वाचन त्यांच्यासाठी, पण नवी ऊर्जा माझ्यासाठी- उत्कर्षा लाड मल्ल्या 

”जगण्यासाठी वाचन आवश्यक आहे, वाचनासारखा दुसरा छंद नाही, पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही” याची नव्यानं अनुभूती कोविड काळात आली.  मुंबईतल्या उत्कर्षा लाड मल्ल्या सांगत होत्या. उत्कर्षा, अंधेरीतल्या भवन्स महाविद्यालयाच्या निवृत्त उप-प्राचार्या. ३५ वर्ष त्यांनी अध्यापन केलं. कॉलेजमधली अनेक मुलंमुली त्यांच्या मानसकन्या आणि मानसपुत्र. निवृत्त होऊन साधारण ७ वर्ष झाली तरी विद्यार्थी त्यांच्या संपर्कात आहेत.  उत्कर्षा यांचे आईवडील दोघेही राष्ट्र सेवा दलातले. हा वारसा पुढे नेत उत्कर्षाही अनेक समाजोपयोगी कामांशी जोडलेल्या. यापैकीच अंध मुलामुलींसाठी  काम करणाऱ्या  ‘स्नेहांकित’ संस्थेत त्या विश्वस्त आहेत.   भवन्स महाविद्यालयात कार्यरत असतानाच त्या परिमला भट यांच्या ‘स्नेहांकित’  या संस्थेच्या कामासोबत जोडल्या गेल्या. संस्थेच्या उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे अंध विद्यार्थ्यांना अभ्यासाची आणि इतर अवांतर पुस्तकं, लेख वाचून दाखवणं.

निवृत्तीनंतरही समाजकार्यात रमलेल्या उत्कर्षा मल्ल्या मॅडम

कोविड काळात तर उत्कर्षा मॅडम यांनी पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त ५० हून अधिक पुस्तकं आणि १०० हून अधिक लेख रेकॉर्ड केले.  पुस्तकांमध्ये ‘भारताचे संविधान’पासून पाडगावकरांच्या ‘बोलगाणी’सारख्या  कवितांपर्यंत वैविध्यपूर्णता. ‘बनगरवाडी’ चं रेकॉर्डिंग अवघ्या पाच दिवसांत केलं.  ‘आजची मुलं वाचत नाहीत’ वगैरे, असं काही उत्कर्षा मॅडमना वाटत नाही. विशेषतः ज्या मुलांना दिसत नाही त्यांना तर वाचनाची खूपच आवड असते. दुसऱ्या काही गोष्टी करताना मर्यादा येत असल्यानं त्यांना ऐकण्याची खूप आवड असते, असं त्या सांगतात.

”तांत्रिक गोष्टींची मला सवय नव्हती, माहिती नव्हती, मुलांनीच सर्व शिकवलं. ” मॅडम सांगतात. ”याचा उपयोग आताही होतो. आता सांगलीतल्या आमच्या १२ वीच्या विद्यार्थ्याला मी मराठी, इतिहास शिकवते. नुकत्याच झालेल्या परीक्षेत तो वर्गात दुसरा आला, याचा खूप आनंद झाला. मुलांना भेटणं, शिकवणं, त्यांच्यासाठी वाचन करणं  यातून मिळणारा आनंद मोठा आहे. त्यांच्यासोबत आजीचं नातं आहे.”

स्नेहांकित संस्थेच्या कार्यक्रमात गुणी अंध विद्यार्थ्यांचा सत्कार करताना उत्कर्षा मल्ल्या मॅडम

“कोविड काळात जवळची बरीच माणसं गेली. जीवन किती क्षणभंगुर आहे, ते या काळानं दाखवलं आणि या परिस्थितीतही आपण जिवंत आहोत तर त्यामागे काहीतरी हेतू आहे, तो सार्थकी लागला पाहिजे,याची नव्यानं जाणीव झाली.  डिसेंबर २०२० मध्ये मी बाथरूममध्ये पाय घसरून पडले. १४ डिसेंबरला ऑपरेशन झालं. घरी आले न आले तोच मुलांचे फोन सुरू झाले.  आपला कोणाला तरी उपयोग होतोय, ही जाणीव खूप महत्त्वाची आहे. माझं काम मला जबाबदारी वाटायला लागली आणि मी एप्रिलपर्यंत पुन्हा पूर्णपणे कामाला लागले. वाचन आणि मुलांमुळेच हे होऊ शकलं.” उत्कर्षा लाड- मल्ल्या समाधानाने सांगत होत्या.

लेखन: सोनाली काकडे, संपर्क- नवी उमेद, मुंबई

‘नवी उमेद’ची टीम दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली सकारात्मक कामं, घटना, व्यक्ती तुमच्यापर्यंत आणत असते. या कामाला खर्च येतो. त्यातला काही वाटा वाचक म्हणून तुम्ही उचलावा, ही विनंती. त्यासाठी ही लिंक:

https://naviumed.org/support/

 

अकाऊंट डिटेल्सः

Sampark account details

Name: SAMPARK

Account No: 50100547410322

Account Type: Savings

Branch Name: HDFC Bank, Goregaon East

IFSC Code: HDFC0000212

 

सोबतच ‘नवी उमेद’विषयी तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा.

 

#नवीउमेद

#वाचन_प्रेरणा_दिन

#स्नेहांकित

#वाचन_अंधांसाठी

#वाचन_सर्वांसाठी

 

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading