तीन एकरातल्या टोमॅटोने दिले तीस लाख

उस्मानाबाद जिल्ह्यातला लोहारा तालुका. इथल्या धानुरी गावात महादेव जाधव यांची शेती आहे. कोरोनामुळे बाकी सगळं बंद असलं तरी शेतातली कामं थांबली नव्हती. महादेव यांनी तीन एकरात इंदुम 2048 जातीच्या टोमॅटोची लागवड केली. दीड महिन्याने म्हणजे एक ऑगस्टला पाच लाख खर्च करून फाऊंडेशन करण्यात आलं. आणि 20 ऑगस्टला पिकलेल्या टोमॅटोची विक्री सुरू झाली. यावेळी तीन एकरात त्यांनी टोमॅटो लावला.

सुरुवातीच्या काळात गुलबर्गा येथे टोमॅटो विक्री साठी पाठवण्यात आले. तेथे ७०० ते ८०० रुपये प्रतिकॅरेट दराने विक्री सुरू करण्यात आली. जाधव यांनी मुंबई येथील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. प्रति कॅरेट १ हजार रुपये दराने शेतातून उचल करण्याचा ठराव झाला. यामध्ये बाजारपेठेच्या चढ-उतारानुसार पुन्हा दर कमी-जास्त करण्याचा निर्णय झाला. काही दिवस प्रति कॅरेट १ हजार शंभर रुपये दर मिळाला. तर बहुतांश माल व्यापा-याने ९०० रुपये प्रतिकॅरेट दराने शेतातून घेतला. शेतकरी महादेव जाधव, त्यांची पत्नी इंदुमती, मुलगा राहुल व दिपकच्या मदतीने दररोज रोजंदारीच्या २० महिला व दोन पुरुष सोबत घेऊन १५० ते २०० कॅरेट टोमॅटो काढून व्यापा-याला दिले जात होते.


महिनाभरात झालेल्या टोमॅटो विक्रीतून ३० लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. आणखी वीस दिवस टोमॅटो विक्री सुरूच राहणार आहे. यातून १० लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे जाधव यांनी सांगितले.

– गिरीश भगत, लोहारा, जिल्हा उस्मानाबाद

Leave a Reply