Yes, it hurts!

मी अमेरिकेतील बोस्टन येथील नॉर्थईस्टर्न विद्यापिठात International Regulatory Affairs मध्ये MS करतेय. मात्र एका इंटर्नशिपमुळे मार्च 2020 मध्ये मी Philadelphia, Pennsylvania इथं होते. तिथं एका जोडप्याच्या घरी मी भाड्याने राहत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव अमेरिकेत जाणवू लागला होता तेव्हाची ही गोष्ट. प्रशासनाने Stay at Home च्या ऑर्डर लागू केल्या आणि माझंही घरून काम सुरू झालं. सुरूवातीला सगळंच नवीन होतं, Fear of unknown असल्याने उत्सुकता आणि भीतीही होती. पण आम्ही अति घाबरून गेलो नाही. घरमालकांकडे छोटा कुत्राही असल्याने माझा वेळ चांगला जाऊ लागला.

दरम्यान न्यूयॉर्कमधली कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढू लागली होती. माझा फिलाडेल्फिया इथला भाडेकरारही संपत आला होता. तसंही, माझी इंटर्नशिप सहा महिन्यांनी संपल्यावर मी बोस्टनला परत जाणं अपेक्षित होतं. अशा वातावरणात प्रवास करावा की नाही, याबाबत मी द्विधा मन:स्थितीत होते. दरम्यान माझ्या घरमालकांनी नवीन घर विकत घेतलंय आणि हे घर Rent out करणार हे समजलं. म्हणजे मला इथून निघण्याशिवाय पर्यायच नव्हता.

बोस्टनमध्ये भारतीय रूममेटससह एका बंगल्यात मी भाड्याने राहते. हे मित्रमैत्रिणींनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मला कारने घ्यायला यायची तयारी दाखवली. पण अमेरिकेत परिस्थिती चिघळायला लागल्याने फार काळ वाट पाहण्यात अर्थ नाही हे मला कळून चुकलं. इथं भारतासारखं कडक लॉकडाऊन नव्हतं, पण प्रवासाला वगैरे बंदी केली, तर मी फिलाडेल्फियात अडकून पडणार हे उघड होतं. त्यामुळे मी लवकरात लवकर बोस्टनला पोहचण्याचा निर्णय घेतला. बोस्टनच्या घरातील माझं लीजही ऑगस्टपर्यंत असल्याने तिथं मी सहज राहू शकणार होते.

हा निर्णय बोस्टनच्या रूममेटसना कळवला, तसं कोण जाणे काय चक्र फिरलं. ‘तू प्रवास करून अजिबात बोस्टनला येऊ नकोस, तू आहे त्या घरात राहा किंवा Air BNB घे पण इथं येऊ नकोस’ असा धोशाच त्यांनी सुरू केला. माझ्यासाठी हे सगळं अनपेक्षित होतं. एकतर मला करोनाची कसलीच लक्षणं नव्हती, दुसरं इथल्या घरात राहणं शक्य असतं तर मी अधिकचं भाडं भरून राहिलेही असते, पण आता फिलाडेल्फियात राहणं मला शक्य नव्हतं. हे मी त्यांना समजावू पाहत होते. प्रवासाची भीती मलाही वाटत होती, संसर्गाची शक्यता कमी व्हावी म्हणून मी बसचा पर्याय उपलब्ध असतानाही, जास्त पैसे खर्चून मी विमानाने जायचं ठरवलं. इकडे या एकेकाळच्या मित्रमैत्रिणींचा मात्र ‘येऊ नकोस’ पासून ‘तुला आमच्या जीवाची काहीच पर्वा नाहीये’ वगैरे धोशा सुरूच होता.

