दिवाळी म्हणजे इतरांना आनंद देणं
पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातलं धोदडेपाडा. पाड्यावर यंदा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. ठाण्यातल्या इमेज वेल्फेअर अचीवर्स फोरममुळे.
नितीन विरखरे यांनी २५ वर्षांपूर्वी ही संस्था सुरू केली. संस्था अनाहत योगप्रशिक्षण वर्गही चालवते. वर्गातले विद्यार्थी दसरा-दिवाळीनिमित्त दुर्गम पाड्यावर कपडे, दिवाळीचा फराळ, इतर खाऊ, धान्य, घरगुती भांडी, शालेपयोगी साहित्य, मुलांची खेळणी वाटतात. उपक्रमात कुठेही दान किंवा मदत म्हणून पैसे घेतले जात नाहीत आणि दिलेही जात नाही. गाव निवडताना क्लासचे काही विद्यार्थी त्या गावाची माहिती घेतात. तिथल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेतला जातो. मग दिवाळीपूर्वी तीन दिवस ठरवलेल्या ठिकाणी साहित्य जमा केलं जातं.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कळवा इथल्या खारेगाव इथं अयर्नश्वर महादेव मंदिर योगा हॉलमध्ये ट्रकभर साहित्य जमा झालं. ते घेऊन संस्था ३० ऑक्टोबरला धोदडेपाड्यावर पोहोचली आणि आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.
दिवाळी म्हणजे आनंद. पण आजही अनेकांना दिवाळीलाही गोडधोड, चांगले कपडे पाहायलासुद्धा मिळत नाहीत. अशांसोबत हा आनंद वाटून घेणं, म्हणजे दिवाळी;असं संस्थेला वाटतं.
– संतोष बोबडे

Leave a Reply