कॉलेजमधला प्रोजेक्टनं रचला पर्यावरणासाठीच्या स्टार्ट अपचा पाया 

वर्ष २०१८. अजिंक्य धारिया नांदेडमधल्या एसजीजीएस महाविद्यालयाचा विद्यार्थी.  मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा  २० वर्षांचा अजिंक्य कॉलेजचा प्रोजेक्टनिमित्त क्षेपणभूमीला गेला होता. तिथे सफाई कामगार सॅनिटरी नॅपकिन्स,डायपर्स  वेचत होत्या. त्यानं त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्याला जाणवली ती या सफाई कामगारांची वेदना, त्यांच्या आरोग्याला असलेला धोका आणि पर्यावरणाला पोहोचत असलेला धोका. कॉलेज झाल्यावर औरंगाबादमधल्या कंपनीत तो नोकरी करू लागला. पण डोक्यात प्रोजेक्टचाच विषय होता. त्याच सुमारास जैव तंत्रज्ञान संशोधन परिषदेच्या स्पर्धेसाठी त्याच विषयावर बिझनेस आयडिया सादर करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत १० सर्वोत्तम प्रवेशिकांमध्ये अजिंक्यच्या सादरीकरणानं बाजी मारली. त्यातूनच सॅनिटरी नॅपकिन्सची  पर्यावरणपूरक विल्हेवाट यावर काम करण्याचं त्यानं ठरवलं.

पुण्यामध्ये अजिंक्यनं  ‘पॅडकेअर लॅब्ज’ ची सुरुवात केली. त्याच्यासोबत ६ जण. त्यांच्या टीमनं १५०० हून अधिक महिलांशी संवाद साधला. त्यात लक्षात आलं सॅनिटरी नॅपकिन्स वापरल्यावर त्याचं काय करायचं, कुठे टाकायचं, हा प्रश्न अनेकींना सतावतो आणि पर्यावरणाला यापासून किती धोका पोहोचतो, याबाबत बरेच जण अनभिज्ञच ! अलीकडेच अजिंक्य एका कार्यक्रमानिमित्त नाशिकला आला होता, तेव्हा त्याच्याशी बोलणं झालं. ”आपल्या लोकसंख्येपैकी ३० टक्केच महिला अद्याप सॅनिटरी पॅड वापरतात. तरीही त्यातून वर्षाला काही लाख टन कचरा गोळा होतो. एक पॅड डिकम्पोज व्हायला किमान ५०० वर्ष लागतात.  पॅड पुरण्यातून, जाळण्यातून विषारी वायू तयार होतो.” यावर उत्तर म्हणून आदित्यच्या टीमनं पॅडचा कचरा संकलित करण्यासाठी आणि त्याची पर्यावरणस्नेही विल्हेवाट लावण्यासाठी दोन यंत्र विकसित केली.

पॅड संकलित करण्यासाठी स्वच्छतागृहात   ठेवायला  ‘सॅनि बिन’. यात  ३ आठवड्यापर्यंत ३० सॅनिटरी प्याड्स जमा करता येऊ  शकतात. बिनमध्येच  निर्जंतुकीकरण यंत्रणा आहे. त्यामुळे जीवजंतू मरतात  आणि दुर्गंधीही येत नाही. त्यानंतर ‘सॅनि इको’ या दुसऱ्या यंत्रातील धारदार उपकरणांच्या मदतीनं  पॅडचे  लहान तुकडे होतात.  त्या तुकड्यांचे निर्जंतुकीकरण, रंग काढून टाकणे इत्यादी प्रक्रिया. या प्रक्रियेसाठी सोडियम पोलीकार्बोनेट वापरले जाते. याच्या मदतीने पॅडमधले  रासायनिक घटक काढून टाकले जातात.  सेल्युलोज आणि प्लास्टिक प्यालेटस असे दोन घटक वेगवेगळे होतात. सेल्युलोजच्या मदतीने पेपर तयार होऊ शकतो तर प्लास्टिक पॅलेटचा वापर पॅकेजिंग मटेरीअल तयार करणाऱ्या उत्पादकांना होऊ शकतो किंवा बांधकामातही त्याचा वापर केला जाऊ शकतो. यंत्रातल्या  एका नळीद्वारे  रक्त आणि इतर स्त्राव सांडपाण्याच्या रूपात  वेगळे काढले जातात. या सांडपाण्याची तपासणी एनएबीएल (नॅशनल  अक्रीडीएशन बोर्ड फोर टेस्टिंग, क्यालीबरेशन लॅबोरेटोरीज  ) ने केली आहे. त्यातून  हे सांडपाणी नाल्यांमध्ये गेले तरी धोकादायक नसल्याचे  स्पष्ट झाले आहे. अजिंक्य आणि त्याच्या टीमने तयार केलेले  सॅनि बिन सार्वजनिक स्वच्छतागृह, महिला महाविद्यालयांमध्ये आणि खास महिलांसाठी नव्याने तयार केलेल्या फिरत्या शौचालयांमध्ये ठेवण्यात आले. यंत्रामधून पॅडचे अपेक्षेप्रमाणे विघटन झाले. 

कंपनी सध्या पुणे,मुंबई, बंगलोर इथं सेवा देत आहे.  यंत्रासोबतच त्याची टीम मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत जागृतीही करते. २० क्लायंटच्या माध्यमातून २० हजारांहून अधिक महिलांना त्याचा उपयोग झाला आहे. सरकारांनी, उद्योजकांनी त्याच्या कामाची दखल घेतली आहे.  आता हे  काम त्याला मोठ्या प्रमाणात करायचे आहे. ते देशातील मोठ्या शहरांसोबत  ग्रामीण भागातही न्यायचे आहे. अजिंक्य सांगतो,”जसं एखाद्या चित्रात एक स्ट्रोक चित्रात बदल घडवू शकतो तसंच आपलं आहे, आपली एक छोटी कृती हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यात योगदान देऊ शकते.  जगाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपली गरज नाही पण आपल्याला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकच ग्रह आहे,पृथ्वी !”

–भाग्यश्री मुळे

Leave a Reply