ओला कचरा घरातच जिरवू, पृथ्वीवरचा भार कमी करू

आम्ही दोघं भल्या सकाळी नोकरीसाठी घराबाहेर पडतो. घरात आजारी सासूबाई, मुलं शाळेत. घंटागाडी कधीही वेळीअवेळी यायची. ओला काचरा घरात साठायचा. वास यायचा. काय करावं ते कळेना. एक दिवस कंम्पोस्ट खताबद्दल एके ठिकाणी वाचलं. मग लागले कामाला. घरातल्या घरात ओला कचरा एका सच्छिद्र बादलीत गोळा करुन त्यापासून खत करू लागले, बँकेत काम करणारी नयना गोखले सांगत होती. नयनाने ओल्या कचऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी शोधलेला मार्ग आज तिला भाज्या, फळे पिकविण्यापर्यंत घेऊन गेला आहे.

मिथिलाचे सासरे सुनील जोशी सेवानिवृत्त झाले. रोजचे रुटीन अचानक बदलल्याने त्यांची चिडचिड होऊ लागली. कारण एरवी त्यांना उसंतही मिळत नव्हती. आता मात्र आखा दिवस त्यांच्यासमोर आ वासून उभा असायचा. काय करावं ते कळेना. कुठूनतरी त्यांना गच्चीवर, टेरेसवर बाग फुलवता येईल असं समजलं. झालं ते लागले कामाला. आता त्यांच्याकडे प्लास्टिक बॅग, रिकाम्या बादल्या, गाडगी, मडकी काय म्हणाल त्यात पालक, मेथी, मिरच्या, कोथिंबीर, काकडी, गिलके, दोडके, फळं, फुलं डौलाने मिरवत असतात.

ओला कचरा, भाज्यांची, फळांची देठ, पाला हे सारे एका सच्छीद्र बादलीत टाकून वरतून थोडे ताक, गोमूत्र टाकून कचरा कुजवला की साधारण महिन्याभरात दर्जेदार कम्पोस्ट खत तयार होते. हे खत आपल्याच बाल्कनी, गच्ची, अंगणातील झाडांना देणे यासारखे प्रयोग गेल्या काही वर्षांपासून नयना गोखले, सुनील जोशी यासारखे असंख्य नाशिककर यशस्वीरित्या करत आहेत. झाडा, फुलांनी, फळांनी त्यांना दिलेला हा अपार आनंद, समाधान त्यांना जीवनात सृजनात्मक काहीतरी करत असल्याच समाधान देत आहे. अशा काही हिरवा कोपरा फुलवणाऱ्या नाशिककरांच्या कहाण्या पृथ्वी दिनाच्या निमित्ताने सर्वांना सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

गंगापूर रोडवर राहणारे अजय कामत सांगतात, मी गेली अनेक वर्ष आयटी क्षेत्रात काम करतो आहे. करोनामुळे लॉकडाऊन सुरु झालं आणि ऑनलाईन कामही. बागकामाची आवड होतीच. त्यामुळे लॉकडाऊन काळात थोडा वेळ मिळाल्याने बागकामाकडे वळलो. माझ्या दोन्ही फ्लॅटची एकत्र ग्यालरी मला बागकामासाठी मिळाली. या बागेत मी काकडी, पालक, वांगी, करडई अशा असंख्य प्रकारच्या भाज्या, फळं पिकवली. आपण पिकवलेली, घरची भाजी, फळं यांची चव काही औरच असते याचा अनुभव आला.

गॅलरीतील बागेसोबत मी पाण्यावर झाडं वाढवण्याचा (हायड्रोपोनिक्स)अभिनव प्रकार करून पहिला. तो शंभर टक्के यशस्वी झाला. घरात एका कोपऱ्यात मी हा प्रयोग केला आहे. त्यांना बल्ब द्वारे प्रकाश देत आहे. त्याला जागा कमी लागते, केवळ पाणीच लागतं आणि भरपूर पीक येतं. या कामात मला आई, वडील, पत्नी यांची मदत मिळते. विशेष म्हणजे घरातला सगळा ओला कचरा घरातच खत करून जिरवतो. घंटागाडीकडे जायची वेळ येत नाही. या तिन्ही प्रकरांनी मला खूप आनंद आणि समाधान दिलं आहे.

राजेद्र मानकर, बांधकाम व्यावसायिक म्हणतात, चेतना नगर भागात आमचा बंगला आहे. बंगल्याच्या आवारात आणि गच्चीवर छोटीशी बाग आहे. गेल्या चार वर्षांपासून मी या बागेत टोमॅटो, वांगे, भेंडी, कोबी, फ्लावर, बटाटे, आलं, हळद, गिलके, दोडके आदी अनेक गोष्टी पिकवल्या आहेत. २ वर्षांपासून स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्यापासून खत तयार करतो आहे. घंटागाडीच तोंड ही बघायची वेळ येत नाही. सध्या झाडांना उन्हाचा थोडा त्रास होत असल्याने जुन्या साड्या बांधून त्यांना सावली तयार केली आहे. या कामामुळे आपली बागकामाची हौस पूर्ण होतेच पण बाजारातील रासायनिक भाजीपाला टाळून घरचा खात्रीचा आणि स्वत: पिकवलेला मेवा खायला मिळतो. त्याची लज्जत काही वेगळीच असते. करोना लॉकडाऊनच्या काळात तर बागकामामुळे खूप दिलासा मिळाला. रोज अर्धा तास बागेत काम केलं तरी दिवस फ्रेश होतो हे अनुभवलं.

स्वप्नील जोशी व्यवसायाने पत्रकार. लहानपणापासून आजोबा आणि आई यांना बागकाम करताना त्याने बघितलं आणि आपसूकच ही आवड त्याच्यात झिरपली. त्यात शाळेतही गांडूळखत, सोलर एनर्जी, खत निर्मिती आदी उपक्रम घेतले जायचे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचे संस्कार होतेच. स्वप्नील राहतो तो फ्लॅट तळ मजल्याचाच. त्यामुळे सोने पे सुहाना असं झालंय. अंगणात, बाल्कनीत त्याने असंख्य झाड लावली आहे. यात प्रामुख्याने फुलझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा समावेश आहे. २००५ पासून सोनचाफा, सोनटक्का, अनंत, गुलाब, मोगरा, जास्वंदी, सायली, पारिजातक, मधुमालती अशी फुलझाडे, तर टोमॅटो, वांगे, भेंडी, मिरच्या, कांदे, कोथिंबीर अशा असंख्य भाज्या गुण्यागोविंदाने नांदत आहेत. घरचा ताजा भाजीपाला, देवांना घरची ताजी फुलं मिळतात. शिवाय निर्माल्यही बाहेर नदीत वगैरे टाकावं लागत नाही. खत तयार करत असल्याने घरातच जिरत. अधूनमधून झाडांना कांदे, लसणाच्या पाल्याचं पाणी, हिंग हळदीचं पाणी यांचा स्प्रे करतो त्यामुळे किडीपासून सुरक्षा मिळते. चिमण्यांसाठी घरटही त्याने बांधलं आहे. स्वप्नीलची आई, पत्नी, बहिण अशी सगळ्यांना बागकामाची आवड आहे. बहिणीचा मुलगा आणि स्वप्नीलची मुलगी हे पुढच्या पिढीचे शिलेदारही बागकामात सक्रिय झाल्याचे तो सांगतो. मुलं प्रश्न विचारतात, निरीक्षण करतात. सहा वर्षाची माझी चिमुरडी फळ खाल्लं की आठवणीने बी बागेत नेते. मातीत पुरते.

