मुलींना शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब ठेवण्याच्या वेगवेगळ्या कारणांमध्ये मासिकपाळी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ग्रामीण भागात मासिकपाळीविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत. त्याचा अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. तर, काही मुलींची शाळाही कायमची दुरावली जाते.


”शहरातील महिला-मुली आता सॅनिटरी नॅपकीनची खरेदी स्वतः दुकानातून करतात. पण ग्रामीण भागातल्या महिला मात्र लाजेपोटी दुकानातून खरेदी करत नाहीत. शाळेत असताना अचानक पाळी आली तर काय करावं ? शाळा सोडून जाता येत आणि आणि गावातून खरेदीही करता येत नाही. असे अनेक प्रश्न एक ग्रामीण भागातील आहेत,” किरण सलगर बोलत होत्या. त्या नांदेड जिल्ह्यातल्या सगरोळी इथल्या संस्कृती संवर्धन मंडळ शाळेतल्या शिक्षिका. भौतिकशास्त्र शिकवणाऱ्या किरण यांचा विज्ञान-तंत्रज्ञानाकडे मुळातच कल. त्यांना व्हेंडिंग मशीनविषयी माहिती होती. मुलींचा प्रश्न किरण मॅडमनी संस्थेतील शिक्षण समन्वयिका श्रद्धा देशमुख यांच्यापुढे मांडला. त्यांची सहमती होतीच. मुलींच्या स्वच्छतागृहात असं एखादं उपकरण बसवावं, अशी मागणी संस्था प्रशासनाकडे करण्यात आली. पण या मशीनची बाजारातली किंमत न परवडणारी होती. त्यामुळे ही खरेदी काही होऊ शकली नाही.
गरज आपली तर धडपडही आपल्यालाच करावी लागेल, ही धारणा पक्की होती. मशीनची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी किरण मॅडमनी इंटरनेटची मदत घेतली. रात्री दोन वाजेपर्यंत त्या याबाबत माहिती पाहायच्या. त्यातून बरंच शिकता आलं आणि हे मशीन आपण तयार करू शकतो, हा आत्मविश्वास मिळाल्याचं मॅडम सांगतात. त्यांनी साहित्याची यादी केली. खर्च कमी व्हावा यासाठी पर्यायी वस्तू शोधल्या. यासाठी कोरोना काळात मिळालेल्या वेळेचा उपयोग झाल्याचं त्या सांगतात. शाळा प्रशासन सोबत होतंच.
पुठ्ठयापासून त्यांनी छोटं मशीन तयार केलं. ते वापरण्यात येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रातनिधिक स्वरुपात शाळेतल्या स्वच्छतागृहात ते काही काळासाठी बसविण्यात आलं. मुलींना ते वापरण्याचा सूचना दिल्या. त्यात काही नॅपकीन ठेवून त्याची उपयोगिता तपासली. मग पक्क्या वस्तूपासून कायम चालणारं मशीन तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं. याकामी संस्थेच्या तंत्र विभागातील सहकाऱ्यांची मदत घेतली. त्यांनीही अल्पावधीतच मशीन तयार करून दिलं. सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीनमध्ये पाच रुपयांचं नाणं टाकून बटन दाबताच मशीनमधून एक सॅनिटरी नॅपकीन बाहेर येतं. जागतिक महिला दिनी याचं रितसर उद्घाटन करून ते वापरात आणलं. त्याचा चांगला उपयोग होत आहे. सध्या एक मशीन तयार केलं असून संकुलातील मुलींची संख्या पाहता आणखी ३ मशीन विविध विभागात बसवण्यात येत असल्याचं किरण यांनी सांगितलं.
-शरद काटकर
Related