पाळीकरता पर्यावरणस्नेही पर्याय
गेल्या काही वर्षांपासून पाळी दरम्यान मेनस्ट्रुअल कपच्या वापरासंदर्भात दबक्या आवाजात का होईना चर्चा केली जात आहे. २०२० मध्ये लॉकडाऊनच्या सुरवातीच्या काळात बऱ्याच ठिकाणी डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड मिळण्यातही अडचणी येत होत्या. त्याआधी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराच्या वेळीही मासिक पाळी सुरू असणाऱ्या महिलांना खूप अडचणी आल्या होत्या. या अडचणीच्या परिस्थितीतच नाही तर सर्व आलबेल असतानाही मेनस्ट्रुअल कप हा पाळीच्या दिवसांमध्ये आरामदायी, पर्यावरणस्नेही आणि शाश्वत पर्याय म्हणून समोर येत आहे.
बेंगळूरूमधल्या स्वतंत्रता ट्रस्टनं महिलांना पाळीदरम्यान स्वच्छ, स्वस्त आणि शाश्वत पर्याय मिळावा याकरता २०१९ पासून एक उपक्रम सुरू केला. महिलांना मासिक पाळी व स्त्री आरोग्य याबद्दलची माहिती देणं, मासिक पाळीदरम्यान स्वच्छ आणि सुरक्षित पर्याय म्हणून मेनस्ट्रुअल कपचा वापर करणं आणि चांगल्या दर्जाचे पुनर्वापर करता येणारे मेनस्ट्रुअल कप माफक दरात उपलब्ध करणं या गोष्टींवर स्वतंत्रता ट्रस्ट काम करते.
पुणे आणि बेंगळुरूतल्या वस्त्यांमध्ये त्यांचं काम चालत असलं, तरी देशभरात पाळी विषयावर काम करणाऱ्या लोकांशी ट्रस्ट जोडली आहे. त्यामुळं अगदी कानपूरपासून चेन्नईपर्यंतच्या वस्तीत त्यांचं काम सुरू आहे. वस्तीत काम करणाऱ्या संस्था, कार्यकर्त्या यांच्यामार्फत जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न स्वतंत्रता ट्रस्ट करत आहे. ट्रस्टमधील तज्ज्ञ व्यक्तींचे छोटे गट झोपडपट्टी, चाळींमध्ये राहणाऱ्या महिलांपर्यंत सर्व माहिती पोहचवतात. हा सर्व संवाद त्या त्या राज्याच्या प्रादेशिक भाषांमध्ये चालतो. कोविड निर्बंधांमुळं आता पुन्हा थेट भेट घेता येत नसल्यामुळं वेबिनारच्या माध्यमातून ते महिलांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलांमधील मासिक पाळी, स्त्री आरोग्य, पाळीतली स्वच्छता या गोष्टींबद्दल गैरसमजुतींचा मोठा पगडा दूर करण्याचं काम हे स्वयंसेवक करतात.
नुसती माहिती देण्यापेक्षा या महिलांना मासिक पाळीतील स्वच्छतेकरता मोफत किंवा कमी किंमतीत शाश्वत पर्याय देण्याकरता स्वतंत्रता ट्रस्टनं स्वतःच पावलं उचलायचं ठरवलं. याच उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून ऑक्टोबर 2020पासून तारा रियुझेबल कप या नावानं त्यांनी मेनस्ट्रुअल कपची निर्मितीही सुरू केली. १००% लिक्विड मेडिकल ग्रेड सिलिकॉनचा वापर करून या कपची निर्मिती करण्यात येते. बाळांच्या दुधाच्या बाटलीचं निपलही याच मटेरियलपासून बनवलं जातं. केमिकल डायचा वापर न केल्यामुळं हा कप पारदर्शी आहे. अनेक प्रयोग आणि चाचण्यांनंतर वैद्यकीयदृष्ट्या सोयीचा असा तारा कप बनवण्यात आला. आपल्याला वैयक्तिकरित्या किंवा स्वयंसेवी संस्थांना बल्क ऑर्डरमध्ये या कपची खरेदी करता येते. स्वयंसेवी संस्थांना बल्क ऑर्डरमध्ये किंमतीत सवलत दिली जाते. एका कपची किंमत साधारण २५०-२७० रुपये आहे. वस्तीतल्या महिलांना ताराकप अवघ्या ५० रुपयांना दिला जातो. तारा कपचं काम ना नफा ना तोटा या तत्वावर चालतं. सध्या तारा कप काम करत असणाऱ्या वस्त्या आणि त्यांच्या विविध कार्यशाळांच्या माध्यमातून महिन्याला 80-100 जणी मेनस्ट्रुअल कपकडं वळत आहेत. या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या आणि पाळीदरम्यान पारंपरिक पद्धतीनुसार कापडाचा वापर करणाऱ्या महिला, डिसपोजेबल पॅडपेक्षा मेनस्ट्रुअल कपला पसंती देताना दिसतात. त्यांचं प्रमाण 15-20% इतकं आहे.
डिस्पोजेबल सॅनिटरी पॅडच्या वापरामुळं होणारी एलर्जी टाळण्याकरता मेनस्ट्रुअल कप हा एक चांगला पर्याय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कप स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येतो. एक कप साधारण ७-८ वर्ष सहज वापरता येतो. पॅड किंवा टॅम्पूनप्रमाणं ‘वापरा आणि फेका’ ही गोष्ट करावी लागत नसल्यामुळचं कप पर्यावरणस्नेही आहे. पोलीस, पत्रकार आणि इतर फिल्ड वर काम करणाऱ्या महिलांना पाळीच्या दिवसात पॅड बदलण्याकरता वेळ आणि स्वच्छ स्वच्छतागृह मिळेलच याची खात्री नसते. हा कप १० तासांपर्यंत वापरता येतो. याच्या वापरासंदर्भात युट्यूबवर अनेक व्हिडिओ आहेतच. कपच्या पाकिटावरही त्याबद्दल सविस्तर माहिती असतेच. प्रत्येक वेळी कप गरम पाण्यात 3-4 मिनिटं गरम करून निर्जंतूक करून वापरायला घ्यायचा. तुम्ही खेळताना, सायकल चालवताना, कोणतीही हालचाल करताना, रात्री झोपेत डागाच्या टेन्शनशिवाय राहू शकता. मुली आणि महिलांकरता वेगळ्या आकारातले मेनस्ट्रुअल कप्स मिळतात. सुरवातीला घाबरणाऱ्या, साशंक असणाऱ्या पण नंतर या कपचा वापर करणाऱ्या स्त्रियांनी या कपच्या सोयीमुळं, आरामामुळं पॅडला अलविदा केलं आहे.
तारा कपचा संपर्क – www.taracup.com
sonia.m@mytaracup.com
– साधना तिप्पनाकजे

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading