Site icon Navi Umed

रुग्ण हेच कुटुंब

Advertisements
महाविद्यालयात असताना विद्यार्थी आघाडीचे नेतृत्व, नंतर भाजपाच्या युथ विंगमध्ये भरीव कामगिरी…जगदीश मुळीक यांच्या राजकारणातल्या कारकिर्दीची सुरूवात अशी विद्यार्थीदशेतच झाली.
जगदीश आमदार म्हणून पहिल्यांदाच निवडून आले, तरीही तळागाळातील सततचा लोकसंपर्क आणि लोकसमस्यांची जाणीव असल्याने निवडून येता क्षणी कामाला कुठून सुरुवात करावी, असा प्रश्न त्यांना पडला नाही.
सर्वच मोठ्या शहरांत कचर्याची समस्या मोठी आहे. ती दूर करण्यासाठी जगदीश मुळीक ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत अनेक उपक्रम राबवत आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधून घेतली आहेत. पाणी हा महत्वाचा विषय. यासाठीच भामा-आसखेड प्रकल्पाचा पाठपुरावा त्यांनी केला आहे. या प्रकल्पपूर्तीनंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असा जगदीश मुळीक यांचा विश्वास आहे.
रुग्णसेवा हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. वडगावशेरी मतदारसंघातील येरवडा मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या समस्यांची जगदीशजींना विशेष जाणीव आहे. घरातील लोकांनी दूर लोटलेल्या या रूग्णांना त्यांनी आपले कुटुंब मानले आहे. सणासुदीला ते आपल्या कुटुंबापेक्षाही जास्त वेळ या लोकांसोबत घालवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतात. रुग्णांना, रुग्णालयाला लागणाऱ्या विविध गरजेच्या वस्तू, मशीन्स यांचा पुरवठा नीट होईल, हे बघतात.
मतदारसंघातील पालिकेच्या शाळांमध्ये ध्वजारोहण व इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने नियमितपणे जाऊन गरीब विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणं, त्यांच्या गरजांची पूर्तता करणं जगदीशजी करत असतात. मुले ही वोट बँक नसल्याने त्यांच्या समस्यांची तड कोण आणि कशी लावणार या प्रश्नावर जगदीशजी म्हणाले, “आईला मुलांच्या समस्या न बोलताही कळू शकतात, त्याचप्रमाणे तळमळीच्या कार्यकर्त्याला अशा समस्यांची जाणीव आपसूकच असते, असायला हवी.” मतदारसंघातील अनाथ मुलांना निवारा-शिक्षण देणार्यां संस्थांनाही ते मदत करत असतात.
वडगावशेरीत सनसिटीसमोर त्यांचे धाकटे बंधू नगरसेवक योगेश मुळीक यांच्या पुढाकाराने बांधलेले राजे शिवाजी महाराज उद्यान हे आता एक प्रेक्षणीय ठिकाणच झाले आहे. मुलांसाठी, जेष्ठ नागरिकांसाठी लागणाऱ्या सर्व सोयी, भरपूर खेळण्याचे साहित्य यांची रेलचेलच तिथे आहे. सुरक्षेचा विचार करून एवढया मोठ्या उद्यानात त्यांनी CCTV कॅमेरेही बसवून घेतले आहेत. संध्याकाळी संपूर्ण उदयान सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्यांनी उजळून निघते.
विधिमंडळात विषय मांडण्यासाठी कुठून माहिती मिळवता? यावर जगदीशजींचे उत्तर – “तळागाळातील लोकांशी, विविध विभागात राहणाऱ्या सर्व स्तरातील नागरिकांशी नेहमीच संपर्क ठेवून असल्याने, नागरिकांच्या विविध समस्यांची कल्पना असतेच. नियमित वृत्तपत्रवाचनातूनही समस्यांची ओळख होतेच.”
‘नवी उमेद’ या फेसबुक पेजचे जगदीशजींनी स्वागत केले. आणि असा उपक्रम ‘संपर्क’ संस्थेनेने सुरु केल्याबद्दल अभिनंदन करून ‘नवी उमेद’ला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
– वैशाली देसाई, पुणे
Exit mobile version