Site icon Navi Umed

बॅक किचन ते शेफ मसाल्यांचा निर्माता

Advertisements
||अपना टाईम आएगा|| मालिकेचा पुढील भाग
संतोष मूळचे नांदेडचे. नोकरीच्या शोधात ते मराठवाड्यातील मोठ्या शहरात अर्थात औरंगाबादला आले. सुरूवातीला त्यांनी एका खाजगी कंपनीच्या किचन विभागात काम केलं. हे काम म्हणजे, तिथल्या कर्मचारी वर्गाची जेवणाची ताटं आणि सगळी भांडी घासण्याचं काम!! ही कंपनी फारच मोठ्ठी असल्याने आणि कर्मचारी संख्या प्रचंड असल्याने संतोष यांचा पूर्ण दिवस केवळ भांडी घासण्यातच जायचा. पण आज हेच संतोष कांगुलकर ‘शेफ मसाले’ या ब्रॅन्डनेमखाली घरगुती काळा, गोडा, गरम मसाल्यांपासून हॉटेलात लागणारे चटकदार चवीचे सर्व मसाले प्रोफेशनली तयार करतायत. आणि एक उद्योजक म्हणून त्याने चांगला जम बसवला आहे.
याबद्दल आणखी बोलताना संतोष म्हणाले, “खरंतर कंपनीत भांडी घासण्याचं काम करताना थकून जायला व्हायचं. पण माझा मूळचा स्वभाव चौकस असल्याने त्याच कंपनीच्या किचनमधल्या मुख्य शेफशी मी ओळख करून घेतली. त्याच्याकडून वेगवेगळे पदार्थ, त्याची पूर्वतयारी, मसाल्यांचे महत्त्व, पदार्थांच्या रेसिपीज हे सगळं शिकून घेतलं. आणि हेच माझ्या पुढच्या चांगल्या नोकरीचं निमित्त ठरलं. स्वयंपाकघरातील कौशल्याच्या जोरावर खुलताबादच्या ‘प्रथम’ संस्थेच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्रावर ‘शेफ’ म्हणून माझी नेमणूक झाली. या केंद्रात शिकायला येणारे प्रशिक्षणार्थी, कर्मचारी, पाहुणे आणि संबंधितांच्या जेवणाची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारली.”
जात्यावर पारंपरिकरीत्या दळले जाणारे ‘शेफ मसाले’
संतोष कांगुलकरांच्या हातची चव ‘प्रथम’च्या प्रशिक्षण केंद्रात नावाजली जात होती. पण मग ‘शेफ मसाले’ हा व्यवसाय सुरू कसा झाला, हे विचारल्यावर तो म्हणाला, “प्रथमच्या उद्योजक विकास कार्यक्रमाचा भाग म्हणून मी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देत होतो. एका विद्यार्थ्याने मला विचारलं की तुमचा काही व्यवसाय आहे का, ज्याचं माझ्याकडं उत्तर नव्हतं. हा काळ लॉकडाऊनचा होता. त्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाने मला विचार करायला भाग पाडले. खरंच आपला वीसेक वर्षांचा हॉटेल इंडस्ट्रीतला अनुभव गाठीशी असताना या टप्प्यावर आपण व्यवसायाचा विचार करायलाच हवा हे जाणवायला लागलं. अश्या वेळी प्रथम संस्थेतले अधिकारी आणि लातूरच्या ‘वाटाड्या’ प्रशिक्षण प्रबोधिनीचे डॉ. विकास कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्याकडच्या तीनशेहून अधिक बिझनेस प्लॅनपैकी माझ्यासाठी मसाल्यांचा व्यवसाय परफेक्ट असेल, हे मला जाणवलं. मग या व्यवसायाची पूर्ण माहिती घेऊन कोरोनाकाळातच प्रत्यक्षात आला तो आमचा ब्रॅंड- शेफ मसाले “
दरम्यान, संतोष यांचा परिवारही नांदेडहून खुलताबादला आला. अर्थात कुटुंबासोबत आलं ते घरातलं जातं आणि उखळ- मुसळ. जे खऱोखर संतोष यांच्या व्यवसायाला कारणीभूत ठरलं. कारण मशीनमेड मसाले बनविणारे अनेक जण मार्केटमध्ये आहेत, पण जी चव पाट्या- वरवंट्यावर वाटलेल्या वाटणाला किंवा उखळात कुटलेल्या मसाल्याला असते, ती यंत्रावर सहज येत नाही याची जाणीव संतोष यांना होती. म्हणूनच आपल्या शेफ मसाल्याचा यूएसपी असेल तो जात्यावर, उखळात, खलबत्त्यात बनवले जाणारे मसाले हे त्यांनी निश्चित केलं. घरी आई, पत्नी, वडील अशी तगडी टीम संतोष यांच्या मदतीला उभी राहिली.
