विडातल्या जावयाचा आगळा मान
दर तीन वर्षांनी येणाऱ्या धोंड्याच्या महिन्यात आपल्याकडे जावयाची चंगळ असते. गोडाधोडाचे जेवण, पंचपक्वान्न, धोंडे वाण देऊन जावयाची सरबराई केली जाते. त्याला ३३ अनारशांचं वाण दिलं जातं. परंतु बीड जिल्ह्यातला केज तालुक्यातलं विडा गाव एक वेगळीच परंपरा जपत हे. धुलिवंदनाच्या दिवशी या गावच्या जावयाला गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढली जाते. मागील शंभर वर्षापासूनची ही परंपरा या गावाने जशीच्या तशी जपली आहे. धुलिवंदनाच्या या रंगोत्सवातून सलोख्याचे दर्शन होते.
विडा हे केज तालुक्यातील सात हजार लोकसंख्येचे गाव असून या गावाच्या वेशीजवळ दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर आहे. निजामाच्या राजवटीत असलेल्या विडा गावाला जहागिरी होती. १९१५ साली तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांचे लातूर येथील मेहुणे बाळानाथ चिंचोली हे धुलिवंदनाच्या दिवशी त्यांची सासुरवाडी असलेल्या विडा या गावात आले होते. गावात आलेल्या जावयाचा थाटमाट सुरू होता. गावातील प्रमुख मंडळीही धुलिवंदनाचा पाहुणचार घेण्यासाठी जमलेली होती. काहीजण खाण्याबरोबर भांग देखील पित होते. भांग प्यायल्यांनतर थट्टामस्करी सुरु झाली. या मस्करीतून गावाचे जावई असलेले बाळानाथ चिंचोली यांची गाढवावर बसून पहिल्यांदा सवारी निघाली. तेव्हापासून या गावात परंपरा सुरु झाली.
ही परंपरा कायम ठेवण्यासाठी या गावातील तरूण एकत्र येऊन पुढाकार घेतात. धुलिवंदनाच्या दोन दिवस जावई शोध समिती नेमली जाते. ही समिती वेगवेगळी पथके तयार करून गावच्या जावयाचा शोध घेत फिरतात. या शोध मोहीमेत जावईबापू हाती लागले की त्यांना गावात आणून निगराणीखाली ठेवलं जातं. मग धुलिवंदनाच्या दिवशी सकाळी गावातील ग्रामपंचायतीसमोर एक गाढव आणून त्याच्या गळ्यात चपलेचा हार घातला जातो. त्यानंतर गाढवावर जावयाला सन्मानपूर्वक बसवून जावयची गर्दभ सवारी सुरू होते. या मिरवणुकीसमोर हातगाड्यांवर अथवा वाहनात रंगाचे पिंप भरलेले असते. त्यातून या मिरवणुकीवर रंगाची उधळण होते. मिरवणुकीसमोर ढोल, बाजा, डिजे असतो. डिजेच्या गाण्यावर तरूण थिरकत असतात. गावात मिरवणूक मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा आपापल्या घरासमोर थांबलेल्या महिलाही या मिरवणुकीवर रंगाची उधळण करतात. गावातील प्रमुख रस्त्यांवरून सुरू असलेली ही मिरवणूक दुपारच्या वेळी ग्रामदैवत राजा हनुमान मंदिरासमोर पोचते. या ठिकाणी गावात लोकवर्गणीतून जमलेल्या पैशांतून खरेदी केलेल्या कपड्यांचा आहेर गावातील प्रतिष्ठितांच्या हस्ते जावयाला दिला जातो. शिवाय गावभर मिरवलेल्या जावयाला एैपतीनुसार सासरेबुवा सोन्याची अंगठीही भेट देतात. मागील शंभर वर्षापासून या गावाने ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली आहे. मागील वर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे केवळ एक वर्ष ही परंपरा खंडीत झाली होती. आता आज जावयाची मिरवणूक काढली जाणार आहे.
गावात धुलिवंदनाच्या दिवशी एकदा गाढवावरुन मिरवणूक काढलेल्या जावई बापूंची पुन्हा या गावात मिरवणूक काढली जात नाही. एका जावयाला एकदाच मान दिला जातो. आदल्या वर्षी मानकरी ठरलेले जावई बापू पुढच्या वर्षीच्या मिरवणुकीत आनंदाने सहभागी होतात. गावातल्या गावात सोयरीक झाल्याने तर काही जावई हे रोजगार, व्यवसायाच्या निमित्ताने गावात स्थिरावले असून विडा गावात सध्या दोनशेहुन अधिक जावई स्थायिक आहेत. त्यामुळे विडेकरांची धुलिवंदनाच्या आधीपासूनच लोकांची जावयावर नजर असते. त्यामुळे गावातील जावई अगोदर भूमिगत होतात.
विडा गावातील सासरे, त्यांचे गावातीलच जावई आणि पुन्हा त्यांचेही जावई अशा चौघांना या पूर्वी धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून मिरवणुकीचा मान मिळालेला आहे. या गावातील दिवंगत देवराव मस्कर यांची याच गावात सासुरवाडी. त्यांच्या मुलींची लग्नेही गावातीलच चंद्रसेन पवार व महादेव पवार यांच्याशी झाली आहेत. या दोन्ही पवार जावयांची मिरवणूक निघाली होती. तर महादेव पवार यांची मुलगीही गावातील शिक्षक अंगद देठे यांना दिलेली असल्याने जावई देठे यांची ही अशी मिरवणूक निघाली होती. शिवाय गावातील मोहन घोरपडे यांचे जावई एकनाथ पवार यांची व त्यांचे जावई महादेव घोरपडे या दोन्ही सासरे – जावयांच्याही मिरवणुकाही या गावात निघाल्या आहेत.
जावयाची गाढवावरून मिरवणूक हा अपमानाचा प्रकार वाटतो. परंतु, ही गावाची परंपरा असून आजवर मिरवणुकीत कधीही भांडण, तंटा, मान – अपमान असा प्रकार घडला नाही. सर्व जाती – धर्मांच्या जावयांना या गावकऱ्यांनी मिरवले आहे. मुस्लिम धर्मातील गावातीलच जावई असलेले शिक्षक सादेक कुरेशी यांनाही या मिरवणुकीचा मान मिळालेला आहे.
– दिनेश लिंबेकर, बीड

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading