प्रशासनाची माणुसकी, अशक्य ते शक्य करून दाखवी!
‘’मी पाच वर्षांपासून एचआयव्हीग्रस्त आहे. बीड जिल्हा रुग्णालयाच्या एआरटी सेंटरमधून मी उपचार घेतो. पण, मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे टाळेबंदी झाली. बस बंद, बाहेर जाता येईना. त्यामुळे उपचारांचं काय असा प्रश्न होता. पण, जिल्हा एडस् नियंत्रण कक्षाचे कर्मचारी एक दिवस मला शोधत घरी आले. त्यांनी दोन महिन्यांची औषधं दिली. लाॅकडाऊन संपेपर्यंत ते येऊन औषधी देत, आरोग्याची विचारपूस करत, किराणा वगैरेची मदतही विचारत. सरकारी यंत्रणेकडून इतक्या आपुलकीनं होणारी विचारपूस, ही फारच वेगळी सुखद बाब होती.” राम (बदललेले नाव) सांगत होते.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई आणि बीड या दोन ठिकाणी एचअायव्ही (एडस्) बाधितांवर उपचारांसाठी प्रमुख एआरटी सेंटर आहेत. तर आष्टी, गेवराई, माजलगाव, धारुर, केज, परळी, चिंचवण या तालुकास्तरावरची केंद्र त्यांना जोडलेली आहेत. जिल्हा रुग्णालय हे कोरोनाबाधितांसाठी असल्यानं इथं येणाऱ्या एचआयव्ही बाधितांना संसर्गाचा धोकाही होता. त्यांच्या उपचारात खंडू पडू नये म्हणून जिल्हा एडस् नियंत्रण कक्षानं या काळात एडस् बाधितांना थेट घरपोच उपचार द्यायला सुरुवात केली.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे सांगत होत्या, ”बाधितांचे उपचार या काळात थांबू नयेत यासाठी काय करता येईल याचा विचार आम्ही केला. आमचे कर्मचारी आणि काही एनजीओ यांची मदत घेत थेट घरपोच उपचार देण्याचं ठरवलं. पण संचारबंदीत जिल्ह्यात फिरायचं कसं हा प्रश्न होता. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी पोलीस अधीक्षकांसमोर समस्या मांडली. त्यांनी परवानगीसोबत विशेष पास दिले. आमचे काम सोपे झाले. कर्मचारी आणि एनजीओ प्रतिनिधी मिळून सुमारे ५० जणांनी हे काम केले.”
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे म्हणाले, ”कोरेानामुळे निर्माण परिस्थितीला सामोरं जातानाच एड्सबाधितांवरील उपचारात सातत्य कायम ठेवण्याचं आव्हान होतं. यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांच्या ऑनलाइन बैठका घेतल्या. नियोजन केलं . सुमारे साडेसहा हजार अॅक्टीव्ह रुग्णांपैकी साडेचार ते पाच हजार रुग्णांपर्यंत आम्ही पोहोचलो. ७८० रुग्णांची परिस्थिती गरिबीची होती. त्यांना लॉकडाऊन काळात आवश्यक वस्तू पुरवल्या. १ हजार जणांना मास्क वाटले.”
साधनामॅडम सांगतात, ”कामात विहान या स्वयंसेवी संस्थेनं मोठी मदत केली. इतरही काही सामाजिक कार्यकर्ते कर्मचाऱ्यांच्या जोडीला होते. पोलीस प्रशासनानंही साहाय्य केलं. त्यामुळे हे शक्य झालं.”
बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या माणुसकीमुळे हजारो एचआयव्हीबाधितांना कठीण काळात दिलासा मिळाला.
– अमोल मुळे, बीड

Leave a Reply