
आम्हाला आई-बाबा होऊन आता चौदा वर्षांचा काळ लोटला. गर्भात जुळं आहे, हे डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा आनंद, कुतूहल आणि चिंता असे भाव आमच्या चेहऱ्यावर उमटले होते आणि खरी परीक्षा गार्गी-गायत्रीच्या जन्मापासूनच सुरू झाली; ती आजतागायत सुरूच आहे. जुळी मुलं (मुली) असणं हे इतरांसाठी जितकं कुतूहलाचं आहे, त्यापेक्षा योग्य समतोल राखून, संयमाने त्यांचं संगोपन करणं हे जुळ्यांच्या आई-वडलांसाठी किती कष्टप्रद आहे, याची जाणीव या काळात सातत्याने होत आहे.

सीता और गीता, करण अर्जुन, जुडवां असे जुळ्यांवर आधारित सिनेमे पाहिले असल्याने जुळ्या मुली झाल्या तेव्हा काहीसा तो प्रभाव होता. एक रडली तर दुसरी रडते का? एकीला भूक लागली तर दुसरीला लागते का? एक आजारी पडली तर दुसरी पडते का? अशा प्रश्नांनी त्या काळात आम्हाला भंडावून सोडलं होतं. पण या प्रश्नांमुळे मुलींचे जरा बारकाईने निरीक्षण करण्याची संधीही मिळाली. तेव्हा जुळ्यांची ‘रियल’ लाईफ ‘रिल’ लाईफपेक्षा फार वेगळी असते हे लक्षात आले. पिक्चरमध्ये दाखवतात तशी साम्य क्वचितच असतात, हे समजले. गार्गी-गायत्री या दोघीही जन्माच्या पहिल्या मिनिटापासून पुढील ४५ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्या. (सर्वसामान्यांच्या भाषेत काचेच्या पेटीत होत्या.) त्यामुळे आम्ही दोघेही त्यांच्या स्पर्शासाठी प्रचंड आसुसलेलो असायचो. दूध पाजण्याच्या निमित्ताने त्यांना काही काळ आईची स्पर्शानुभूती मिळायची. त्यावेळी बाबा म्हणून मुलींना घेऊन छातीशी कवटाळण्यासाठी मी खूप अधीर असायचो, मात्र संसर्ग वगैरे होऊ नये अशा कारणांमुळे असं करता यायचं नाही आणि त्यामुळे आपल्याच वाट्याला असे क्षण का? या प्रश्नाने स्वत:लाच अपराधी समजायचो.

जुळ्या मुली झाल्यानंतर आम्ही दोघे मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांत कौतुकाचा विषय झालो होतो. आमच्या दोघांच्याही कुटुंबाचा इतिहास तपासला तेव्हा कळलं की, आमच्या दोघांच्याही कुटुंबात यापूर्वीच्या पिढीत जुळं झालं होतं. आमच्यानंतर कुटुंबात माझ्या एका भावासही जुळी मुलं झालीत. म्हणजे जुळे होण्याची आमच्या कुटुंबातील ही परंपरा अनुवांशिक आहे यावर शिक्कामोर्तब झाले. जुळ्यांचं भाविविश्व उलगडणारी अनेक पुस्तके, लेख या काळात वाचली. तेव्हा जुळ्यांच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या.
गार्गी-गायत्री जुळ्या असल्या तरी, पत्नी गर्भावस्थेत असतानापासून त्यांच्यात अंतर आहे, ही बाब वैद्यकीय चाचण्यांनंतर स्पष्ट झाली होती. दोघींचाही जन्म सातव्या महिन्यातील (प्री-म्यॅच्युअर बेबी) आहे. गर्भात गायत्री मोठी; तर जन्माने गार्गी मोठी! त्यामुळे आमच्यात मोठी कोण? हा दोघींचाही प्रश्न आमच्यासाठी कायम गोंधळ निर्माण करणारा असतो. अशावेळी तुम्ही सारख्याच आहात, असे सांगावे लागते. मात्र त्यानेही दोघींचे समाधान होत नाही. गायत्री गार्गीपेक्षा उंची, वजनात अधिक असल्याने ती तिचं मोठेपण मिरवते, तर गार्गी म्हणजे आमच्या घरातील सिंघम आहे. त्यामुळे ती सिंघमस्टाईलने तिचं मोठेपण मिरवते. यात आई-बाबा म्हणून आमची मात्र दमछाक होते. खरे तर दोघींत कोणतेही साम्य नाही. साईड फेसिंग बघितले तर नवीन व्यक्तींना दोघींत जरा साम्य आढळते. गार्गी, गायत्री जुळ्या असल्या तरी त्यांच्यात सर्वच गोष्टीत साम्य राहणार नाही, त्या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत, याची स्पष्टता आई-बाबा म्हणून आम्हाला आहे. तसेही दोघींत काहीच साम्य नाही, त्यामुळे गेली चौदा वर्षे आपण दोन स्वतंत्र मुलींचं संगोपन करतोय असं वाटतं. त्यांना वाढवताना पहिली पाच वर्षे आम्हाला फारच काळजी घ्यावी लागली. प्री-म्यॅच्युअर बेबी असल्याने त्यांना बाहेरच्या अनेक गोष्टींपासून ॲलर्जीचा धोका होता. त्यामुळे इतर मुलांसारखे त्यांना बिनधास्तपणे बाहेर फिरवता आले नाही. भविष्यात प्रकृती संदर्भात काय काय संभाव्य धोक उद्भवू शकतात, याची डॉक्टरांनी धडकी भरविल्याने अनेक चाचण्या करून घ्याव्या लागल्या. सुदैवाने प्रकृतीच्या कोणत्याही अडचणी त्यांना उद्भवल्या नाहीत. एक मात्र त्यांना दूध पाजण्याच्या वेळा मात्र कटाक्षाने पाळाव्या लागल्या. आईच्या अंगावरचे दूध दोघींना पुरेसे नव्हते तेव्हा पावडरच्या दुधाने त्यांची भूक भागवावी लागायची. दोन तासानंतर दोघीही दुधासाठी रडायच्या तेव्हा त्यांच्या आईची त्यांना भरवण्यासाठी चाललेली धडपड, अंगावरच्या दुधाने दोघींचीही भूक भागत नाही, एकाचवेळी दोघींना अंगावर पाजता येत नाही म्हणून होणारी घालमेल, असे अनेक भावूक क्षण त्यांचे संगोपन करताना वाट्याला आले. मात्र आता दोघीही टिनएजमध्ये आहेत. आम्ही जुळ्या बहिणी का आहोत? सर्वजण आम्हाला ‘जुडवां’ म्हणून चिडवतात, अशी आता त्यांची सारखी तक्रार असते. दोघींतही वैचारिक साम्य अजिबात नाही. खूप भांडतात आणि एकत्रही येतात. एकमेकींशिवाय दोघीही फार काळ वेगळ्या राहू शकत नाही. त्यामुळे त्यांचे हे भावबंध, त्यांचे भावनिक नाते आई-वडील म्हणून आम्हा दोघांनाही सुखावणारे आहे.
– नितीन पखाले, यवतमाळ
Related