Site icon Navi Umed

महिला इलेक्ट्रिशियन्सचं गाव!

Advertisements

“मला पहिला पगार मिळाला तेव्हा फार- फारच आनंद झाला. घरात आई- बाबा- भाऊ- बहीण सगळ्यांना काही ना काही भेटवस्तू मी विकत आणली. आता आईला जेव्हा- जेव्हा पैशांची अडचण असते, तेव्हा मी तिला पैसे देऊ शकते, हे फार छान वाटतं” ‘बेस्ट स्टुडंट’ पुरस्कार मिळालेली साक्षी चित्ते सांगत होती. “लोकांना आधी आश्चर्यच वाटतं, आम्ही मुली हे इलेक्ट्रिशियन्सचे काम करतोय, ते बघून! पण हे काम मी खूप चांगल्या प्रकारे करते, याचा मला अभिमान आहे. एवढंच नाही त्यातून आम्ही पैसेही मिळवतो. माझ्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मला खूप चांगलं काम करून, भरपूर पैसे मिळवून, त्याला सर्वात चांगलं शिक्षण द्यायचंय” भारती पाचंगे सांगत होती.

साक्षी चित्ते, भारती पाचंगे, शीतल शिरसाठ, नीलम शाहराव, पगारातून भावाची फी भरणारी सुप्रिया क्षीरसागर किती जणींची नावं घ्यावीत? या सगळ्या तरूणी त्यांच्या गावातल्या, पहिल्या पिढीतल्या महिला इलेक्ट्रिशियन आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातलं खुलताबाद तालुक्यातलं- वडगाव हे त्यांचं गाव. या गावातले 28 तरूण युवा कौशल्य प्रशिक्षणातून सर्टिफाईड इलेक्ट्रिशियन झालेले आहेत. आणि त्यापैकी 22 इलेक्ट्रिशियन तर मुलीच आहेत. हे तरूण तरूणी फक्त प्रशिक्षण घेऊन शांत बसलेले नाहीत, तर त्यांना नोकऱ्याही लागलेल्या आहेत.

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनमधून सर्टिफाईड इलेक्ट्रिशियन झालेल्या तरूणी

मुली आणि ‘इलेक्ट्रिशियन’? असा प्रश्न तुमच्या मनात पुन्हा कधीच येऊ नये, अशी कामगिरी इथल्या युवतींनी करून दाखवली आहे. पण हे अर्थातच सोप्पं नव्हतं. ‘प्रथम एज्युकेशन फाउंडेशन’ चे कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत, खुलताबाद इथं ‘कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ आहे. राज्यातील अनेक भागातील तरूण- तरूणी कुठल्यातरी कौशल्याचं प्रशिक्षण मिळवण्यासाठी इथं दाखल होतात. तिथं ‘इलेक्ट्रिकल’,  तसंच Healthcare: General Duty Assistant, Hospitality आणि Plumbing हे इतर असे कोर्सेस आहेत. दोन महिन्यांचा हा कोर्स पूर्ण करून मुलांची ‘प्लेसमेन्ट’ होते. आणि मग एक मार्ग खुला होता. तो असतो आर्थिक स्वातंत्र्याचा, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा! अर्थातच स्वतःची, स्वतःच्या परिवाराची आर्थिक प्रगती आणि एकूणच गावाच्या विकासात योगदान देण्याचा!

मागच्यावर्षी काही मुला-मुलींनी ‘प्रथम’चा हा कोर्स करायचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यामागे काही घरांमध्ये कोविडमुळे उपजीविकेचे बंद झालेले दरवाजे उघडणं, हे महत्त्वाचं कारण होतं. अर्थातच रोजगार मिळावा, पैसे कमवावेत हा सर्वात महत्त्वाचा उद्देश या तरूणांचा होता. हे वेगवेगळे कोर्स तरूणांना अर्थातच उपयोगी पडणार होते. तरूण मुलगे तर सहज दाखल होत होते, पण मुलींनी जेव्हा या कोर्सेसमध्ये रस दाखवला तेव्हा पालक मात्र तरूण मुलींना कोर्ससाठी, खुल्ताबादच्या ‘प्रथम’च्या प्रशिक्षण केंद्रात दोन महिने मुक्कामी ठेवण्यासाठी आधी जरा काचकूच करत होते. पण मग या मुली आपल्या पालकांना ‘प्रथम’च्या प्रशिक्षण केंद्रावर- पेस सेंटरवर घेऊन आल्या. आणि मग इथली राहण्या- खाण्याची, प्रशिक्षणाची सुरक्षित आणि उत्तम सोय पाहून पालकांनी त्यांना तिथं राहण्याची आणि कोर्स करण्याची परवानगी दिली.