मोठ्यांचं बघून अशा गोष्टी जेव्हा मुलांपर्यंत पोचतात, त्यांना त्या कराव्याशा वाटतात तेव्हा वाटतं की, आहे पृथ्वीचं मोल जाणणारं, ते मुलांपर्यंत पोचवणारं कुणीतरी आहे. त्यामुळेच यावर्षीच्या पृथ्वी दिवसाचं घोषवाक्य खऱ्या अर्थाने साजरं होतंय असंही मनात येतं. ‘इंव्हस्ट इन अवर प्लॅनेट’ अर्थात ‘पृथ्वी वाचवण्यासाठी पर्यावरणपूरक गुंतवणूक’ असं यावेळचं घोषवाक्य. आपली वसुंधरा फळे, फुले, भाज्या, मसाले, सुकामेवा, लाकूड अशा अगणित प्रकारात भरभरून दान देत असते. त्या बदल्यात आपल्याकडून केवळ प्रदूषण विरहित जीवनशैली, थोडंसं वृक्षारोपण इतकीच अपेक्षा आहे. आपण मात्र दिवसेंदिवस पैशाच्या हव्यासापोटी मोठया प्रमाणात वृक्षतोड करत सुटलो आहोत. वृक्षारोपण हा तर केवळ बातमी छापून आणण्यापुरता सोहळा करून ठेवला आहे. ‘वापरा आणि फेका’ धोरण राबवत असंख्य प्रकारचा ओला, सुका, जैविक, ई कचरा पृथ्वीच्या पोटात लोटत चाललो आहोत. पारंपरिक पद्धती दूर सारत रासायनिक खत, कीटकनाशक आदींचा मारा करत शेतीला इजा पहोचवत विषारी भाजीपाल्याच्या, फळांच्या राशी उभ्या करत सुटलो आहोत. याचे परिणाम म्हणून निरनिराळे आजार वाढत चालले आहेत. साथी पसरत आहेत, प्रदूषण वाढते आहे. शुद्ध ऑक्सिजन मिळेनासा झाला आहे. याशिवाय पुढच्या पिढीला शाश्वतपणे देण्यासारखं काही हाती शिल्लक राहत नसल्याने त्याची चिंता सतावते आहे. मात्र याचं गांभीर्य काही पर्यावरण प्रेमींनी ओळखले आहे. त्यांच्या विचार आणि कृतीतून त्याचा प्रत्यय जिवंतपणे समोर येतो आहे. मिळेल तेवढ्या जागेत, मिळेल त्या साधनात आणि रासायनिक, कृत्रिम गोष्टी टाळत ते नैसर्गिक पद्धतीने, साधनांच्या मदतीने फळे, भाज्या पिकवत आहेत. हिरवे कोपरे केवळ सजवत नसून रोजच्या जेवणात ते थेट ताटात येतील यावर कटाक्षाने भर देत आहे.

स्वतःच्या व्यवसायात, नोकरीत कितीही अडकलेले असली तरी काही मंडळी यासाठी आवर्जून वेळ काढतात. यातल्याच एक सविता पाटील. मूळच्या चांदवड तालुक्यातील भाटगाव इथल्या. व्यवसायाने परिचारिका आहे. सध्या गंगापूर रोडवरील माणिकनगर येथे रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर राहतात. त्या सांगतात, गेल्या वर्षापासून दवाखान्याच्या गच्चीवर डॉक्टर सर आणि मॅडमच्या प्रोत्साहनामुळे बाग लावली आहे. या बागेत आतापर्यंत कोबी, फ्लावर, टमाटे, पपई, वांगे, वाल, मिरच्या, अळू, गिलके, भोपळा, काकडी, तोंडली, लिंबू अश्या असंख्य भाज्या, फळे पिकविली आहेत. डॉक्टर, दवाखान्यातील इतर कर्मचाऱ्यांना ती देताना तर मला फार आनंद होतो. अनेकदा रुग्णांचे नातेवाईक गच्चीवर येतात. फुलेलेली बाग पाहून क्षणभर त्यांचे ताणतणाव विसरतात. त्याचं मन प्रसन्न होतं. कोरोनाकाळात  लॉकडाऊन असल्याने बाहेर जाणे शक्य नव्हते, तेंव्हा तर बागेनेच दिलासा दिला. बागेला जास्त वेळ देता आला. वडिलांमुळे शेती कामाची माहिती आणि आवड होतीच. ती आता कामास येते आहे याचा अभिमान वाटतो.

