Site icon Navi Umed

यश खेचून आणणारा सोलापूरचा ‘शरण’

Advertisements

बालपणापासून शरण अत्यंत हुशार आणि अभ्यासू मुलगा. मात्र दुसरीकडं परिस्थिती अत्यंत नाजूक. आई अक्षरशत्रू तर वडीलांना केवळ अक्षरांची ओळख. मुलांनी शिकून अधिकारी व्हावं, यासाठी ते रात्रंदिवस काबाडकष्ट करायचे. मुलाने रात्रीचा दिवस केला आणि अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. ही कहाणी आहे आईवडिलांसोबत डोक्यावर पाटी घेऊन भाजीपाला विकणार्‍या एका २६ वर्षीय शरण कांबळे तरूणाची.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या भोगावती नदी काठच्या तडवळे (यावली) गावचा तो रहिवासी. शरण गोपीनाथ कांबळे याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट २०१९मध्ये घेण्यात आलेल्या सीएपीएफ असिस्टंट कमांडंट (ग्रुप ए) परीक्षेमध्ये देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.


शरणने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा तडवळे इथं पूर्ण केलं तर माध्यमिक शिक्षण यशवंतराव प्रशालेत झालं. अत्यंत हुशार असल्यामुळे शाळेत शरण सर्व शिक्षकांचा लाडका विद्यार्थी. दहावीत प्रचंड अभ्यास करून ९५ टक्केवारी घेत तो उत्तीर्ण झाला. बोर्ड परीक्षेत जास्त गुण मिळवल्याने त्याच्या शिक्षकांनी त्याला स्पर्धा परीक्षा करण्याचा सल्ला दिला. गुरुमंत्र घेऊन तो अधिकारी होण्याचे स्वप्न पाहू लागला. वैराग येथून उच्चमाध्यमिक विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज शास्त्र शाखेतून ९१ टक्के गुण मिळवले.
एकेकाळी महाविद्यालयास जाण्यासाठी शरणकडे पैसे नसायचे; म्हणून तो जीपच्या पाठीमागे लटकून अर्धे तिकीट भरून महाविद्यालय गाठायचा. आपलं शिक्षण मागं पडू नये यासाठी आईवडिलांसोबत तो डोक्यावर पाटी घेऊन भाजी विकायचा. मात्र त्याने शिक्षणाची पाठ सोडली नाही. त्याला सीईटीच्या क्लाससाठी पैसे नव्हते, म्हणून त्यानं घरी राहून अभ्यास केला. सीईटीची परीक्षा पास झाल्यानंतर वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथून ‘बीटेक’ तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरमधून 2018 मध्ये मास्टर ऑफ टेक्‍नॉलॉजीची पदवी पूर्ण केली.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीने वीस लाखांचे पॅकेज अॉफर दिले, पण शरणने ती मोठी ऑफर नाकारली. शरणचा मोठा भाऊ दादासाहेब इंजिनीयर आहे. त्यानेच शरणला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिलं. भावाकडून मिळालेलं प्रोत्साहन अाणि बार्टी कडून मिळालेल्या स्कॉलरशिपचा आधार घेत त्याने स्पर्धा परीक्षेसाठी दिल्ली गाठली. सलग दोन वर्ष रोज बारा-तेरा तास अभ्यास सुरू ठेवला. ऑगस्ट 2019 मध्ये पहिल्यांदाच परीक्षा दिली आणि तो देशात आठव्या क्रमांकांने उत्तीर्ण झाला.
आयएएस अधिकारी व्हायचं त्याचं स्वप्न आहे. त्यासाठीची मुख्य परिक्षाही त्याने नुकतीच दिली आहे. शरण सांगतो, “प्रत्येक संकट परीक्षा घेतं. न्यूनगंड न बाळगता त्याला आपण आत्मविश्वासाने तोंड देणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टच्या पूर्णत्वासाठी जिद्द आवश्यक असते. मी शेवटपर्यंत जिद्द बाळगून यश खेचून आणलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी अभ्यासाला सुरुवात केली. माझ्या या यशात माझे वडील गोपीनाथ आणि आई सुदामती तसेच मोठा भाऊ दादासाहेब यांचे खूप मोठं योगदान आहे.”

– अमोल सीताफळे, बार्शी, सोलापूर

Exit mobile version