जालना जिल्ह्यातील ग्रेप्स हब म्हणून ओळखलं जाणारं कडवंची. इथल्या द्राक्ष उत्पादकांना यावर्षी अवेळीचा पाऊस, त्यानंतर थंडी आणि आताचं कडक ऊन याचा द्राक्ष बागेला फटका बसला. कडक उन्हामुळे द्राक्षांना तडे पडणे, जागेवर घड सुकून जाण्याचे प्रकार घडू लागल्याने व्यापाऱ्यांनी तिकडे पाठ फिरवली. ही द्राक्षे बांधावर फेकण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. सतत दोन वर्ष द्राक्षापासून उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी या बागांचे करायचे काय या विवंचनेत असताना कडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर या शेतकऱ्यांने मात्र हार मानली नाही.
कृष्णा यांनी एकट्याचा विचार न करता परिसरातील सर्व शेतकऱ्यांची 500 ते 700 क्विंटल द्राक्षे विकत घेतली. त्यातून तब्बल सव्वाशे क्विंटल बेदाणा अर्थात मनुके त्यांनी तयार केले आहे. यामुळे व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत निघाली असून, स्थानिक द्राक्ष उत्पादकांचा जीव भांड्यात पडला आहे.
गेल्या ११ वर्षांपासून कृष्णा क्षीरसागर हे शेती व्यवसायात सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत आले आहेत. शेतकऱ्यांची द्राक्ष खरेदी करताना व्यापारी केवळ आपला स्वार्थ साधून चांगल्या दर्जाची द्राक्षे खरेदी करतात. त्यामुळे मध्यम दर्जाची द्राक्षे शेतात सडून जायची. या द्राक्षांवर प्रक्रिया करून त्याला बाजारात किंमत मिळवून देण्याची कल्पना कृष्णा क्षीरसागर यांच्या डोक्यात आली.
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये द्राक्षाचे भाव पडले होते. व्यापाऱ्यांनी चांगला माल खरेदी करून बाकीचा माल सोडून दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागलं. यावर्षी कृष्णा यांनी या दुय्यम प्रतीच्या द्राक्षापासून मनुके तयार करण्याचा प्रयोग केला. आपल्या शेतातील 2 गुंठे जागेवर त्यांनी सव्वा दोन लाख रुपये खर्चून द्राक्ष वाळवण्यासाठी शेड उभ्या केल्या. त्यात मोठमोठे रॅक केले आहेत. या रॅकवर एका वेळी 20 टन माल पसरवता येतो. त्यांनी आतापर्यंत स्थानिक शेतकऱ्यांकडून 500 क्विटल द्राक्षांची खरेदी करून त्यापासून 125 क्विंटल मनुके तयार केले आहे. द्राक्ष विकत घेतांना त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचे पैसे जागेवरच दिले. असा आत्तापर्यंत त्यांचा नऊ लाखाचा खर्च झाला आहे. अजूनही 200 क्विंटल द्राक्षापासून मनुक्याचे उत्पादन चालूच आहे. तयार झालेले 125 क्विंटल मनुके त्यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले असून जून महिन्यापासून त्याची विक्री सुरू करणार आहेत. सध्या बाजारात मनुक्यांना किलोमागे 160 पासून ते 220 रुपयांपर्यंत भाव चालू आहे. त्यामुळे तयार झालेल्या मनुका विक्रीतून त्यांना जवळपास 14 ते 15 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. यापुढेही हा प्रयोग मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा त्यांचा विचार आहे. त्यांनी व्यापाऱ्यांनी सोडून दिलेल्या द्राक्षांची शेतकऱ्यांकडून खरेदी केली. त्यासाठी शेतकऱ्यांना आठ ते दहा रुपये किलोप्रमाणे मोबदला दिला. आधुनिक यंत्रणा नसल्याने त्या द्राक्षांवर पंढरपूर येथे वॉशिंग ग्रेडिंग केल्यानंतर तयार झालेला बेदाणा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला आहे.
कडवंची येथे शेकडो हेक्टरवर द्राक्ष बागांचे क्षेत्र आहे. परंतु, प्रत्येकवर्षी विविध कारणांनी द्राक्ष उत्पादक अडचणीत येतात. यावेळी मात्र ष्णा क्षीरसागर यांनी मनाने न हारता केलेल्या या धाडसी प्रयोगामुळे कडवंची गावा बरोबरच जिल्हा भरातील शेतकऱ्यांना आता द्राक्ष वाया जाण्याची भीती राहिली नाही. चांगला माल खरेदी करून दुय्यम प्रतीच्या मालाकडे पाठ फिरवणाऱ्या व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढणारा हा प्रयोग शेतकरी वर्गासाठी आर्थिक उन्नतीचा राजमार्ग ठरणारा आहे.
– अनंत साळी, जालना