हम किसी से कम नहींl
परभणीतल्या कातनेश्वर इथला विठ्ठल चापके. दोन्ही पायाने अपंग. वय 34. विठ्ठलने जिंतूरमधून किसनराव वसेकर अस्थिव्यंग विद्यालयात आठवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. वडिलांचं छत्र लहानपणीच हरपलं आणि चार भाऊ, आई, बहिण अशा संसाराची जबाबदारी विठ्ठलच्या खांद्यावर येऊन पडली. आता काय करायचं, असं म्हणून हातावर हात घेऊन न बसता विठ्ठल दिल्लीला गेला. मिळेल ते काम केलं. नंतर परभणीत परत आला. तीनचाकी सायकलवर वस्तू विक्री, एसटीडी बूथ, झेरॉक्स मशीन चालवणं असे विविध व्यवसाय केले. थोडीशी पुंजी जमवली. पण नंतर पत्नी पार्वतीला आजारपण आलं. त्यात सगळी पुंजी खर्च झाली. तरीही विठ्ठल खचला नाही. नव्या संधीच्या, व्यवसायाच्या शोधात तो होताच. अपंग म्हणून भीकेसारखा मिळणारा पैसा त्याला नको होता. हे असे मिळालेले पैसे किती दिवस पुरणार, असं तो विचारतो. त्यापेक्षा ग्राहकांना योग्य सेवा दिली तर त्यातून मिळणारा मोबदला कुटुंबाच्या उतरनिर्वाहासाठी पुरेसा असल्याचंही सांगतो.
आचार-विचाराने योग्य मार्गावर असलेल्या विठ्ठलला आता चांगला व्यवसायही मिळाला आहे. शरीरासाठी पोषक असणाऱ्या मशरूमच्या बाजारपेठेत त्याने आता प्रवेश केला आहे. कोल्हापूर, मुंबई, पुणे, अकोला, अमरावती इथून तो ताजं बटन मशरूम रात्री मागवतो. आणि कृषी विद्यापीठाच्या गेटला गाडा लावून सकाळ- संध्याकाळ विकतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून परभणीसारख्या ग्रामीण भागात विठ्ठलने घराघरात मशरूम पोहोचवण्याचे काम केलं आहे. मशरूम काय आहे हेच माहिती नसलेल्या परभणीकरांच्या जिभेला आता मशरूमची गोडी लागली आहे.
मशरूमचा व्यवसाय तसा जोखमीचा. कारण मशरूमला विशेष तापमानात ठेवावं लागतं. हवा, पाणी लागल्यास ते खराब होऊ शकते. विशेष काळजी म्हणून विठ्ठलने त्याच्या तीनचाकी सायकललाच आवश्यक असा पत्र्याचा आईस बॉक्स बनवून घेतला होता. त्यातच त्याचं सर्व भांडवल असायचं. मागणीनुसार माल ऑर्डर करून नुकसान टाळत नफा मिळविण्याचं अर्थशास्त्र विठ्ठलने अवगत केलं आहे. अलीकडेच त्याने कर्ज काढून तीनचाकी स्वयंचलित वाहन घेतले आहे. व्यवसाय वृद्धीसाठी या वाहनाचा चांगला उपयोग झाल्याचे तो सांगतो.
मशरूममध्ये 35 टक्के व्हिटामिन सी आणि डी असते. हाडांची मजबुती, सांधेदुखी, शुगर पेशन्टसाठी मशरूम उपयुक्त असते. चिकन-मटनापेक्षा स्वस्त असल्याचं तो ग्राहकांना पटवून देत असतो. आता विठ्ठलने सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या ऑर्डरप्रमाणे घरपोच मशरूम पोहोचवण्याचं काम मागील वर्षभरापासून सुरू केलं आहे. मशरूमबरोबर त्याने बनवलेला खास मसाला, आवळा कॅण्डी, राजगिर्याचे लाडू, पीठ, गावरान गाईचं तूप, प्रोटिन्सची बिस्किटे, इडली, वड्याचं पीठ हे पदार्थही तो विकतो. त्याच्या या व्यवसायाला परभणीकरांनीही भरभरून साथ देत त्याच्या आत्मविश्वासाला उभारी दिली आहे. त्याचा प्रांजळ स्वभाव आणि स्वावलंबी विचारामुळे अधिकजण त्याच्या व्यवहाराकडे आकृष्ट झाले आहेत. आज तो परभणीतील अनेक तरुणांसाठी आदर्श असून त्याच्या प्रेरणेतून अनेकजण उद्योगाकडे वळू लागले आहेत.
मशरूम काय आहे? त्याचे फायदे कोणते? याबरोबर मशरूमची भाजी कशी करावी? इथंपर्यंत त्याने परभणीकरांना शिकवलं आहे. स्वतःला अपंग समजून इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा विठ्ठलने गाव सोडून परभणीत येऊन एका नव्या आणि जोखमीच्या व्यवसायात नावलौकीक मिळवला आहे.
– बाळासाहेब काळे, परभणी

Leave a Reply