बहिणींच्या आर्थिक स्वावलंबनाचा ‘रेशीमधागा’

बहीण-भावातल्या प्रेमाच्या नात्याला वृद्धिंगत करणारा राखीपौर्णिमा अर्थातच रक्षाबंधन, हा भारतीय संस्कृतीतला हा महत्त्वाचा सण. तिथीनुसार हा सण गेल्याच आठवड्यात होऊन गेला, पण कामाच्या गडबडीत ज्या बहिणींना आपल्या भावांना भेटायला वेळ झाला नाही, त्या पुढच्या पंधरवड्यात जमेल तेव्हा वेळ काढून एकमेकांना भेटतात आणि राखीपौर्णिमा साजरी करतात, भावंडांसोबत चार आनंदाचे क्षण जगून घेतात.

प्रत्येक वर्षी राखीपौर्णिमेला राख्यांची नवनवी फॅशन गाजत असते. जालन्यात यावर्षी गाजलेल्या राख्या म्हणजे- अस्सल रेशमी नाजूक राख्या! जालन्यातील कचरेवाडीतील संत जनाबाई स्वयंसहायता बचतगटातील महिलांनी बनवलेल्या सुंदर रेशमी राख्यांनी यावर्षी जालन्याच्या बाजारपेठेत विशेष लक्ष वेधून घेतलंय. गेल्यावर्षीपासून रेशमी राख्यांच्या उत्पादनाला सुरूवात झाली. साधारणपणे प्रति राखी- ३० रू. असा दर असून गेल्यावर्षी तीन हजार राख्यांची विक्री झाली होती, तर याही वर्षी पाचेक हजार राख्यांची विक्री झाली असून, अद्यापही विक्री सुरू आहे.

जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेशमाची शेती केली जातेय. त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा महत्त्वाचा मार्ग सापडला आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार पेठेतच आता रेशीम कोषांची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना मनासारखा भावही मिळतोय. रेशमाला असलेली मोठी बाजारपेठ पाहून, जालना येथील कृषी विज्ञान केंद्रातून  महिलांना अनेकविध रेशमी वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा पुरेपूर फायदा घेत कचरेवाडी येथील बचतगटातील महिलांनी गेल्या वर्षीपासून रेशीम कोषांच्या अतिशय सुंदर राख्या बनवून, बहीण-भावाच्या नात्यातील वीण अजूनच घट्ट केली आहे.

रेशीम कोष फोडून, तो गोल कापून त्यांना पाकळ्यांचा आकार दिला जातो. त्या पाकळ्या एकत्र करून, त्यानंतर पैठणीसाठी जो रंग वापरतात, त्या आवडत्या रंगात बुडवून त्याचे छानसे फूल बनवले जाते. त्या फुलाला रेशमी दोऱ्यामध्ये ओवून त्यात मणी टाकून, नाजूकशी- सुंदरशी राखी बनवली जाते.  अशी अस्सल रेशीम धागे आणि रेशीम कोषापासून बनवलेली राखी ग्राहकांच्या पसंतीला उतरली नसती, तरच नवल!

गेल्या वर्षी सुरू केलेल्या या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी बचतगटातील महिलांनी आणखी नवीन रेशमी उत्पादने विक्रीला आणली आहेत. त्यात प्रामुख्याने येणाऱ्या गौरी- गणपती, नवरात्र आणि पोळ्याच्या सणासाठी सुंदर हार, रेशमी फुलं, फ्लॉवर पॉट, सजावटीच्या वस्तू असे अनेक प्रकार आहेत. सध्या महालक्ष्मीच्या सणासाठी रेशीम कोषांपासून सुंदर हारांची निर्मिती सुरू असून, एक हार 300/- तर जोडी 600/- या दराने विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. रेशमापासून बनलेल्या या वस्तू टिकाऊ आहेत, पैठणीचे आकर्षक रंग वापरल्याने त्या देखण्या झाल्या आहेत. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर या रेशमी वस्तूंच्या विक्रीतून बचत गटातील महिलांना उत्तम आर्थिक नफाप्राप्ती होईल, असं वाटतंय. स्थानिक बाजारपेठेतून या उत्पादनांना चांगली मागणी आहेच, कृषी विज्ञान केंद्रातूनही महिलांच्या व्यवसायाची प्रसिद्धी केली जाते. शिवाय गणपती- महालक्ष्मी सणांच्या निमित्ताने या महिला बचतगटाचे स्टॉल लावून विक्रीचाही विचार करीत आहेत.

महिलांच्या कल्पकतेने आता बाजारपेठेत अस्सल रेशमापासून बनलेल्या नवनव्या वस्तू येत असून, भविष्यात जालन्यातील महिलांनी बनवलेल्या रेशमी वस्तू बाजारपेठ नक्कीच काबीज करतील, असा विश्वास वाटतो.

लेखन: अनंत साळी, जालना

नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

 

#नवी_उमेद

#जालना

#स्वयंरोजगार

#बचतगट

#रेशीम_उत्पादन

 

Leave a Reply