर्काने, सामाजिक कामाच्या आवडीने आपण काही चांगलं, वेगळं स्वबळावर करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना आला होता. रूपा पुण्यात आल्या आणि आधी डॉ. अभिजित सोनवणे यांची असिस्टंट म्हणून आणि नंतर महाराष्ट्रातील पहिलं तृतीयपंथियांसाठीचं क्लिनिक असलेल्या ‘मित्र’ क्लिनिकसोबत समुपदेशनाचं काम करू लागल्या. या क्लिनिकमध्ये काम करताना त्यांची तृतीयपंथिय समुदायाच्या वेगवेगळ्या प्रश्नांशी जवळून ओळख झाली. पुढे त्या ‘शोधारंभ- रिसर्च अन्ड डेव्हलपमेंट’ या स्वयंसेवी संस्थेत प्रकल्प सहाय्यक आणि समुपदेशक म्हणून नोकरी करू लागल्या. आणि याच नोकरीतील एका प्रशिक्षणादरम्यान त्यांचीं आणि त्यांच्या जीवनसाथीची ओळख झाली.
प्रेम लोटलीकर यांचे कुटुंब मूळचे रत्नागिरीचे, पण त्यांचा जन्म आणि पालनपोषण मुंबईत कल्याण इथं झालं. त्यांचा जन्म मुलगी म्हणून झालेला पण वयात येताना आपल्या भावना मुलग्यांसारख्या आहेत, हे त्यांना जाणवलं. घरच्यांशी याविषयी ते सविस्तर बोलले, सुरूवातीच्या किंचित नाराजीनंतर घरच्यांनी ते पुरूष आहेत हे स्वीकारलं, यशावकाश त्यांची लिंगबदल शस्त्रक्रियाही झाली. यादरम्यान त्यांचं शिक्षण सुरू होतं, ते पदवीधर झाले आणि त्यांनी कल्याणच्या तृतीयपंथियांसाठीच्या ‘मित्र’ क्लिनिकमध्ये काम सुरू केलं. या मित्र क्लिनिकच्या प्रशिक्षणादरम्यानच रूपा आणि प्रेम यांची चांगली ओळख झाली, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण हे आपलं प्रेम आहे की फक्त आकर्षण? हे पाहूयात, असं म्हणत दोघांनी सहा सात महिने थांबून मग विवाहाचा निर्णय घेतला.
आधी रूपा आणि प्रेम यांचं रजिस्टर लग्न झालं आणि नंतर त्यांनी हिंदू विवाहपद्धतीनुसार विधिवत लग्न केलं. जवळचे मित्र- मैत्रिणी, संस्थेतील सहकारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न झालं. ‘लिंगबदल शस्त्रक्रिया झालेल्या तृतीयपंथिय जोडप्याचे लग्न’ असं याचं स्वरूप असल्याने रूपा आणि प्रेमचे कुटुंबिय मात्र लग्नाला उपस्थित नव्हते. त्यांच्या आशीर्वाद शुभेच्छा होत्या, पण लग्नाला हजर राहण्याचे बळ ते कदाचित एकवटू शकले नसावेत. ‘अनाम प्रेम’ संस्थेचे कार्यकर्ते अनिल मोरे काकांनी रूपाचं कन्यादान केलं. माध्यमांमधून पण हे लग्न गाजल्याचं रूपा सांगतात.
