Site icon Navi Umed

सोलापुरात फिरते ग्रंथालय उभे करण्यासाठी धडपड करणारा पुस्तकवेडा गणेश पवार

Advertisements

लहानपणापासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेण्यापर्यंत मी ऐकत आलोय की, डॉ.बाबासाहेब  आंबेडकरांनी पुस्तकासाठी एक स्वतंत्र घर उभा केले होते. ते वाक्य माझ्या अजूनही कायम स्मरणात आहे. आपण नागरिकांसाठी स्वतःची लायब्ररी तयार करावी ही भावना माझ्या मनात कायम रुजली, गणेश पवार सांगत होता. वाचून झालेली पुस्तके आपण रद्दीत टाकत असतो या पुस्तकाचे पुढे काय होते हे कुणाला माहीत नाही. पुस्तक वेड्या गणेश पवार यांनी हीच रद्दीतील पुस्तके,मासिक गोळा करीत सोलापुरात फिरते ग्रंथालय उभे करायचं ठरवलं आहे. त्यातूनच त्यांना आतापर्यंत 1 हजाराहून अधिक पुस्तके संकलित केली आहेत.

सोलापुरातील वाचन संस्कृती वाढावी यासाठी विविध संघटनेच्या वतीने विविध उपक्रम घेतले जात आहेत. महोत्सव, मेळावे, स्पर्धा घेऊन वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. गणेश पवार हा सोलापूरचा रहिवाशी. वाचनाची लहानपणापासून आवड, त्याचे  पदवीपर्यंतचे शिक्षण दयानंद महाविद्यालयात पूर्ण झाले तर पदव्युत्तर  शिक्षण हे सोलापूर विद्यापीठात झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील तो भूगर्भशास्त्र विषयाचा गोल्ड मेडलिस्ट आहे. गणेशचे वडील सिद्धेश्वर पवार हे रिक्षा चालवून आपला संसाराचा गाडा चालवतात. घरची परिस्थिती तशी सामान्यच, गणेशच्या प्रत्येक उपक्रमात वडील खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे राहतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गणेश पवार हा पुण्यात नोकरीसाठी भटकंती करीत आहे. वाचनाची आवड असल्यामुळे पुस्तक खरेदी करण्यासाठी फिरत होता. एके ठिकाणी सहज रद्दीच्या दुकानात जुनी पुस्तके, मासिक आहे का विचारायला गेल्यास तर त्याला त्या ठिकाणी विविध प्रकारची पुस्तके दिसून आली. किलोच्या भावात त्याने पुस्तके खरेदी केली. खऱ्या अर्थाने इथूनच त्याला ग्रंथालयाची संकल्पना सुचली.

दररोज पायी फिरत भटकंती करीत असताना पुण्यातील सात ते आठ प्रकारची दुकाने शोधली आणि तिथून तो रद्दीवाल्याकडूनच किलोच्या भावात पुस्तके खरेदी करू लागला आहे. वारजे रोड,कात्रज रोड, अशी आणि इतर भरपूर ठिकाणाहून मोठमोठी रद्दीची दुकाने गणेशने पालथी घालून पुस्तक संकलन केले आहे. ही सर्व पुस्तके संकलित करून सोलापूर शहरामधील घराच्या शेजारी असणाऱ्या सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या हॉलमध्ये लायब्ररी उभी करायचं गणेशच्या मनात आहे. त्याचबरोबर एक फिरते ग्रंथालाही उभे करण्याचे मानस असल्याचे पवार यांनी सांगितले.

गणेश पवारने संग्रहित केलेल्या या पुस्तकामध्ये जयंत पवार, व. पु. काळे, अच्युत गोडबोले, पु. ल. देशपांडे, मासिके, दिवाळी अंक, दुर्मिळ स्वरूपातील इंग्रजी भाषेतील नोवेल्स, विविध स्पर्धा परीक्षा पुस्तक, धार्मिक ग्रंथ, काव्यसंग्रह, पर्यावरणावर आधारित पुस्तके गोळा केली आहेत. सोलापुरात स्पर्धा परिक्षेच्या अभ्यास करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके घेण्यासाठी पैसे नसतात, त्यामुळे त्यांचा अभ्यास होत नाही, अशा स्पर्धा परीक्षा देणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोट्स व पुस्तके देण्याचा मानस पवार यानी केला आहे.

गणेश सांगतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माझ्या आईच्या प्रेरणामुळेच स्वतःचं फिरतं ग्रंथालय करण्याचा मानस आहे. माझी आईला कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना मला इतक्या हालाखीतून शिकवले आणि त्यातूनच मी भूगर्भशास्त्रात जिल्ह्यात पहिला येऊ शकलो.

गणेश म्हणतो, आपल्याकडे पुस्तके वाचून झाली तर मला द्या किंवा जी रद्दी स्वरूपातील कोणती पुस्तके असेल ती मी योग्य भावात घेऊ इच्छित आहे, त्यापासून मी लायब्ररी तयार करीन.

Exit mobile version