पर्यावरणाची काळजी घ्यायचं म्हणजे काय करायचं ते कित्येक छोटे छोटे उपक्रम सांगत असतात. त्यातलाच एक उपक्रम म्हणजे ‘गच्चीवरची बाग.’ या पर्यावरणपूरक उपक्रमाने नुकतंच १० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. “या दहा वर्षात ‘गारबेज टू गार्डन’ ही संकल्पना लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला व त्याला पर्यावरणीय बदलाशी संवेदनशील असणाऱ्या मंडळीनी भरभरून प्रतिसाद दिला. या दहा वर्षात नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक लोकांपर्यंत पोहचता आलं. जवळपास दीड हजार मंडळी कचरा व्यवस्थापनात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. जैविक अर्थात कुजणारा नैसर्गिक कचरा हा बाग फुलवतांना तर वापरला जातोच पण त्याचे खत करणे हे गरजेचे आहे. कारण त्यातून झाडेबाग यांच्यासाठी खताची गरज भागून जाते. गच्चीवरची बाग या उपक्रमाचे मार्गदर्शक संदीप चव्हाण सांगत होते.

सामाजिक संस्थांचेही एक पाऊल ….

‘आत्मनिर्भर वार्ड’ अंतर्गत नाशिक शहरातील ६ ठिकाणी ‘ओला कचरा घरातच जिरवा’ अशी संकल्पना राबविण्यात आली. पंचवटीतील महालक्ष्मी नगर येथील लोकांना खत तयार करण्यासाठी कंपोस्ट किट मोफत देण्यात आलं. आता इथले ९० टक्के लोक आपापल्या घरातला ओला कचरा घरातच जिरवत आहेत आणि त्यापासून खत तयार करत आहेत. त्यांना खत कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. आता घंटागाड्या फक्त सुका कचरा घेणार, ओला नाही असे त्यांना सांगण्यात आले. त्यांनीही ते मान्य केले आहे.

कचरा व्यवस्थापनाचे विविध मार्ग

१)    कुजणाऱ्यानैसर्गिक कचऱ्याचे उपलब्ध साधनांत कंपोस्टींग करणे.

२)    नैसर्गिक कचरा वाळवून तो कुंड्या व वाफे भरण्यासाठी करणे.

३)    वाळलेल्या कचऱ्याचा परसबाग तयार करण्यासाठी वापर करणे.

४)    ओला कचरा कुंड्यानाझाडांना देणे.

५)    वाळलेल्या कचऱ्याचे बिशकॉम बनवणे. ( पालापाचोळ्याचा चुरा तयार करणे)

नाशिककरांना घरपट्टीत सवलत….

सौरऊर्जा वापराला चालना देण्यासाठी शासनाकडून घरपट्टीत पाच टक्के सवलत दिली जाते. त्याच धर्तीवर नागरिकांनी घरामध्ये निर्माण झालेल्या कचऱ्याचे कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करण्याची सोय केल्यास अशा नागरिकांना घरपट्टीत सवलत दिली जाणार असून लवकरच त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवला जाणार आहे. शहराचा विस्तार होत असताना मुलभूत सुविधा पुरविण्यावर ताण निर्माण होत आहे. त्यात महापालिकेकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कचरा वाढत असल्याने घरामध्येच कंपोस्ट खत करता येईलयाबाबत महापालिकेने नियोजन केले आहे.

  • भाग्यश्री मुळे, मुक्त पत्रकार

Leave a Reply