वसंतराव नाईक विद्यालयानं सुरक्षित वर्ग चालवले
कोरोनाकाळात शिकण्यात खंड पडून विद्यार्थी शिक्षण प्रवाहाबाहेर जाण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत होते. त्यात उसतोड कामगार, कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या अधिक असलेला पाटोदा तालुक्यात चित्र आणखी बिकट. शिक्षण हे एकमेव परिवर्तनाचे साधनं असलेल्या या भागात ही भीती खरी ठरताना दिसत होती.
दीर्घकाळ शाळा बंद राहिल्या. जिथे इंटरनेट सेवा नाही, मुलांकडे मोबाईल उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी ज्ञानगंगा पोचणार तरी कशी हा प्रश्न होता. एक शाळा मात्र अपवाद ठरली, ती म्हणजे वसंतराव नाईक विद्यालय. (पाटोदा, जि.बीड). इथल्या शिक्षकांनी उपक्रमशीलता दाखवत विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पालकांच्या संमतीने कोविडकाळातही फिजिकल डिस्टन्सिंग, वर्गखोल्यांचे नियमित सॅनिटायझशेन, मास्कचा वापर अशा बाबींचे पालन करत दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरु ठेवले. यातही अर्धे विद्यार्थी एका दिवशी तर उर्वरित दुसऱ्या दिवशी.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शाळेची पटसंख्या साडेसहाशेच्या जवळपास होती. त्यात पहिली ते नववीचे विद्यार्थी घरून अभ्यास करत तर दहावी – बारावीचे अनुक्रमे १५० आणि ४३ विद्यार्थी शाळेत येत. विद्यार्थी शाळेत येणार असल्यामुळे शिक्षक प्रत्येक सहा दिवसांनी अँटीजन, आरटीपीसीआर चाचणी करत. यासोबत शाळेच्या प्रवेशद्वारावर थर्मल गनने तपासणी करण्यासह निर्जंतुकीकरण केले जायचे.
शिक्षक, विद्यार्थ्यांना मास्क वापरण्याची सक्तीची सूचना तर होतीच. त्यातही धोका नको म्हणून वर्गखोल्यांचेही नियमित सॅनिटायझेशन केले जायचे. शाळेला मोठे मैदान असल्याने अर्धे विद्यार्थी वर्गात तर बाकीचे मैदानावर चार फुटांचे अंतर ठेवून बसायचे. शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम आहे. पण वसंतराव नाईक शाळेने बाळगलेली सुरक्षितता अशा स्थितीत आदर्शवत ठरली आहे. आता नवीन शैक्षणिक वर्षातही पहिली ते नववीच्या मुलांसाठी शिक्षक गृहभेटी, गटचर्चा, चाचणी परीक्षा हे उपक्रम आहेत.पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्यासह आठ दिवसांतून गटचर्चा, पालक संवाद, चाचणी परीक्षा असे उपक्रम घेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड येणार नाही, याची काळजी घेतली. याशिवाय शाळेचे शिक्षक आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी जात.
प्राचार्य तुकाराम तुपे सांगतात, ”आठवडी परीक्षा, चाचण्या यामुळेही अध्यापन प्रक्रियेत काय बदल आवश्यक आहेत हे कळते. कल्पक प्रयत्नांतून कोरोनाकाळातही विद्यार्थी आणि शिक्षण यांचा संबंध जोडून ठेवला जात आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांवर विशेष भर दिला जात आहे.’
-अनंत वैद्य, ता. पाटोदा, जि. बीड

Leave a Reply