आत्मविश्वास होता म्हणून उर्मिलाताईंनी विहिरीत उडी घेतली

‘’ती वेळच अशी होती की मागचा पुढचा कोणताही विचार न करता मी विहिरीत उडी घेतली. कोणत्याही स्थितीत मला बुडणाऱ्या वैभवला वाचवायचे होते. तो गटंगळ्या खात होता. पोहता येत असल्याचा फायदा मला झाला. मी वैभवला विहिरीच्या बाहेर काढू शकले याचा मला आनंद आहे”, उर्मिला लक्ष्मण शिनगारे सांगत होत्या.


बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील कोरेगाव इथल्या उर्मिला लक्ष्मण शिनगारे. गावातच अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून कार्यरत. गावाशेजारीच त्यांची शेती आहे. ३ मार्चची गोष्ट. १४ वर्षांचा वैभव लांब हा आपला मित्र निखील लांब याच्याबरोबर शेतात जात हाेता. विहिरीजवळून जात असताना तोल जाऊन तो खाेल विहिरीत पडला. त्याला पोहता येत नव्हतं. उर्मिला तिथूनच शेतात जात होत्या. निखीलने आरडाओरडा करुन उर्मिला यांना वैभव बुडत असल्याचं सांगितलं. डाेक्यावरचं सामान खाली टाकून उर्मिला यांनी विहिरीत उडी घेतली आणि थोड्या प्रयत्नानंतर त्यांना वैभवला विहिरीबाहेर काढण्यात यश आलं .

सोमवारी महिला दिनी बीडच्या जिल्हा परिषदेनं उर्मिला यांचा या शौर्यासाठी विशेष सत्कार केला. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेेडे, सभापती यशोदा जाधव आणि महिला, बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामेश्वर मुंडे यांची विशेष उपस्थिती होती.
सीइओ अजित कुंभार म्हणाले, ”उर्मिला यांनी दाखवलेले शौर्य कौतुकास्पद आहे. त्या जिल्हा परिषदेच्या कर्मचारी असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
उर्मिला म्हणतात , ”त्या क्षणी मी बुडेन का हा विचार मनात आला नाही. पोहता येत असल्यानं आत्मविश्वास होता म्हणून मी विहिरीत उडी घेतली. वैभवला वाचवता आलं याचा आनंद आहेच पण, जिल्हा परिषदेकडून याची दखल घेतली गेली, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सत्कार केला विशेष म्हणजे सगळ्या सभागृहानं माझ्या कौतुकासाठी उभं राहून टाळ्या वाजवल्या हे भारावून टाकणारं आणि अविस्मरणीय आहे.

– अमाेल मुळे, ता. केज, जि. बीड

Leave a Reply