या दरम्यान पिंपरी- चिंचवड मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. राजेश पाटील यांनी सिग्नलवर केवळ भीक मागण्यापेक्षा, थोड्याफार शिकलेल्या तृतीयपंथियांना रोजगार देऊया, मनपाच्या सेवेत सामील करून घेऊया असा निर्णय घेतला. रूपाताई काम करत होत्या त्या शोधारंभ संस्थेकडे त्यांनी तशी चौकशी केली. या नोकऱ्यांसाठी किमान बारावीपर्यंतचे शिक्षण, तृतीयपंथिय असल्याचे ओळखपत्र, आधार- पॅन कार्ड अश्या गोष्टी गरजेच्या होत्या. शोधारंभ संस्थेच्या माध्यमातून काही शिकलेल्या तृतीयपंथियांना रूपाताईंनी प्रोत्साहन दिलं आणि त्यापैकी 22 तृतीयपंथिय आज पिंपरी चिंचवड मनपाच्या वेगवेगळ्या वॉर्डसमध्ये कार्यरत आहेत. त्यावेळी रूपाताईंची कामाची तडफ आणि आवड पाहून आयुक्त राजेश पाटील यांनी त्यांनाही ‘मनपा सेवेत सहभागी होण्याचा विचार करा’ असा सल्ला दिला. तो सल्ला मनावर घेऊन आज रूपाताई पिंपरी चिंचवड मनपाच्या मुख्य इमारतीत महिला सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहेत आणि नोकरीत प्रमोशनसाठी त्यांनी पदवीधर होण्याची तयारीही सुरू केलीये. दुसरीकडे त्यांचे पती प्रेम लोटलीकर हे पिंपरी चिंचवड मनपाच्या ‘ग्रीन मार्शल’ सेवेत कार्यरत आहेत. प्रामुख्याने थेरगाव प्रभागात त्यांचं काम चालतं. पिंपरी चिंचवड मनपामधील प्लास्टिकबंदी नीट राबवली जातेय ना- हे पाहणं, खाद्यपदार्य़ विक्रेते, कपडे आणि वस्तूंचे दुकानदार यांना प्लास्टिकऐवजी पर्यायी पॅकिंग मटेरियल वापरण्याचा सल्ला देणं, विशिष्ट मायक्रॉनपेक्षा कमी/ जास्त जाडीच्या कॅरीबॅग्ज वापरणाऱ्यांवर कारवाई करणं असं त्यांच्या कामाचं स्वरूप आहे.
रूपा आणि प्रेम दोघंही संसारात खुष आहेत. एकमेकांसोबत जगण्याचा निर्णय घेतल्याने आयुष्य जास्त आनंदात आणि जास्त चांगल्या गोष्टींच्या नियोजनात सुरू आहे असं त्यांना वाटतं. रूपा म्हणतात, “माणसाला चांगला जोडीदार लाभणं हे त्याच्या एकूणच मानसिक आरोग्यासाठी आणि क्वालिटी लाईफसाठी आवश्यक असतं. प्रेम मला भेटले आणि आम्ही विवाह केला, हा आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय वाटतो मला. आमच्या घरच्यांनीही आम्हांला जावई- सून म्हणून स्वीकारलं आहे. माझी आई फार कम्फर्टेबल नाही- कारण माझे वडील गेल्यावर, मी पुरूष असून बाई बनण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या सासर- माहेरच्या लोकांनी तिचा पार उद्धार केलाय. पण माझी आई माझ्या लेकराला ज्यात आनंद मिळतोय, ते तिनं करावं यावर ठाम होती. ती जुन्या काळातली असल्याने अगदी पारंपरिक लेक जावयासारखं नातं तयार व्हायला अद्याप वेळ लागेल याची मला कल्पना आहे. दुसरीकडे माझ्या सासू- सासऱ्यांनी मात्र उदार मनाने आमचा स्वीकार केलाय. आम्ही नवपरिणीत जोडप्याप्रमाणे सणावाराला कल्याणला जातो,छोटे- छोटे आनंद एकत्र साजरे करतो, आमच्या कमाईतून त्यांच्यासाठी छोटीशी भेटवस्तू घेऊन जातो, नुकतंच संक्रांतीसाठी त्यांनी माझ्यासाठी आठवणीनं इडली पात्र घेतलंय. आम्ही आमच्या आई- वडिलांना छान सांभाळणार आहोत. संसार आणि सुखी आयुष्य यापेक्षा वेगळं काय असतं?”
दरम्यान रूपा टाकसाळ- लोटलीकर यांनी नुकतीच नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन, पिंपरी चिंचवड मनपाप्रमाणेच नांदेडमध्येही मनपा नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथियांना सामावून घ्यावे, अशी विनंती केली आहे, ज्याला त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
– स्नेहल बनसोडे- शेलुडकर