Site icon Navi Umed

चैतन्यने फुलवलेली हिरवाई

Advertisements

 

चैतन्य आबाजी नाळे. सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथल्या दुधेबावी गावचा. सध्या बीएससी एग्रीकल्चर तिसऱ्या वर्षात शिकत आहे.


सांगलीतल्या शांतिनिकेतन विद्यालयात तो होता. या शाळेतले वर्ग निसर्गाच्या शाळेत भरणारे. तिथेच चैतन्यला झाडांची ओढ लागली. पुन्हा मूळ गावी आल्यावर वडिलांसोबत गावोगावी फिरताना चैतन्यच्या जाणिवा अधिक विकसित झाल्या. त्याचे वडील कृषी साहाय्यक. गावोगावी फिरताना झाडांविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज चैतन्यला वाटली.
साधारण २०१९ ला आजूबाजूच्या गावी पाणी फाऊंडेशनचं काम त्यानं पाहिलं. दुधेबावीमध्ये पावसाचं प्रमाण कमी. गावात झाडं लावली तर पाणी अडायला मदत होईल, असं त्याच्या लक्षात आलं. चैतन्यची आई लता यादेखील यासाठी काम करतात. लता यांनी गेल्याच वर्षी वसुंधरा फाउंडेशन सुरू केलं आहे. सेंद्रिय शेती, गच्चीवरील भाजीपाला याचं प्रशिक्षण ही संस्था देते. शेतमालापासून मूल्यवर्धित उत्पादनं बनवण्याचं प्रशिक्षण देते.


वसुंधरा फाऊंडेशनच्या साथीनं आधी चैतन्यनं ८० झाडं लावली. त्यातली ५० टिकली. स्थानिक भागातील बिया वापरून रोपं तयार केली. त्यात चिंच, करंज, लिंब, अर्जुन, काटेसावर अशी झाडं. गच्चीवरही शेवगा,कोरफड,तुळस अशी झाडं. झाडं कुठे,कशी,किती लावावी याचं शास्त्रीय ज्ञान त्याला वडिलांकडून मिळालं. झाडांना पाणी देण्यासाठी आठवड्यातून दोनदा घरातीलच टँकर वापरून पाणी दिलं.
चैतन्यचं काम पाहून मग इतर मंडळीही हातभार लावू लागली. एकूण तीनशे झाडं लावण्यात आली. जी व्यक्ती जास्तीत जास्त झाडं जगवेल त्या व्यक्तीला बक्षीस. यामुळे जास्त झाडं जगली. लोकांमध्ये झाडांविषयी प्रेम निर्माण व्हावं , झाडांची संख्या वाढावी हीच चैतन्यची इच्छा आहे.
आपण फलटण-सांगली मार्गानं गेलो तर चैतन्यनं फुलवलेली हिरवाई आपल्याला नक्की दिसेल.

-संतोष बोबडे, ता. फलटण, जि. सातारा

Exit mobile version