खणखणीत ‘टाळी’ – भारतातील पहिल्या तृतीयपंथीय सरपंचासाठी टाळ्या वाजतात तेव्हा…

भारतातील पहिल्या तृतीयपंथीय सरपंचासाठी टाळ्या वाजतात तेव्हा…

लोकशाही हे भारताचं केवढं मोठं बलस्थान आहे, हे आपण बारकाईने बघायला गेलो तरच जाणवतं. आता हेच बघा ना, भारतातला पहिला तृतीयपंथीय सरपंच आपल्या महाराष्ट्रात, सोलापूर जिल्ह्यात आहे! त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कांबळे. झालं असं की 2017 साली ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडण्यापेक्षा थेट जनतेतूनच सरपंच करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आणि याच निर्णयाचा परिणाम म्हणजे लोकांमध्ये काम करणारे, लोकांसाठी काम करणारे अनेक लोक थेट सरपंचपदी निवडून गेले. त्यातच एक आहेत, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावचे सरपंच- ज्ञानेश्वर कांबळे.

एका तृतीयपंथीय व्यक्तीचा सरपंच होण्याचा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता. त्यासाठी आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल. शंकर कांबळेंचा धाकटा मुलगा म्हणजे हा ज्ञानेश्वर. सोबत आणखी चार भाऊ, घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. आई- वडील मोलमजुरी करून पोटापुरतं मिळवत होते. ज्ञानेश्वर यांचं लहानपणापासून गल्लीतल्या मुलींशीच जमायचं, मुलींसारखंच वागायला- बोलायला त्यांना आवडायचं. घरचे पण ओरडायचे, प्रसंगी मारायचे, शाळेत असतानाही त्यांना मुलीतच बसावंसं वाटायचं. यात गुरूजी, घरचे सगळे खूप ओरडायचे, मारही बसायचा. एक दिवशी या सगळ्याला कंटाळून लहानग्या ज्ञानेश्वरने शिक्षणच सोडले. मग गुरं राखायला जायला लागले, पण मुलींशी बोलण्यात- खेळण्यातच त्यांना आनंद वाटायचा. ‘काय बायल्यागत वागतो, गड्यासारखा वाग’ हे सल्ले ऐकून ते तसं वागू मात्र शकत नव्हते. शेवटी तेराव्या वर्षी त्यांनी तरंगफळ गाव सोडलं- घर सोडलं आणि ते माळशिरसला राहायला गेले.

तिथे देवदासी महिला होत्या- बबई जाधव म्हणून, त्यांना ज्ञानेश्वरने विनंती केली “मलाही देवदासी बनायचं आहे”, त्यांनी “घरच्यांची परवानगी घेतलीस का?” हे विचारलं. शिवाय ज्ञानेश्वर यांच्या घरच्यांना सुगावा लागून ते हजर झाले. “तुला इतकं समजावून बी बाईगतच वागतोस, घरच्यांची काही इज्जत ठेवतोस की नाही?” म्हणून भावाने एक कानशिलात लगावून दिली. पण ज्ञानेश्वर बधले नाहीत, ते खरोखरच साडी नेसून सौंदत्तीला जाऊन देवदासी झाले. ज्ञानेश्वर कांबळे यांची आत्या स्वत: देवदासी होती, तिचा प्रभाव ज्ञानेश्वर कांबळेंवर होता. “घरच्यांनी विनवून, रागावूनही मी घरी गेलो नाही. माळशिरस तालुक्यातच ‘मगराचं निमगाव’ इथं मी आयुष्याची पुढची बारा वर्षं काढली. तिथं राहणं सोप्पं नव्हते- तरूण पोरं छेड काढायचे, शिट्ट्या मारायचे, त्याचा मला फार त्रास झाला. घरी जावं वाटायचं खूपदा, भावा बहिणींची लग्नं कशी होणार मी घरी गेलो तर? यांचा भाऊ साडी नेसतो म्हणून लोक हसतील, आईबापाला त्रास दिला तर? असा विचार करून निमूट भिक्षा- जोगवा मागत दिवस काढले. आईला लपून छपून भेटायचो, आई तर रडायची माझी, “तुला मारणार नाही रे घरी ये, आईच्या पोटाला साप आला तरी ती जीव लावते म्हणतात, तू तर हाडामांसाचा माणूस हायेस” तरी मी कुणाला त्रास नको म्हणून घरी राहायला गेलो नाही. मला हे आयुष्य सोडायचं नव्हतं,” ज्ञानेश्वर कांबळे सांगत होते.