शेफ मसालेचा दुसरा यूएसपी आहे, तो म्हणजे अत्यंत दर्जेदार असा कच्चा माल. संतोष कांदा, लसूण आणि हळद यासह जवळपास ८५ टक्के कच्चा माल थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. याशिवाय लवंग, दालचिनी, वेलची, दगडफूल इ. सारखे अख्खे गरम मसाले अतिशय पारखून होलसेल व्यापाऱ्यांकडून आणले जातात. संतोष सांगतात, “शेतकऱ्यांकडून मला कमी दरात आणि अतिशय दर्जेदार माल मिळतो. मसाल्याला चव हवी असेल तर गरम मसालाही पारखून घ्यावा लागतो. अनेकजण लवंगांचे, वेलदोड्यांचे तेल काढून स्वस्त दरात विकतात. पण त्याचे मसाले तितके सुगंधी बनत नाहीत. त्यामुळे आई- वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय दर्जेदार मालाची खरेदी करायला मी शिकलो. आलेले कच्चे पदार्थ स्वच्छ करून, गरज असल्यास धुवून, वाळवून साठवले जातात. मग त्यांचे तुकडे केले जातात, सुगंध टिकविण्यासाठी आम्ही ते भाजून घेतो. आणि मग अर्थातच जातं आणि उखळात योग्य प्रमाणात कुटून मसाले तयार होतात.”
आपल्या उत्पादनांसोबत ‘शेफ मसाले’चे संतोष कांगुलकर
जात्याची प्रक्रिया पार पाडल्यानंतर मसाले पॅक करून संबंधित ठिकाणी पाठवले जातात. गुजरातमधील प्लास्टिक पॅकेट बनवणाऱ्या कंपनीने त्यांची पॅकेजिंगची गरज सोडवली आहे. त्या प्लास्टिक पॅकेटवर मग प्रकारांनुसार, शेफ मसालेचे स्टिकर्स चिकटवले जाता आणि तयार मसाले आकर्षक वेष्टनात ग्राहकांना पाठविले जातात. मसाल्यांव्यतिरिक्त, कांदा- लसूण फ्लेक्स, घरगुती चटण्या आणि विविध चवींचे लोणचे देखील आता शेफ मसालेच्या स्पेशलाईज्ड पदार्थांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.
संतोष यांचे मसाले माऊथ पब्लिसिटीने अनेक ग्राहकांपर्यंत सहज पोहोचत आहेत. खुलताबादला त्यांच्या घरातून दरवळणाऱ्या सुवासाचा माग काढत सुद्धा अनेक जण स्वत: खरेदीला पोहोचतात. या शिवाय सोशल मीडियाचा चांगला वापर शेफ मसालेच्या प्रसिद्धीसाठी केला जातो.फेसबुक, व्हॉटसअप इ. च्या माध्यमातूनसुद्धा शेफ मसालेची चांगली जाहिरात होते. आज शेफ मसाले मुंबई, पुणे, बंगलोर, रायपूर,दिल्ली, रांची आणि इतकंच नव्हे, तर थेट अमेरिकेपर्यंत दाखल झाले आहेत. शेफ मसालेच्या यादीत ४१ प्रकारचे मसाले असून काळा- गोडा- गरम- कांदा लसूण याव्यतिरिक्त रसवंती मसाला, बैंगन मसाला, शेवगा हंडी मसाला, कंदुरी मसाला असे अनेक युनिक मसाले त्यांच्या मेनूत आहेत, त्यामुळे घरगुती ग्राहकांपासून ते मोठ मोठ्या हॉटेलमधील शेफ या मसाल्यांवर खूश आहेत.
संतोष कांगुलकर सांगतात, “केवळ 2100 रूपयांत मी या व्यवसायाची सुरूवात केली. यात प्रचंड मेहनत आहे, अभ्यास आणि संशोधन आहे. आज घडीला दर महिन्याला 80-85 हजार रूपयांचा मसाला मी विकतो. पारंपरिक ज्ञानाला आधुनिक, व्यावसायिक तंत्रज्ञानाची जोड दिली की तुमची उत्पादनं जगभरात पोहोचू शकतात. तुमची मेहनतीची तयारी असेल, तर यश मिळविणे अवघड नाही. “
लेखन: आशय गुणे
नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/
Exit mobile version