प्रशिक्षण घेऊन नोकरीला लागलेली वर्षा आरके म्हणते, “आधी गावातले लोक म्हणायचे, नर्सिग, बँकिंग असला काहीतरी कोर्स करायचा, इलेक्ट्रिकल कशाला शिकतेस? तुम्हांला थोडीच नोकरी लागणार आहे? तेव्हा मी त्यांना म्हणलं, जगात मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत, मग मुली इलेक्ट्रिकलचा कोर्स का नाहीत करू शकत मग? आणि आता नोकरी लागल्यावर, कमाई सुरू झाल्यावर तर लोकांची तोंडं आपोआपच बंद झाली आहेत.”

गावकऱ्यांनाही या कर्तुत्त्ववान लेकींचा अभिमान आहे

खरोखर खुलताबाद आणि आजूबाजूच्या परिसरातील एमआयडीसीमधील वेगवेगळ्या कंपन्यात वर उल्लेख केलेल्या साक्षी, शीतल, सुप्रिया, नीलम अश्या कित्येकींना नोकऱ्या लागल्या आहेत. त्यांनीसुद्धा आम्ही आमच्या आजूबाजूच्या मुलींना हा कोर्स पूर्ण करून नोकरी करायला जाताना पाहिलंय, त्यामुळे आपल्यालाही हे जमेल, हा निर्णय घेणे सोपं झालं अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. या मुलींशी बोलताना कळत होतं की, आपल्याला मिळालेल्या पगाराचं काय करायचं, स्वतःसाठी काही घ्यायचं का किंवा घरी किती पैसे द्यायचे अशा यांच्या चर्चादेखील सुरू झाल्या आहेत. एकूण काय, तर इथल्या मुलींच्या व्यक्तिमत्वात निवड-स्वातंत्र्य हा गुण विकसित होऊ पाहतो आहे. कदाचित त्यामुळे पुढे त्यांचे स्वतंत्र विचारही विकसित होऊ शकतील.

फक्त मुलींच्याच नाही तर गेल्या वर्षभरात त्यांच्या पालकांच्या आणि इतर गावकऱ्यांच्या विचार करण्यातदेखील प्रचंड बदल घडल्याचं जाणवतंय. आधी मुली आणि इलेक्ट्रिशियन!? कसं काय शक्य आहे, असं म्हणत शंका घेणाऱ्या, खिल्ली उडवणाऱ्या लोकांची मतं नोकरीला जाणाऱ्या, या तरूण इलेक्ट्रिशियन मुलींना बघून बदलत आहेत. कारण, रोज सकाळी मुलींचा एखादा छोटा समूह कंपनीच्या बसची वाट बघत उभा असलेला अनेकांना दिसतो. कंपनीतही पुरूषांच्याच साथीनं सगळी इलेक्ट्रिक कामं या तरूणी उत्तमप्रकारे पार पाडत आहेत, हे बघून मुलींनाही सगळं जमतं, यावरचा विश्वास वाढतोय.

घरांमधील विजेची समस्या, फ्यूज बदलणे, छोटीच नाही मोठीही  दुरूस्ती इ. कामांसाठी आता बाहेरून इलेक्ट्रिशियन बोलवायची गरजच राहिली नाहीए. कारण वडगावच्या इलेक्ट्रिशियन लेकी आणि लेकही या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहे.  इलेक्ट्रिशियन म्हणून प्रशिक्षित झालेल्या २८ तरूण- तरूणींचं हे गाव आहे-  इलेक्ट्रिशियन्सचे गाव!

तुमच्या गावातील/शहरातील तरूणांना कौशल्य विकास प्रशिक्षणात सहभागी व्हायचे असल्यास aashay.gune@pratham.org येथे संपर्क करा.

लेखन: आशय गुणे.

 

‘नवी उमेद’ कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

 

#नवी_उमेद

#प्रथम_एज्युकेशन_फाऊंडेशन

#औरंगाबाद

#इलेक्ट्रिशियनलेकी

#कौशल्य_विकास_प्रशिक्षण

Exit mobile version