“अशीच 12-13 वर्षं मी बाहेरच काढली. आई जशी समजून घेते, तसं कोण समजून घेणार असं वाटायचं? मी फार त्रासात दिवस काढले. तुमच्या घरात अशी तृतीयपंथीय व्यक्ती जन्माला आली तर हेटाळू नका, त्रास देऊ नका, त्याला आपलं म्हणा. कधीही घरच्यांजवळ असणं हेच फायद्याचं असतं. नाहीतर वयात येणाऱ्यांना बाहेर त्रास होतो, वाईट सवयी लागू शकतात. सुदैवाने काही वर्षांनी भावांनी जुळवून घेतलं, मला ‘परत घरी ये’ असा लकडाच लावला. मी गावात परत गेलो, पण त्यांच्या घरी नाही राहिलो, वेगळं बिऱ्हाड थाटलं- कारण तोवर मी तृतीयपंथियांचा गुरू झालेलो, माझ्या घरी त्यांची वर्दळ असणार, त्याचा आपल्या कुटुंबाला त्रास नको असं वाटायचं. माझं मंडई मागून खाणं सुरूच होतं, पण मिळालेला किराणा, भाज्या, दूध मी गावातल्या गोरगरिबांना, ज्यांचं कुणी नाही अशा वृद्धांना, अनाथांना वाटून टाकायचो, त्यांच्याशी चार सुखदु:खाच्या गोष्टी करायचो. म्हाताऱ्यांना दवाखान्यात न्यायचो, असं करता करता गावातले ‘माऊली’ कधी म्हणायला लागले कळलंही नाही” ज्ञानेश्वर कांबळे सांगत होते.

राजकारणातल्या प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले, “मला गोरगरिबांना, म्हाताऱ्यांना मदत करून बरं वाटायचं. ही मदत मोठ्ठ्या प्रमाणात करता यावी असं वाटायचं, पण त्यासाठी हाती सत्ता हवी, पद हवं. त्याच काळात तृतीयपंथियांची नेता असलेल्या गौरी सावंतांचं बोलणं मी टीव्हीवरून ऐकायचो आणि आपल्याला जर तृतीयपंथीय म्हणून हक्क मिळवायचे असतील, तर आपणही समाजकारणात, राजकारणात सतत कार्यरत असायला हवं हे फार आतून वाटायला लागलं. पण आपल्याला कोण तिकीट देणार? असं वाटायचं. पण डोक्यात आलंय तर कागदपत्रं, शाळेचा दाखला, तृतीयपंथीय ओळखपत्र वगैरे मी सगळं जमा केलं आणि सोलापुरात जाऊन अपक्ष म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्म भरला. पुढे भाजपनं मला तिकीट दिलं, मग मी घरच्यांशी बोललो. ते म्हणाले आपण प्रयत्न करू, भावानं दिलेला पाठिंबा महत्त्वाचा होता. गावकऱ्यांनीही माझ्या स्वभावाची, माझ्या मदतकार्याची जाण ठेवली आणि मी ज्याचा विचारही केला नव्हता ते घडलं- हा तृतीयपंथीय माऊली कांबळे तरंगफळ गावचा सरपंच म्हणून निवडून आला, तेही माझ्या विरोधात उभ्या असलेल्या सहा जणांपैकी पाच जणांचे डिपॉझिट जप्त करत!! एका तृतीयपंथियाला सरपंच म्हणून सेवेची संधी देणाऱ्या गावाचे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाहीत. मी त्यांचा कायम ऋणी राहिन.”

सरपंच ज्ञानेश्वर कांबळेंनी गावात अनेक विकासकामं केली आहेत. गोरगरिबांना आधारकार्ड- रेशनकार्ड मिळवून देणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ मदत योजना, घरकुल आवास योजना यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ त्यांनी गोरगरिबांना मिळवून दिलाय. शिवाय पाणीपुरवठा योजना, चांगले रस्ते, जास्तीत जास्त स्वच्छतागृहे उभारणे यासाठीही ते आग्रही आहेत.

निवडून आल्यानंतरचा अनुभव सांगताना माऊली म्हणतात, “भिक्षा मागण्यासाठी प्रत्येक तृतीयपंथीय टाळी वाजवतो, पण मी निवडून आल्यावर गावात मिरवणूक निघाली, हलगीचा कडकडाट झाला, आणि जेव्हा माझ्यासाठी टाळ्या वाजल्या त्याक्षणी वाटलं- आता खरोखर ‘माणूस’ म्हणून स्वीकारलं आपल्याला गावानं!! तो आनंद मी जन्मभर विसरू शकणार नाही. आधी ‘साडी नेसणाऱ्या ज्ञानेश्वरला’ कोणी नातेवाईक ओळख दाखवत नव्हते, तेच आता सरपंच माऊली म्हणजे- हा माझा भाऊ/ पुतण्या/ मामा इ. अश्या ओळखी सांगतात. सत्ता ही अशी असते, पण माणूस म्हणून निवडून येण्याची संधी ज्या संविधानाने दिली त्याचा मी कायम ऋणी राहीन. आम्हांलाही भूक इतर माणसांप्रमाणे प्रेमाची, आत्मसन्मानाची असते, ते द्या. घरात माझ्यासारखं मूल जन्मलं तर लाथाडू नका, त्याचा सांभाळ करा, प्रेम आणि उत्तम शिक्षण द्या, उद्या ते तृतीयपंथीय जरी झालं तरी तुमचंच नाव रोशन करेल हे विसरू नकात.”

  • स्नेहल बनसोडे – शेलुडकर

Leave a Reply