विडी कामगाराचा मुलगा अनिल वासम झाला वकील
 ”आपल्या घरात कोणी शिकले नाही पण तुला शिकायला हवं, नाहीतर ज्या दिवशी नापास होशील त्यादिवशी कारखान्यात कामाला पाठवेन” असं  वडिलांनी सांगितलं.  तीच प्रेरणा घेऊन जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अनिल वासम नुकतेच वकील झाले.
सोलापूर शहरातील पूर्वभाग हा तसा कामगार, कष्टकरींचा भाग म्हणून ओळखला जातो. प्रामुख्यानं  विडी आणि  यंत्रमाग कामगार अशा  हातावर पोट असणाऱ्यांचा.  इथल्याच भगवान नगर वस्तीतलं वासम कुटुंब. या कुटुंबातले अनिल.   , वडील अंबादास  यंत्रमाग कारखान्यात तर आई लक्ष्मी या विडी कामगार. पाच जणांचं  कुटुंब, त्यामध्ये आई, वडील, दोन भाऊ अशिक्षित.  आपण शिकलो नाही पण आपला मुलगा अनिल हुशार, तो उच्चशिक्षित व्हावा,अशी कळकळ अंबादास यांना होती.   त्याची जाण ठेवून अनिल यांनी पहिले ते दहावीपर्यंत शाळेत पहिला क्रमांक कधीच सोडला नाही.
 पहिली ते सातवी शिक्षण बालमोहन विद्यालयात, आठवी ते दहावी मनपा शाळा, कुचन प्रशालेत ज्यु. कॉलेज, यूजी, पीजी वालचंद महाविद्यालय, वायसीएएममधून एमजे आणि दयानंद महाविद्यालयातून त्यांनी काहीच दिवसांपूर्वी कायद्याचे  शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे घरातील सर्वजण कामाला गेल्यानंतर घरातील सर्व कामं  अनिल करत.  स्वयंपाकातही  आईला मदत. दहा बाय पंधराच्या  खोलीत रात्री उशीरपर्यंत अभ्यास  करायचे. गरीब परिस्थिती असतानाही त्याचं  भांडवल न करता पडेल ते काम करून अनिल शिकले असून परिसरात त्यांचं कौतुक होत आहे.
अनिल यांना  वाचन आणि लिखाणाची लहानपणापासूनच आवड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचा आदर्श. ”आईवडील,शिक्षक यांच्या प्रेरणेमुळेच इथपर्यंत शिकू शकलो. पण यावरच समाधान न मानता  बाबासाहेबांचा आदर्श ठेवून यापुढेही शिक्षण सुरूच ठेवायचं आहे.” अनिल सांगतात.
”आम्ही आयुष्यभर कष्ट घेतले. आम्ही कामगारच राहिलो.” अनिल यांचे आईवडील आपल्या भावना व्यक्त करत होते.  ”माणसानं शिकलं पाहिजे, तेच अनिलला लहानपणापासून सांगत आलो. तो मोठा अधिकारी,वकील व्हावा, अशी इच्छा होती. त्यानंही अत्यंत मेहनतीनं शिक्षण पूर्ण केलं. आज तो वकील झाल्याचा आनंद आणि अभिमान आहे.”
-जवेरीया रईस,सोलापूर

Leave a Reply