एकीकडे मी निघण्याची तयारी सुरू केली होती. विमान प्रवासात मर्यादित सामान नेण्याची परवानगी होती. त्यामुळे उरलेलं सामान मी शिपिंगने पाठवायचं ठरवलं. मी मानसिकदृष्ट्या बरीच खचले होते, ज्या मित्र- मैत्रिणींना मी अमेरिकेतलं कुटुंबच मानलं होतं, त्यांचं हे वागणं माझ्या आकलनापलीकडचं होतं. शिवाय सरकारी नियमांनुसार 14 दिवस माझ्या बोस्टनच्या घरातील रूममध्ये मी Quarantine होणार होतेच, Health professional असल्याने मला त्याचं महत्त्व कळलंच होतं, त्यामुळे त्याला माझी ना नव्हतीच. तरीही या लोकांचं अत्यंत कटू भाषेत माझ्या हक्काच्या भाड्याच्या घरी येऊ नकोस हे म्हणणं सुरूच होतं.

भारतात माझ्या कुटुंबाशी – आई, ताई, जिजुंशी माझं बोलणं सुरू होतं, त्याचा मला आधार होता. पत्रकार असलेल्या माझ्या ताईने फेसबुक ग्रुपवर याविषयी लिहिलं. आणि माझ्या कल्पनेपलीकडे अनोळखी लोक मदतीसाठी पुढे सरसावले. मिलिंद पदकी सर, यांचे विशेष आभार. त्यांनी फोनवरून मला खूप धीर दिला. ते कोरोनाविषयी मराठीतून जागृतीचं उत्तम काम करत आहेत. तर या परिस्थितीत काय करणं गरजेचं आहे, याविषयी त्यांनी मला छान मार्गदर्शन केलं.

इकडे या लोकांच्या नकाराचा धोशा आता धमकीच्या पातळीवर गेला होता की, ‘बघ, आम्ही चार जण आहोत आणि तू एकटीच’. मी फ्लाईटमध्ये बसणार होते, पण माझ्याच घरी मला जाता येईल का नाही याची मला भीती वाटायला लागली होती. दरम्यान माझ्या नॉर्थइस्टर्न युनिव्हर्सिटीच्या करोना हेल्पलाईनवर इमेल करून परिस्थितीची कल्पना दिली, की जर माझ्या रूममेटसनी मला घरात घेतलं नाही, तर मला तुमच्या आणि कदाचित पोलिसांच्या मदतीचीही गरज लागेल. प्रवासात मास्क, हॅन्डग्लोवज्, सॅनिटायझर अशी पूर्ण काळजी घेऊन मी बोस्टनला पोहोचले.

अपेक्षेप्रमाणे माझं घरी अतिशय थंड स्वागत झालं. मी जणू काही Covid 19 चा विषाणू घेऊन त्यांच्याकडे आले आहे, अशी त्यांची वागणूक होती. मी घरी आले, कारण कायदेशीररित्या ते मला अडवू शकत नव्हते. पण त्यांनी माझा विलगीकरणाचा काळ अतिशय अवघड करायचा ठरवून टाकलं होतं. माझी रूम, 14 दिवसांसाठी दिलेली एक स्वतंत्र वॉशरूम सोडून मी घरातलं काहीही वापरायचं नाही, असं सांगण्यात आलं. बाकीचं सर्व मान्य होतं, पण 14 दिवस स्वयंपाकघरातही जायचं नाही, म्हटल्यावर खायचं काय, हा प्रश्नच होता. माझ्या रूममध्ये एक छोटा फ्रिज, मायक्रोवेव्ह आणि बेसिक खाण्याच्या गोष्टी आणि पाणी ठेवण्यात आलं होतं. त्या रात्री मी बोस्टन पब्लिक हेल्थला इ-मेल केला. त्यांना विचारलं की, विलगीकरणात मी नक्की काय करण्याची गरज आहे आणि किचनचा वापर टाळणं गरजेचं आहे का? मी स्वतः फार्मासिस्ट आहे आणि Regulatory Affairs for drug, biologics and medical devices शिकते. त्यामुळे मला खात्री होती किचनचा वापर न करू देणं हे फक्त एक त्रास देण्याचं कारण आहे, कारण मी त्यांच्या इच्छेविरुद्ध इथं आले.

