नाशिक जिल्ह्यातले पेठ, सुरगाणा,इगतपुरी,त्र्यंबकेश्वर,दिंडोरी तालुके. या तालुक्यामधल्या आदिवासी भागात उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नाची तीव्रता यंदा कमी भासेल, अशी आशा आहे. जलपरिषदेनं अवघ्या दोन महिन्यात २०५ बंधारे श्रमदानातून बांधले आहेत.
जलपरिषदेची मुहूर्तमेढ २जून २०१९ मध्ये सुरगाणा तालुक्यातील जाहुले इथं झाली. ओझरमधल्याच राकेश दळवी या मध्यमवर्गीय माणसाच्या पुढाकारातून. हिंदुस्तान एरोनौटिक्स लिमिटेडमधल्या राकेश यांना त्र्यंबकेश्वरमधल्या पाड्यावरच्या पाणीप्रश्नानं अस्वस्थ केलं. आपल्या सहकाऱ्यांकडे, मित्रांकडे त्यांनी ती व्यक्त केली. देविदास कामडी, एकनाथ भोये, गीतेश्वर खोटरे ,रतन चौधरी, पोपट महाले, अनिल बोरसे अशी फळी तयार झाली.
ना स्वार्थासाठी, ना राजकारणासाठी… ही हाक सर्वांनाच भीडत गेली. सहकारी, नागरी संस्था, ग्रामस्थ, ग्रामपंचायती, अधिकारी, लोकप्रतिनिधी पुढे येऊ लागले. श्रम, देणगी, दायित्व यातून कामं होऊ लागली. वनराई बंधारे, विहीर, इतिहास कालीन हौद ,तळे, बारव, नदी नाले जुने पाण्याचे श्रोत यांना नव संजीवनी मिळून एक खेडी स्वयंपूर्ण होऊ लागली.
पुढील नियोजनासाठी प्रत्येक तालुक्यात जलपरिषदेचे कार्यकर्ते, शिक्षक, महिला बचतगट, अंगणवाडी कार्यकर्ते, वनविभाग, आणि प्रशासनातले इतर अधिकाऱ्यांच्या मदतीनं पुढील नियोजन करत आहेत.
पाणी प्रश्न सोडविला जात असतानाच जंगलातील पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न यासाठी वाघेरा घाट, पेठ तालुक्यातील बाडगीचा पाडा इथं उपक्रम सुरू आहे.
Related