लॉक डाऊन काळात जेंव्हा घरातील कर्त्या पुरुषांच्या नोकर्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, घरावर उपासमारीची वेळ तेंव्हा घरातील महिलांनी केलेली बचत कामाला आली. ही तीच बचत होती जिला दहा – वीस रूपड्याच्या बचतीने काय होणार म्हणून हिणवलं जायचं. याच बचतीतून निर्माण झालेल्या बचत गटांनी लॉकडाऊनकाळात घर संसार तर चालवले शिवाय कित्येकांना रोजगारही उपलब्ध करून दिला. ही कथा आहे अशाच एका बचत गटाची ज्यांनी अनेकांना लॉकडाऊन काळातही रोजगार उपलब्ध करून दिला.

जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या आंबा इथल्या रहिवासी विजया काळे. विजया यांचे लक्षप्रद आणि गोकुळ असे दोन महिला बचत गट आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे गटातील कोणत्याच महिलांकडे काम नव्हतं. विजया बाईंकडे गटाच्या सदस्या आर्थिक मदतीसाठी किंवा काहीतरी काम द्या म्हणून यायच्या. जवळपास सर्वांची हीच परिस्थिती होती. कुणीच कुणाला मदत करण्याच्या स्थितीत नव्हतं. तेव्हा विजयाबाईंनी जालना जिल्हा परिषदेतील महिला व बाल विकास विभागातील दाभाडे साहेबांच्या मदतीने गटासाठी काही काम मिळेल का याची विचारपूस केली. त्यांनी लॉकडाऊन काळात मास्क शिवण्याचे काम करण्यास सुचवलं. त्यांच्याच मदतीने काम सुरु झालं. मुळचे दोन बचत गट आणि गावातील इतर बचत गटांना एकत्रित करून मास्क शिवण्याचे काम सुरु करण्यात आलं. एकत्र आलेल्या गटाचे दोन मुख्य गट करून कामे विभागली गेली. कपडा आणणे, त्याची कटई करणे हे काम एका गटाकडे, ते शिवून पॅकिंग करण्याचे काम दुसर्याकडे. ज्यांना यातील काही येत नव्हतं त्यांना इतर कामं जसं शिवलेले मास्क सॅनिटाईझ करायचं काम दिलं गेलं. अशाच एका गटातील नंदिनी साळुंखे सांगतात, “आम्ही रोज शेतात जाऊन काम करणाऱ्या महिला आहोत. ज्या दिवशी काम केलं त्याच दिवशी पैसे घेऊन घरात तेल मीठ येतं. त्यामुळे लॉकडाउनमध्येही आम्ही सुरुवातीला शेतात जात होतो. पण नंतर लॉकडाऊन कडक झालं. त्यामुळे साठवलेले पैसे पण संपून जाऊ लागले. आणि आम्हाला शिलाई मशीन वगैरेही चालवता येत नव्हती तरी ही आमच्या बचत गटामार्फत कपडा धुणे त्याला सॅनिटाईज करणे ही कामं आम्ही केली यातून आमचं एक दीड वर्ष तरी घर चाललं.”
उत्पादन सुरु झाले पण त्याची विक्री कुठे आणि कशी करावी याची कुणालाच माहिती नव्हती. पुन्हा सरकारी अधिकारी, प्रशासनातील ओळखीच्या लोकांकडून याची माहिती मिळवली. संपर्क मिळवले आणि शेवटी कंत्राट मिळाले. कंत्राट होतं, यवतमाळ जिल्ह्यातील शेवगा ग्राम पंचायतेचे. ३५०० मास्क या गावाला पाठवण्यात आले. मग कामे मिळत गेली. त्रिषाला घटमल म्हणतात, “आम्ही बचत गटावर या आधी खूप काम केलं. मागच्या वर्षी पिशव्या शिवायचं काम आलं होतं, तेव्हा आम्हाला 60रु, 70रु एका दिवसाला मिळाले. आमच्या अध्यक्षांनीचं ते काम आमच्यासाठी आणलं होतं. म्ह्णून आम्ही त्यांना अजून विनंती केली की लॉकडाउनमध्ये काही काम मिळेल का. तेव्हा त्या पाहू म्हणाल्या. मग त्यांनी जालन्यातून मास्क शिवायच काम आणलं. 50-50 रुपये जरी मिळाले आले तरी आम्ही हे काम करू असं आम्ही ठरवलं. पण, आम्हाला दिवसाला 300-400 रु हातात पडू लागले”.
विजयाबाईनी महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, हरीयाणामध्येही मास्क पाठवून दिले. १२ रुपयांना एक मास्क या भावाने मास्क विकण्यात आले. तर मास्क शिवणाऱ्या एका महिलेला सुरवातीला एका मास्क मागे किमान ३ रुपये देण्यात आले. परंतु जसजसे काम वाढत गेले तसे महिलांना जास्त परतावा मिळत गेला. या कामात एकूण १२२ महिलांना काम देण्यात आलं. संगीता काळे ह्या सर्वात जास्त मास्क शिवणाऱ्या महिला ठरल्या. त्यांनी एकूण ८०० मास्क शिवून तीन हजार रुपये कमवले. लॉकडाऊन काळात एवढा व्यापार करणे साहजिकच सोपं नव्हते. याकाळातील अल्पशी मदतही लाखमोलाची होती.
दुसऱ्या गटाच्या प्रमुख गंगा शिवाजी जाधव काय सांगतात हे महत्वाचं आहे, “मी आंबा गावची. विजया ताईनं ग्रुपनुसार काम दिलं होतं. मी आंब्याची ग्रुप हेड होते. मी मास्क वेळेवर तयार करून घेणं, ते मोजणं, वेळेवर पाठवणं आणि प्रत्येक आमच्या बचत गटाच्या महिलेला याचा लाभ कसा घेता येईल हे सगळं बघायचे.”
– गणेश डुकरे, परभणी
Related