मला बोस्टन आरोग्य विभागाचा रिप्लाय आला, की तुला किचनचा वापर टाळण्याची गरज नाही. मी रूममेटसना सुचवलं की, मी दिवसातील फक्त दोन तास किचन वापरेन आणि माझी भांडी वेगळी ठेवेन. वापरानंतर सगळं डिसइन्फेक्ट करता येईल, ज्याला आरोग्यविभागाने पण दुजोरा दिला. हा रिप्लाय पाहिल्यानंतरही माझे रूममेटस्, ‘आम्हांला तू किचन वापरलेलं चालणार नाही, कारण आम्ही comfortable नाही’ यावर अडून होते. शेवटी मधला मार्ग म्हणून, ते मला खायला बनवून देतील असं ठरलं. कारण रोज बाहेरून खाणं मागवणं मला शक्य नव्हतं. कारण येणाऱ्या काही महिन्यात उत्पन्न काहीच नसणार हे दिसत होतं, आणि महत्त्वाचं म्हणजे बाहेरून मागवलेलं खाण्यात मला धोका ही वाटत होता.

माझ्या आयुष्यातील ते अविस्मरणीय १४ दिवस पार पडले. मी पूर्ण healthy होते. या काळात अर्थातच माझं कुटुंब आणि मित्र माझ्या पाठीशी भक्कम उभे राहिले. युनिव्हर्सिटीने मला पूर्ण मदत आणि पाठिंबा दिला. शिवाय मी FITTR या अॅपसाठी फिटनेस आणि न्यूट्रिशन कन्स्ल्टंट म्हणून काम करत असल्याने घरच्याघरी माझा व्यायाम, मेडिटेशन आणि आपल्या लोकांशी संवाद सुरू होता. हलक्याफुलक्या कॉमेडी सिरीज पाहून मन ताळ्यावर ठेवलं.

सगळ्यात जास्त धक्का अर्थातच जवळच्या म्हणवलेल्या मित्र- मैत्रिणींनी दिलेल्या भेदभावाच्या वागणुकीचा होता. अस्पृश्य असल्यासारखं वागवलं जाणं, म्हणजे काय याचा मला या काळात चांगलाच अनुभव आला. भारत आणि इतर अनेक ठिकाणी Health care professionals ना, प्रवास करून आलेल्यांना भेदभावाच्या वागणुकीला सामोरं जावं लागत असल्याच्या बातम्या मी वाचत होतेच. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, या कठीण काळात एकमेकांना माणुसकी आणि सौहार्द दाखविण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. आपल्याला फिजिकल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, लोकांना वाळीत टाकायचं नाही. या कठीण काळात जे लोक कुटुंबापासून दूर आहेत, आपलं कर्तव्य निभावत आहेत, त्यांचं जगणं सोपं करूया, फार अवघड नाही हे.

अर्थात हे दिवस आता मागे पडले. घरातही मित्र- मैत्रिणींशी त्यांचे झालेले गैरसमज आणि त्यांची करोनाविषयीची भीती दूर करून आमचं बोलणं सुरू आहे. अर्थात आता पूर्वीसारखं सगळं सहज सुंदर होणं अवघड आहे. या सगळ्यात बोस्टनचा आरोग्य विभाग, आमची नॉर्थइस्टर्न युनिव्हर्सिटी यांनी इमेलवरून केलेलं मार्गदर्शन आणि देऊ केलेली मदत कौतुक करण्याजोगी होती.

सध्या माझ्या राज्यात फेज रिओपनिंग सुरू झालंय. अमेरिकेत असणाऱ्या रंगभेदामुळे आणि काही दिवसांपूर्वी घडलेल्या हृदयद्रावक प्रसंगामुळे सध्या दंगली सुरू आहेत. अमेरिकसमोरची संकटे संपताना दिसत नाहीत, तरीही मी आशावादी आहे. हे ही दिवस जातील कारण रात्रीनंतर दिवस उजाडतोच.
– स्वप्नाली बनसोडे, बोस्टन, अमेरिका.

Leave a Reply