अहमदला वाटतं ओशिवरातली सगळी मुलं शिकायला हवीत

 

”सीखने से ही सभी प्रॉब्लेम सॉल्व हो सकते है. इसीलिए इन बच्चों को मोटिवेट करता रहता हूँ. मेरे सिखाने से, समझाने से इन को रास्ता मिल जायेगा तो अच्छा लगेगा.” अहमद कळकळीने सांगत होता.
अहमद खान मुंबईतल्या जोगेश्वरी पश्चिम इथला. वय २५ . गेल्या तीन वर्षांपासून आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलमध्ये इन्व्हेस्टमेंट मॅनेजर. तसं तर त्याने १० वी नंतर लगेचच काम करायला सुरुवात केली. एकीकडे शिक्षणही. मॅनेजमेंटमध्ये त्यानं मास्टर्स केलं आहे आणि नेट परीक्षेसाठी अप्लाय केलं आहे. अहमदला प्राध्यापक व्हायचं आहे.
गुलशन नगर, ओशिवरा, अजित ग्लास परिसरात रस्त्यावर फिरणाऱ्या, कचरा वेचणा-या, भंगार गोळा करणाऱ्या मुलांना शिकवतो. कधी २-४ तर कधी १२-१५ मुलं. कोविडचा मोठा परिणाम परिसरातल्या मुलांच्या शिक्षणावर झाल्याचं तो सांगतो. परिस्थितीमुळे, आधीच या मुलांसाठी शिकणं अवघड, त्यात कोरोनामुळे शाळा बंद पडल्यानं मुलं शिक्षणापासून अधिकच दूर गेल्याची चिंता त्याला सतावते. त्याचे चार मित्र शिक्षकी पेशातले. कोरोना परिस्थितीचा परिणाम त्यांच्याही नोकऱ्यांवर झाला. त्यांना मदतीला घेऊन मुलांना शिकवण्याचा प्रयत्न अहमद करत आहे. शनिवार – रविवार पूर्ण वेळ याचसाठी. या मुलांना त्याने मास्क दिले. स्वच्छता शिकवली. नोव्हेंबर 20 पासून त्याने उपक्रम सुरू केला. सध्या निर्बंधांमुळे काम थांबलं आहे.


अहमदच्या हुशारीमुळे ओळखीपाळखीतले, आजूबाजूचे त्याच्याकडे शंका विचारायला, अभ्यासात मदत घ्यायला येतात. ऑफिसनंतर आठवड्यातल्या चार संध्याकाळ त्यानं यासाठी राखून ठेवल्या आहेत.
महापालिका शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण का मिळत नाही? असा प्रश्न त्याला भेडसावतो. प्रत्येक मुलाला शाळेतून मार्गदर्शन मिळालं तर त्याचं आयुष्य बदलू शकतं. खासगी आणि सरकारी शाळांमधली दरी कमी झाली पाहिजे, असं अहमदला वाटतं. काही सामाजिक संस्थांच्या कामात त्याने भाग घेतला आहे.
शिक्षणावर काम करणारी एनजीओ अहमदला सुरू करायची आहे. एनजीओ बऱ्याच आहेत, तुझी एनजीओ यात वेगळी कशी ठरेल? त्यावर अहमद प्रामाणिकपणे सांगतो, ”वेगळेपण आत्ताच सांगता येणार नाही, पण टीम म्हणून काम करणं वेगळं असतं, संस्था म्हणून आपलं काम अधिक प्रभावी ठरतं. ”
अहमदला त्याच्या कामासाठी नवी उमेदकडून शुभेच्छा!

– सोनाली काकडे, मुंबई

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading