स्मशानातील वाढदिवस

 

११ ऑक्टोबर, रात्री साडेअकरा- पावणेबारापर्यंत सगळे जमले. थोड्याच वेळात मित्र मनोजचा वाढदिवस साजरा करायचा होता. कुठे तर स्मशानात. २४ वर्ष झाली. दरवर्षी हा कार्यक्रम होतो.
मनोज पवार गेली २० वर्ष ते तरुण भारतचे दापोली प्रतिनिधी आहेत. मुंबईतून कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून १९९५ मध्ये पुन्हा दापोलीला आले. १९९६ पासून ज्येष्ठ लेखक माधव गवाणकर यांच्या ‘साद’ मध्ये पत्रकार म्हणून कामाला सुरुवात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कामही त्यांनी सुरू केलं होतं. वेगळं काहीतरी करायचं होतं. गवाणकर अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते. एकदा चर्चेत गवाणकर यांनी संकल्पना मांडली. वाढदिवस करायचा. तो कोणत्याही वाराला,तिथीला आला तरी तो करायचा मध्यरात्री… स्म्शानात!
भुतंखेतं खोटी असल्याचं कृतीतून सिद्ध करण्याची नामी संधी.
मनोज यांनी ही संकल्पना उचलून धरली. तिला मूर्त रूप द्यायचं काम अनेक दिवस सुरू होतं. आपला वाढदिवस ज्या दिवशी सुरू होतो त्या दिवसाच्या पहिल्या क्षणाला आपण स्मशानात असायला पाहिजे. अंनिसच्या ऍड मुक्ता दाभोलकर आणि अनिष पटवर्धन यांना देखील संकल्पना आवडली.


१९९६ ला स्मशानातल्या आपल्या पहिल्या वाढदिवसाला मनोज यांनी मित्रांना बोलावलं. दापोली शहरालगतच्या एका गावातलं हे स्मशान. तिथे मनोज यांच्या वडीलभावाची समाधी आहे. त्यामुळे तिथे कोणी त्यांना अडवत नाही. ” इतर कुठे गेलो असतो तर तुम्ही आमच्या पूर्वजांची थट्टा करता असा आक्षेप कोणी घेऊ शकलं असतं. ते टाळण्यासाठी या स्मशानाची निवड.” मनोज सांगतात.
पहिली दोन-तीन वर्ष वाढदिवसाला कोणीच आले नाही. हळूहळू अनेकांची भीड चेपली. मनोज यांच्या वाढदिवसाला आता इतरही लोक येतात.
जमलेली मंडळी एक जागा बसण्यासाठी निवडतात. कोयती आणि काठ्यांच्या सहाय्यानं साफसफाई करतात. मग वाढदिवसाला लावतात त्याप्रमाणे मेणबत्त्या लावतात. मात्र मेणबत्त्या फुंकून विझवत नाही. यानंतर सुगंधासाठी अगरबत्तीदेखील लावतात. सोबत आणलेले गोड पदार्थ सर्वजण वाटून खातात. मनोज पवार यांच्या 12 ऑक्टोबरच्या वाढदिवसाची गोड सुरुवात या स्मशानातून होते. नंतर काही वेळ सर्वजण स्मशानातच विविध विषयांवर गप्पा मारत बसतात.
24 वर्षांमध्ये अनेक जण त्यांच्यासोबत या उपक्रमात सहभागी झाले. यामध्ये दापोलीतले पत्रकार चंद्रशेखर जोशी, शैलेंद्र केळकर, अजित सुर्वे, प्रशांत कांबळे, अरविंद वानखेडे, रमेश जोशी यांचा मोठा सहभाग असतो. जालगाव इथले अजय करमरकर आणि कोळबांद्रेतले प्रशांत जुवेकर हेदेखील एकदा आले होते.
” स्मशानामध्ये कधीही कुठेही भूत, प्रेत, आत्मा यांची अनुभूती आलेली नाही, साक्षात्कार झालेला नाही किंवा कुठे जराशी देखील भीती वाटलेली नाही.” मनोज सांगतात. ” स्मशानामध्ये काही खाऊ नये असे म्हणतात म्हणून स्मशानामध्ये गोडधोड खातो . तरी आजपर्यंत काहीही झालेलं नाही. या सगळ्या खुळचट, चुकीच्या आणि भ्रामक कल्पना आहेत. याचा पत्रकार म्हणूनही खूप उपयोग झाला. कोणत्याही बातमीसाठी रात्रीअपरात्री कुठेही फिरताना कधीही कसलीही भीती वाटली नाही.”
मनोज यांच्या उपक्रमाला पुढल्या वर्षी पंचवीस वर्षे पूर्ण होणार आहेत. या रौप्यमहोत्सवी उपक्रमाला ते सुधारणावादी विचारांचे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आणि विवेक फिल्म फेस्टिवलमध्ये ज्यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली त्या नागराज मंजुळे यांना बोलवायचा त्यांचा मानस आहे. स्मशानातील मध्यरात्रीचा वाढदिवस या विषयावर दापोलीतील प्रगतिशील कलाशिक्षक विश्वजीत तांबे यांनी डॉक्युमेंट्री तयार केली होती.
आपल्यालादेखील आपल्या गावामध्ये असा एखादा नाविन्यपूर्ण वेगळा उपक्रम सुरू करायचा असेल तर त्यांच्या पाठीशी आहोत, हेच या निमित्ताने मनोज पवार यांना सर्वांना सांगायचे आहे.
-जान्हवी पाटील, ता. दापोली,जि. रत्नागिरी

Leave a Reply