अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी (ता. राहता) येथील भारत व शरद शेळके हे दोघे भाऊ. भारत यांचे आयटीआयचे तर तर शरद यांचे बी.कॉम पर्यत झालेले. अडीच एकर शेती. मोठे भाऊ नाशिकला व्यवसायानिमित्त सध्या स्थायिक असुन शिक्षणानंतर शरद यांनीही नाशिकलाच एका खाजगी कंपनीत नोकरी स्विकारली. मात्र मिळणारे वेतन परवडणारे नसल्याने दीड वर्ष नोकरीचा राजीनामा देत शेती करण्याचा निर्णय घेतला. 2004 मध्ये गावी येऊन शेतीत भाजीपाला उत्पादन सुरु केले. तब्बल बारा वर्ष त्यांनी शेतीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. शेतीला जोड म्हणून 2011 साली त्यांनी दूध व्यवसाय सुरु केला.

दूध व्यवसायासाठी भांडवल कमी असल्याने असल्याने अगदी पन्नास हजार रुपये खर्च करुन लहान वयाच्या संकरीत (एचएफ) गाईच्या पाच कालवडी खरेदी केल्या. दोन वर्षानंतर त्यांच्यापासून दुधाचे उत्पादन सुरु झाले. गाईंसाठी मुक्त संचार गोठा केला. गाईंच्या दुधापासून मिळणाऱ्या पैशावरच एक-एक गाईंची वाढ केली. 2016 पर्यत सुमारे 20 दुभत्या गाईंपर्यत व्यवसायाने भरभराट केली. केवळ दहा लिटर दूध संकलनापासून सुरु झालेला शरद यांचा व्यवसाय सुमारे दोनशे लिटरच्यावर गेला. व्यवसाय भरभराटीला आला आणि चांगले दिवस येऊ लागले. पण एक दिवस शरद यांचा अपघात झाला. अपघातात त्यांना डावा हात मनगटापासून गमवावा लागला आणि सारं कुटुंब हतबल झालं. काहींनी थेट गाईंमुळे हा प्रसंग ओढावला असल्याने दूध व्यवसाय बंद करण्याचा सल्ला दिला. अचानक हात गेल्याने आधीच शरद विचलीत झाले होते. मनगटापासून हात गमवावा लागल्याने दूध व्यवसाय, शेतीवरही संकट आल्यासारखं झालं. त्यामुळे त्यावर्षी दुधत्या गाई विकाल्या लागल्या. वर्षभर दुधव्यवसायातून विश्रांती घेतली. मात्र शरद यांना शेतीची आणि व्यवसायाची ओढ शांत बसू देत नव्हती. अशाच काळात शरद यांना आई कालिंदी, वडील सोपानराव, भाऊ भारत, पत्नी माया यांच्यासह कुटुंबाने आधार दिला. दुभत्या गाई विकल्या तरी आठ कालवडी ठेवल्या होत्या. वर्षभरानंतर शरद यांनी पुन्हा दूध व्यवसाय सुरु करण्याचा निश्चय केला.

एक हात नसल्याने दुध काढणीची अडचण निर्माण होणार होती. पत्नी माया आणि आई कालिंदी यांनी गाईंची दूध काढण्याची तयारी दर्शवली. माया यांना तर शेती, दूध व्यवसाय याची कसलीही माहिती नव्हती. शरदच्या आईकडून त्यांनी सगळं शिकून घेतलं. वडील चारा व इतर व्यवस्थापन पाहत. शरद यांचा इतर कामाला हातभार लागला आणि मोडून पडलेला दूध व्यवसाय पुन्हा एकदा उभा राहिला. गाईंच्या संख्येत टप्प्या-टप्प्याने वाढ केली. सध्या त्यांच्याकडे १४ संकरित गाई, ९ लहान-मोठ्या कालवडी आहेत. त्यातील बारा दुभत्या असून दर दिवसाला सुमारे 190 ते 200 लिटर दूध संकलन होत आहे. 2019 साली 12 लाख रुपये खर्च करुन विस्तारीत पद्धतीचा दहा गुंठे क्षेत्रावर गाईंसाठी मुक्तसंचार गोठा केला आहे. 2017 पासून दूध काढणीसाठी मिल्किंग मशीनचा वापर करतात. दूध काढणीपासून बहुतांश कामे पत्नी माया, वडील सोपानराव करतात. एक हात निकामी झाला तरी कुटुंबातील सर्वचजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि व्यवसाय पुन्हा उभा राहिला.
– सूर्यकांत नेटके, नगर
Related