Site icon Navi Umed

ll समाधानाचे क्षण ll स्वाभिमानाला ठेच लागते तेव्हा…

Advertisements

 

 

वर्ल्ड इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनयझेशनमधून शिष्यवृत्तीसह एलएलएम करणं, बौद्धिक संपदा कायद्यावर मराठीतून सलग वर्षभर ‘लोकसत्ता’ मधून सदर चालवणं, पुढं जाऊन ‘राजहंस’ सारख्या मातब्बर प्रकाशनातर्फे तीन पुस्तकं प्रकाशित होणं यातलं काहीही, अगदी काहीही मी ‘आपल्याला हे आयुष्यात करायचंच आहे’ या कॅटॅगरीत ठरवलेलं नव्हतं. काहीही मोठ्ठं ध्येय वगैरे बाळगलं नव्हतं. हं, पण एक गोष्ट मात्र होती, जे करेन ते अत्युत्तम, पूर्ण जीव ओतून करायचं, नाहीतर त्याच्या वाटेला जायचं नाही, हे मात्र कुठंतरी लहानपणापासूनच माझ्यात रूजलेलं होतं. कदाचित त्यातूनच हे सगळं घडलं असावं.
शिक्षणात मी उत्तम होते, मात्र गणितात फारसा रस नव्हता, त्यामुळे इंजिनिअरिंगला जायचा प्रश्नच नव्हता. बायॉलॉजी, केमिस्ट्री आवडायचं. मग बारावीत थोडेसे कमी गुण मिळाल्याने मी फार्मसीकडे वळले. नाशिकमध्येच बी.फार्म केलं. बी फार्म नंतर GATE नावाची एक परीक्षा दिली, जी मास्टर्ससाठी स्कॉलरशिप मिळवून देणारी असते. त्यात उत्तम मार्क मिळाले, माझ्या कॉलेजची मी टॉपर ठरले आणि मग एमफार्म करण्यासाठी मला मुंबईच्या यूडीसीटीमध्ये संधी चालून आली होती. पण कुठं उगाच नाशिक सोडून जायचं, इथंच शिकूया असा विचार केला. होणारा नवरासुद्धा ‘तुला जायलाच हवं का मुंबईला शिकायला?’ असं म्हणाला आणि मग मी नाशकातच राह्यले. पण आता मागे पाहता वाटतं, की त्यावेळी मी यूडीसीटीत जाण्याची संधी स्वीकारायला हवी होती. ती स्वीकारली असती तर आज करिअरचा ग्राफ वेगळा असला असता.

मग मास्टर्स पूर्ण व्हायच्या आधीच माझं लग्न झालं. लग्नानंतर वर्षभराने माझ्या लेकीचा जन्म झाला, संसार, बाळाला सांभाळणं असं धोपट मार्गाने आयुष्य सुरू होतं. करिअरबद्दल वगैरे काही फार विचार करत नव्हते. पुढे माझ्या कॉलेजचे एक प्राध्यापक निवृत्त झाले आणि त्या कॉलेजच्या प्राचार्यांनी, माझ्या दुसऱ्या सरांनी, उद्यापासून त्यांच्या जागेवर शिकविण्यासाठी तू यायचंस, असं मला फर्मान सोडलं. मी जरा बावचळून गेले, “सर मला तर शिकवण्याचा कसलाच अनुभव नाहीये. मला नाही येणार शिकवता!!” अशी कारणं देऊन ते टाळता येतंय का हे पाहू लागले पण सर बधले नाहीत. आणि मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या फार्मसी कॉलेजमध्ये माझा ‘प्राध्यापक’ म्हणून प्रवेश झाला. खरं तर 100 टक्के शासकीय अनुदान लाभलेलं हे कॉलेज. अश्या कॉलेजच्या नोकरीसाठी लोक जीव टाकतात, पण माझ्याकडे ती संधी सहज चालून आली. अर्थात संधी सहज चालून आलीये ना? मग कसंही शिकवा. असं मी करू शकत होते, पण ते स्वभावातच नसल्याने पूर्ण तयारीनिशी, अभ्यास करून मी ‘प्राध्यापक’ म्हणून मैदानात उतरले आणि पाहता- पाहता विद्यार्थ्यांना माझं शिकवणं आवडू लागलं, अर्थातच मी सुद्धा त्या अध्यापनात रमून गेले. आता अध्यापन क्षेत्रात उतरलोच आहोत तर आपल्याकडे ‘पीएचडी’ही हवीच या उद्देशाने 2008 ला माझ्याच कॉलेजमध्ये पीएचडी साठी नोंदणी केली.

दरम्यान समवयस्क मित्र- मैत्रिणींशी गप्पा चालायच्या. त्यातच पीएचडी, आणि पॅरिसमध्ये केमिस्ट्रीशी संलग्न विषयात दोन पोस्ट डॉक्टरेट करून आलेल्या माझ्या एका मित्राशी त्याच वर्षी माझा एक दीर्घ फोन कॉल झाला. तो रिचर्स अन्ड डेव्हलपमेंटमध्ये न जाता डॉ. रेड्डी यांच्या आयपीआर (इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटस) मध्ये काम करत होता. त्या कॉलमध्ये औषधांच्या पेटंटशी निगडित एका क्लिष्ट केसबद्दल सुमारे पाऊण तास माझ्याशी बोलत होता. मी ते सगळं ऐकून घेतलं, पण खरं तर मला ते काहीच नीटसं कळलं नव्हतं. कारण हा विषय माझ्या अभ्यासात कधीच नव्हता. हेच मी त्याला बोलून दाखवलं- “तू एवढं सगळं सांगितलंस पण मला काहीही कळलेलं नाही, कारण ‘पेटंट’ चा ‘प’ ही कधी अभ्यासात नव्हता.” माझं हे वाक्य ऐकून तो थक्क झाला आणि म्हणाला, “फार्मसी कॉलेजचे प्राध्यापकच असं म्हणायला लागले तर कसं व्हायचं? विद्यार्थ्यांनी कुणाकडून शिकायचं मग? तू शिकलीस तेव्हा नसेल, पण आता तू ज्या विद्यार्थ्यांना शिकवतेस, त्यांच्या अभ्यासक्रमात तर हा विषय असेलच ना? तो विषय कोण शिकवतं मग? ” मी त्याला उत्तर दिलं की, “हो आलाय खरा नुकताच तो विषय, पण तो मी शिकवत नाही. खरं सांगायचं तर कॉलेजमधल्या कुठल्याच प्राध्यापकाला तो विषय शिकवण्यात स्वारस्य नाहीये.” यावर तो म्हणाला, “कमाल आहे, मग या गोष्टीची तुला लाज वाटायला हवी, इतका महत्त्वाचा विषय आणि त्याबाबतीत काहीच माहिती नाही. माहिती नाही, ते जाऊच देत, पण शिकण्याची इच्छाही नाही तुझी? माझा यावर विश्वास बसत नाही.”

माझ्या मित्राचे हे शब्द मला त्यावेळी चांगलेच झोंबले, पण ते एका अर्थाने खरेही होते, मी फक्त माझ्या ‘कम्फर्ट झोन’ मध्ये राहतेय, असं विचारांती जाणवू लागलं. आणि म्हणूनच मी म्हणते, मित्राच्या त्या एका कॉलने माझ्या आयुष्याला एक वेगळीच दिशा दिली.
पुढं काय झालं, त्यासाठी वाचा पुढचा भाग.पुढच्या गुरुवारी.

– डॉ. मृदुला देशमुख- बेळे

Exit mobile version